रविवारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या कार्यकारिणीचा समारोप करताना भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार भाषण केले. भाजपाची कार्यकारिणी बैठक असल्याने त्यांच्याकडून असल्याच भाषणाची अपेक्षा होती. अशा भाषणामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा जोम निर्माण होतो आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण होतो. यासाठीच नेते कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी अशी नवनवीन एकेक जोमदार भाषणे करत असतात.
शहा यांनी पुण्यातील भाषणात तेच केले. शरद पवार यांना भ्रष्टाचाराचे म्होरके म्हणून त्यांनी संबोधले, तर उद्धव ठाकरे यांची औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणून संभावना केली. औरंगजेब फॅन क्लब म्हणजे महाराष्ट्रातील एकेकाळची महाविकास आघाडी सरकार, अशी टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना अमित शहा जास्तच आक्रमक झालेले दिसले. शिवसेनेचा त्यांनी जो विश्वासघात केला आहे त्याची बोच अमित शहा यांच्या भाषणातून दिसून आली. उद्धव ठाकरे यांची सध्या मुस्लिमांचे लांगूलचालन करण्याची जी धडपड सुरू आहे त्याला अनुलक्षून शहा यांची ही टीका होती. बाळासाहेब म्हणत असत की, ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी मी शिवसेना बरखास्त करेन. पण त्यांच्या सुपुत्राने बाळासाहेबांच्या सर्व इच्छा पायदळी तुडवत त्याच काँग्रेसशी युती केली. त्यासाठी त्यांनी कसलाही विधीनिषेध बाळगला नाही. ठाकरे यांनी सध्या अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्याची जी चुकीची धडपड सुरू केली आहे त्यावरून भाजपामध्ये संताप आहे.
एकेकाळचा हा मुस्लिमांचा कट्टर विरोध करणारा पक्ष म्हणून ओळखला जात होता. आज त्याची अवस्था अशी झाली आहे की, त्याला जनाब उद्धव ठाकरे असे म्हणावे लागत आहे. शहा यांच्या टीकेत तेच उमटले आहे. शहा यांच्या टीकेत काहीही असत्य नाही. जर ठाकरे यांना आपल्या वडिलांची चाड असती तर त्यांनी कधीही काँग्रेसशी हातमिवळवणी केली नसती. पण तसे न करता त्यांनी केवळ मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी वडिलांना कसे फाट्यावर मारले आणि त्यांच्या आतापर्यंतच्या काँग्रेस विरोधी धोरणाला कसा काळिमा फासला याची उदाहरणे इतिहासात अगदी अलीकडच्या काळातील आहेत. ठाकरे यांची वडिलांच्या आतापर्यंतच्या कामगिरीला कसा काळिमा फासत काँग्रेसशी घरोबा केला आणि मुस्लिमांच्या मांडीला मांडी लावून बसले त्याची जंत्री पुन्हा देण्याची गरज नाही. सत्तेच्या अभिलाषेपोटी उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांना काळे फासले आणि शिवसेनेच्या एकेकाळच्या शत्रूंशी घरोबा केला हे आता उघड झालेले आहे. त्यामुळे त्यात जाण्याची गरज नाही. पण अमित शहा यांच्या टीकेत हे सारे आलेले आहे. पण त्यामुळे अमित शहा यांनी ठाकरे किंवा पवार यांच्यावर टीका केली असे नाही, तर त्यापेक्षाही जास्त काही अमित शहा यांना सांगायचे आहे. आता थोड्याच दिवसांत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यात भाजपाला सत्ता मिळणार हे तर स्पष्ट आहे. पण त्या अगोदर लहान-मोठे पक्ष दूर जाऊ नयेत म्हणूनही भाजपाची ही चाल आहे. राजकारणात अशा चालींना अत्यंत महत्त्व असते.
राजकारणात ऑप्टिक्सला अत्यंत महत्त्व असते. तसे ते ऑप्टिक्स अमित शहा यांच्या टीकेतून दिसून आले आहे. शरद पवार यांच्यावर अमित शहा यांनी टीका केली. त्यावरून पवारांच्या खऱ्या स्वरूपाबद्दल भाजपाला झालेले आकलन समोर आले आहे. पवार यांच्यावर कितीतरी लोकांनी पूर्वी टीका केली आहे आणि ते किती भ्रष्टाचारी आहेत याचे सविस्तर विवेचन केले आहे. पण पवार यांच्यावर अशी जाहीर टीका करण्याची संधी कुणी साधली नव्हती. ती अमित शहा यांनी साधली आणि ती केवळ पवार यांचा महाकाय भ्रष्टाचार कळला म्हणून नव्हे तर या भ्रष्टाचाराचे शिंतोडे त्यांच्या पक्षावर कसे उडाले आहेत याची पोलखोल शहा यांनी केली आहे. पवार यांनी भ्रष्टाचार केला असेल आणि ठाकरे आणि काँग्रेस यांनी त्यांना बरोबरीने साथ दिली, पण भ्रष्टाचाराची जबाबदारी या एकट्या पवारांवर टाकून चालणार नाही, तर ती ठाकरे आणि काँग्रेसवरही येतेच. याचे भान या दोन्ही पक्षांनी भविष्यात ठेवले पाहिजे. पवारांच्या भ्रष्टाचाराला काँग्रेस आणि ठाकरे हेही तितकेच जबाबदार आहेत.
ठाकरे आणि काँग्रेसची साथ नसती तर पवार इतका मोठा भ्रष्टाचार करूच शकले नसते हे म्हणणे सत्य आहे. देशाची सुरक्षा औरंगजेब फॅन क्लब करू शकत नाही, अशी घणाघाती टीका अमित शहा यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणवतात पण कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्या काँग्रेससोबत आज उद्धव गेले आहेत, असे सांगून शहा यांनी ठाकरे यांच्या आरोपातील हवाच काढून टाकली आहे. शरद पवार यांना आव्हान देताना त्यांनी केवळ आतापर्यंत महाराष्ट्राराला खोटी आश्वासने दिली, अशी टीकाही शहा यांनी केली आाहे. यावरून पवार यांच्या भ्रष्ट कारभारावरून शहा यांचा पलटवार काँग्रेस आणि शिवसेनेला चांगलाच जिव्हारी झोंबलेला दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या एकापेक्षा एक नगण्य नेतेही अमित शहा यांच्या टीकेला उत्तर देऊ लागले आहेत. पण त्यांचे प्रत्युत्तर टीका कुणी मनावर घेत नाही. कारण शहा जे बोलले त्यातील शब्द अन् शब्द सत्य आहे. त्यात खोटे असे काहीही नाही. आता शहा यांच्या टीकेनंतर ठाकरे किंवा पवार यांना आपली मोहीम काही काळ तरी आवरती घ्यावी लागेल असे नाही. पण त्यांच्यावर निश्चितच टीकेचा भडीमार होईल. शहा यांच्या टीकेनंतर पवार यांच्या भ्रष्टाचारावर अंकुश येईल किंवा ठाकरे यांच्या मुस्लीम लांगूलचालनाच्या धोरणाला काहीसा लगाम बसेल असे नाही. पण त्यांच्या टीकेमुळे पवार आणि ठाकरे यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांचा बुद्धिभंग करून येनकेनप्रकारे मते मिळवण्याचा जो या दोन पक्षांनी घाट घातला असेल त्याला निश्चितच कुठे तरी पायबंद बसणार आहे. अमित शहा यांची टीका ही निश्चितच दुर्लक्षणीय तर नाहीच, पण उलट महाराष्ट्रवासीयांच्या डोळ्यांत काजळ घालणारी आहे.