अठरावा अध्याय हा खरोखर ‘कळसाध्याय’ होय. गीतेतील सर्व तत्त्वज्ञान कोळून काढलेले सार यात दिले आहे. तेही किती सुंदर शब्दांत, साजिऱ्या कल्पना मांडून! या अध्यायात साधकाचा प्रवास चित्रित केला आहे, भक्त साधना करता करता सगळ्या जगाशी एकरूप होतो. त्याला आत्मज्ञान झालेले असते. अशा साधकाची अवस्था नेमकी कशी होते? याचे वर्णन नेमकेपणाने करणारे हे साजेसे दृष्टान्त पाहूया आता…
‘जसे एखादे खरे रसायन असते, ते रोगाचा नाश करून आपणही नाहीसे होते, तशी याची स्थिती होते.
‘जैसे रसौषध खरें। आपुलें काज करूनि पुरें।
आपणही नुरे। तैसें होतसे॥ ओवी क्र. १०७९
किंवा मुक्कामाचे ठिकाण पाहिल्याबरोबर जसे धावणे थांबते, तसे ब्रह्मप्राप्ती झाल्याबरोबर अभ्यास आपोआप राहतो.
गंगा समुद्रास मिळाल्यावर आपला वेग जसा टाकते किंवा कामिनी स्त्री आपला पती भेटला म्हणजे जशी शांत होते; अथवा केळ व्याली की तिची वाढ खुंटते, किंवा गाव येताच ज्याप्रमाणे मार्ग संपतो, त्याप्रमाणे आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल असे दृष्टीस पडताच तो साधक साधनरूपी हत्यारे हळूच खाली ठेवतो.’
या दाखल्यात विविधता किती! अर्थपूर्णता किती आहे! औषध असते; रोगाचा नाश करून स्वतःही नाहीसे होणारे! त्याप्रमाणे ‘वेगळेपणा’ (दुसऱ्याला वेगळे मानणे) हा रोग आहे. तो नष्ट होतो ‘आत्मज्ञाना’ने. मग आत्मज्ञानाच्या अभ्यासाची गरज नाहीशी होते, साधक साऱ्यांशी ‘एक’ होतो.
माणूस मनाशी मुक्कामाची जागा, ध्येय ठरवून प्रवास सुरू करतो, धावत असतो, म्हणजे जोरदार प्रयत्न करत असतो. इच्छित ठिकाण आले की धावणे थांबते. इथे ‘ब्रह्मज्ञान’ हे इच्छित स्थळ. ते गाठताच अभ्यास थांबतो. गंगा नदी एक पवित्र ठिकाण म्हणून आपण पाहतो. तिचे अंतिम स्थळ कोणते? सागर. त्या सागराला मिळाल्यावर ती आपला वेग टाकते. त्याप्रमाणे साधक आपल्या ध्येयापर्यंत गेला की, त्याचा वेग थांबतो. पवित्र गंगेचे समुद्राशी एक होणे हे स्वाभाविक आहे, तसेच भक्ताचे साऱ्या जगाशी समरस होणे हे सहज आहे. ते झाल्यावर प्रयत्न थांबतात.
पुढचा दाखला खास सांसारिक जनांसाठी आहे. कामिनी स्त्रीला पतीची भेट शांत करते. त्याप्रमाणे भक्त ज्ञानप्राप्ती होताच शांत होतो.
केळ व्याली म्हणजे तिच्यापासून पुन्हा निर्मिती झाली की वाढ खुंटते. त्याप्रमाणे भक्ताला आत्मसाक्षात्कार होणे ही जणू एक निर्मितीची अवस्था आहे. ती प्राप्त होते, त्याक्षणी त्याचा प्रवास संपतो.
गाव येताच मार्ग संपतो. इथे गाव म्हणजे ‘आत्मज्ञान’ मिळणे. हे ज्ञान मिळाले की, प्रयत्न कशासाठी? म्हणून मग तो साधक साधनेची हत्यारे हळूच खाली ठेवतो. (शम, दम इ.) कारण आता तो ‘पार’ झालेला आहे. अंतिम ध्येयाच्या जवळ पोहोचलेला आहे.
‘अज्ञानी जन’ ते ‘ज्ञानी भक्त’ असा हा ज्ञानाचा प्रवास आहे. माऊली आपल्या प्रतिभेने तो अशा सहजरीत्या सरूप करतात.’
म्हणून मग –
श्रोत्यांनाही तो सहज कळतो, वळतो.
आणि आपल्या आत वळवतो!!
manisharaorane196@gmail.com
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…