जुनी संस्कृती – नव्या आशयाची दहीहंडी

Share

प्रासंगिक- मेधा इनामदार

आपले सगळेच सण आनंद, उत्साह, प्रेमाचा संदेश देणारे आहेत. दहीहंडी हा भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रीय सांस्कृतिक वारसा जपणारा समाजजीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. श्रीकृष्णाच्या बालक्रीडेचा हा देखणा सोहळा लहानथोरांपासून प्रत्येकालाच प्रिय आहे. दहीहंडीच्या निमित्ताने मनभेद, मतभेद आणि जातिभेद विसरून समाजातल्या सर्व थरातले लोक एकत्र येतात आणि उत्सवाचा आनंद घेतात, हे मात्र महत्त्वाचे.

श्रीकृष्णाच्या आठवणी जागवणारा गोकुळाष्टमीचा जन्मोत्सव साजरा झाला की, दुसऱ्या दिवशी दहीहंडीची धूम सुरू होते. महाराष्ट्रात या दहीहंडीचा उत्साह विलक्षण असतो. चौकाचौकात दहीहंड्या लटकत असतात आणि गोविंदांची पथके त्यातला ‌‘दहीकाला‌’ मिळवण्यासाठी ठिकठिकाणी फिरत असतात. पौराणिक आणि सामाजिक महत्त्व असलेला हा खेळ एक परंपरा म्हणून गेली अनेक वर्षे साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमीनंतरच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा खेळ खेळला जातो. बालश्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसमवेत दहीदुधाच्या वर टांगलेल्या हंड्या शोधत फिरत असे. उंच बांधलेल्या हंडीतले दही-दूध आणि लोणी मिळवण्यासाठी ती सगळी मुले एकत्र येऊन मनोरे रचत आणि सगळ्यात वर चढून कृष्ण ती हंडी फोडत असे. त्यातला तो खाऊ सर्वजण मिळून फस्त करत असत.

घरातल्या मुलांना आणि वासरांना उपाशी ठेवून दूध आणि दुधाचे पदार्थ गोकुळाच्या बाहेर मथुरेच्या बाजारात विक्रीसाठी नेले जाऊ नयेत यासाठी श्रीकृष्णाने हा मार्ग शोधून काढला होता. आपल्या देशातले उत्पन्न आपल्याच देशात राहावे, आपल्याच ज्ञातीबांधवांच्या उपयोगी पडावे हा संदेश त्यातून कृष्णाने गावातल्या ‌‘मोठ्यांना‌‘ दिला होता. गोकुळासारख्या लहानशा गावात आणि नंदासारख्या गोपाळाच्या घरात कृष्ण मोठा झाला. एक राजकुमार असूनही त्याचे मित्र समाजातल्या सगळ्या थरातले होते. गरिबी-श्रीमंतीचा भेद नव्हता की, जातीपातीचा द्वेष नव्हता. सारी मुले एकत्र येत आणि मिळून- मिसळून राहत. खेळ खेळत. गाई चारायला नेत. प्रत्येकाने घरून आणलेली शिदोरी एकत्र केली जाई आणि काला करून सर्वजण मिळून त्याचा आनंद घेत. समाजातल्या प्रत्येकाला त्या काल्यासारखेच एकजीव करण्याची ही साधी पण महत्त्वाची कृती होती. त्यातून समाजात निर्माण होणाऱ्या सुंदर एकोप्याचे महत्त्व आजच्या काळातही तेवढेच आहे.

एके काळी मंदिरांमध्ये आणि देवळांमध्ये गोकुळ अष्टमीला होणाऱ्या कीर्तनानंतर लहान मुले दहीहंडीचा हा खेळ खेळत असत, तर काही व्यायाम शाळांमध्ये जन्माष्टमीला रात्री १२ वाजता दहीहंडी फोडण्याची पद्धत असे. या पद्धतीतूनच गोविंदाचे आजचे रूप आकाराला आले. कारण दहीहंडीला सर्वात खाली लागणारा थर हा व्यायाम शाळेतल्या मुलांचा असायचा. तरुणाईला आकर्षित करणारा हा खेळ होता. तरुणांचा उत्साह, जोर, जोम, शक्ती, जिद्द वाढवणारा होता. त्यामुळेही असेल; परंतु दहीहंडीचा हा खेळ थांबला नाही. विसरला गेला नाही. तर चालूच राहिला. किंबहुना, अधिकाधिक लोकप्रिय होत गेला. या खेळाची लोकप्रियता वाढली तसे या खेळात व्यावसायिकता शिरली. त्यात राजकारण्यांनी प्रवेश केला. राजकीय नेत्यांनी मोठमोठ्या बक्षिसांसाठी रकमा जाहीर केल्या. दहीहंडीला त्या त्या राजकीय नेत्याच्या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यात सिनेकलावंतांनी उपस्थित राहून उत्सवामध्ये ग्लॅमर निर्माण केले. पाहता पाहता दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या ‌‘टीम्स‌’ तयार झाल्या. त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाली. दहीहंडी फोडणे हा केवळ खेळ न राहता चढाओढीचे रूप आले.

अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संदर्भ असूनही दहीहंडीच्या कार्यक्रमाला लाभलेले खेळाचे स्वरूप मोठे मनोरंजक आहे. दहीहंडीचा तो संपूर्ण दिवस एका विलक्षण उत्साहाने भारलेला असतो. संगीताच्या तालावर ठेका धरत या व्यावसायिक गोविंदांकडून दहीहंडी फोडण्यासाठी मानवी थर लावले जातात. दहीहंडीची उंची जेवढी जास्त तेवढी थरांची संख्या अधिक असते. कधी सहा थर तर कधी आठ थर. हे थर कधी दहीहंडीपर्यंत पोहोचतात, तर कधी मध्येच कोसळतातही. दहीहंडीची उंची जास्त, तितकेच बक्षीसही जास्त. अर्थातच बक्षीस आणि जिद्द या दोन्हीमुळे गोविंदा अधिक उत्साहात आणि जल्लोषात दहीहंडी फोडतात. लोकही गोविंदांचा उत्साह वाढवतात आणि या चित्तथरारक खेळाचा आनंद लुटतात. या उत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणच्या तरुणाईची ऊर्जा विधायक पद्धतीने समोर येते. कालौघात गोविंदांचे स्वरूप बदलले असले आणि उत्सवी रूप जाऊन व्यावसायिकपणा आला असला तरी दहीहंडी फोडायला जमणाऱ्या गोविंदांचा जोम, उत्साह आणि रग तीच आणि तशीच आहे. दहीहंडी आपल्या गल्लीतली असो वा बाहेर कुणी बांधलेली. उंचावरची ती हंडी गोविंदांना थेट आव्हानच देते. ‌‘हिंमत असेल तर या पुढे!‌’ जातिवंत गोविंदांना हे आव्हान पुरेसे असते. कसलाही विचार न करता ते पुढे सरसावतात आणि दहीहंडी फोडून मोकळे होतात. मग एकच कल्ला होतो, ‌‘गोविंदा आला रे आला. ढाक्कुमाकुम!!

दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांकडून रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या खेळाला आजवर केवळ सण-उत्सवाचे स्वरूप होते. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोविंदांसाठी काही सवलती जाहीर केल्या आणि नवे स्वरूप दिले. मुळातच उत्सवाचे उत्साही स्वरूप असलेल्या गोविंदांना त्यामुळे नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. दहीहंडीच्या निमित्ताने सुरू झालेल्या या खेळाला आता ‌‘प्रो गोविंदा‌’ या साहसी खेळाचे रूप प्राप्त झाले आहे. प्रो लीगसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील संघांना यात भाग घेता येतो. कौशल्य, एकतानता आणि सांघिक भावना जोपासणारा हा साहसी खेळ आता बंद स्टेडियममध्ये मॅटवरही खेळला जातो आहे. या खेळाला लाभू पाहणाऱ्या नवीन ग्लॅमरस स्वरूपामुळे, नोकऱ्यांमधील संधींमुळे आणि व्यावसायिक स्वरूपामुळे क्रिकेट, कबड्डी यांसारख्या खेळांप्रमाणेच या खेळाडूंनाही मानसन्मान आणि उत्पन्नाची शाश्वती मिळू शकेल, असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.

दहीहंडी हा खेळ म्हणून स्पर्धेच्या रूपात असो किंवा सण-उत्सवाच्या रूपात असो, यात असलेला धोका तेवढाच आहे. आठ थरांच्या मानवी मनोऱ्यांची उंची सुमारे ३० फुटांपर्यंत असते. हे असे मानवी मनोरे बनवताना घसरणे आणि पडणे या गोष्टी सातत्याने घडतात. अनेकदा उत्साहाच्या भरात सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. गोविंदांचे मनोरे उभे राहिले जाऊ नयेत यासाठी आयोजकांकडून पाण्याचे फवारे मारले जातात. कधी कधी तर यासाठी टँकर बोलावले जातात. या पाण्याच्या फवाऱ्यांचा दाब खूप जास्त असतो. पाण्याच्या जोरदार माऱ्यामुळे कानठळी बसू शकते. कधी कधी कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. कितीदा तरी पाय घसरून गोविंदा पडतात, जखमी होतात. दहीहंडी उत्सव साजरा करताना उभारल्या जाणाऱ्या मनोऱ्यावरून पडून काही गोविंदांना जीव गमावावा लागल्याच्या किंवा कायमचे अपंगत्व आल्याच्या बातम्या आपण दरवर्षी वाचतो, ऐकतो आणि पाहतो. मानवी मनोरे रचताना धोका असल्याचे निरीक्षण न्यायालयाने प्रशासन आणि अन्य संस्थांनी वारंवार केले आहे. पण लोकोत्सव साजरा करण्यासाठी आणि परंपरा जपण्यासाठी राज्यातील अनेक गोविंदा पथक या दहीहंडी उत्सवात सहभागी होत असतात. अर्थात अलीकडे अनेक सामाजिक संस्था यासाठी पुढे आल्या आहेत. गोविंदा पथकांचा विमा उतरवणे, त्यांना आर्थिक सहाय्य देणे, जखमी गोविंदांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवणे अशा प्रकारची मदत या संस्थांकडून आवर्जून केली जाते. या बाबतीत सकारात्मक असल्याने सरकारनेही काही योजना जाहीर केल्या आहेत.

काहीही असले तरी दहीहंडीचा खेळ ही महाराष्ट्राची शान आहे. आपला अभिमान आहे. त्यामुळेच यात कितीही धोके असले तरी प्राणांची बाजी लावून या खेळात सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि या उत्सवाचे स्वरूपही अधिकाधिक रंगतदार होत चालले आहे. त्यामुळे खेळ म्हटला की धोका आणि दुखापती होणारच, हे मान्य केले तरीही खेळाडूंना योग्य ट्रेनिंग देऊन आणि चेस्टगार्ड, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, सेफ्टीहारनेस यांसारखी सुरक्षिततेची साधने वापरून या खेळातील जीवावरचे धोके कमी करणे आवश्यक आहे हे नक्की. अर्थात या खेळाची लज्जत लुटताना केवळ प्रेक्षक म्हणून नव्हे तर समाजाचा एक जागरूक घटक म्हणून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पडायला हवी. कारण सामाजिक भान जपले तरच कोणत्याही खेळाचा किंवा उत्सवाचा आनंद आणि जल्लोष बेभानपणे उपभोगता येतो.

Recent Posts

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

12 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

15 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

51 minutes ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

1 hour ago

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

3 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

3 hours ago