Friday, May 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची तब्बल तासभर बैठक!

Maharashtra Politics : शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची तब्बल तासभर बैठक!

नेमकी कशावर झाली चर्चा?

मुंबई : राज्यात सध्या विधानसभेचे (Vidhansabha) वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. अशातच आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. यात नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा करण्यात आली, हे आता समोर आलं आहे. मराठा, ओबीसी आरक्षणावर (Maratha and OBC reservation) या भेटीत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच जलसंपदा, दुधाचे दर आणि साखर कारखान्यांचे काही प्रलंबित प्रश्न यांसह अनेक विषयांवर त्यांच्यात सखोल चर्चा झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात तापत असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर या बैठकीत १५ मिनिटे चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेत सध्या राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे शरद पवार यांनीदेखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंधरा मिनिटे एकत्रित चर्चा झाली आहे.

सदर चर्चेत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी आतापर्यंत काय प्रयत्न केले, याबाबत माहिती दिली. शरद पवार यांनी याआधी सरकार मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाके यांना काय आश्वासन देत आहे याबाबत विरोधी पक्षाला काहीच माहिती नसते असे बोलून दाखवले होते. त्यानंतर आता शिंदे यांनी सरकारने मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काय काय केले आहे, याची माहिती शरद पवार यांना दिली आहे. या भेटीनंतर आता विरोधी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेमकी का झाली आजची बैठक?

मराठा आणि ओबीसी संघर्ष मिटवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीला विरोधी पक्षाने येण्यास नकार दिला होता. दुसऱ्या दिवशी विधानसभेच्या सभागृहात सत्ताधारी पक्षाने विरोधकांना कोंडीत पकडलं. राज्यात मराठा ओबीसी वाद निर्माण व्हावा, तो प्रश्न असाच महाराष्ट्रात राहावा आणि आपली राजकीय पोळी त्यावर भाजली जावी यासाठी विरोधी पक्षांनी बैठकीला दांडी मारली अशा पद्धतीचा गंभीर आरोप करण्यात आला. सत्ताधारी पक्षाकडून शरद पवारच या सगळ्याच्या मागे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न झाला.

दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणात सत्ताधारी पक्षाने मनोज जरांगे यांच्यासोबतच ओबीसी आरक्षण प्रश्नासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके यांना काय आश्वासन दिलं आहे, याची आम्हाला माहितीच नाही. त्यामुळे आम्ही बैठकीला कसं येणार असा सवाल शरद पवारांनी छगन भुजबळांसमोर उपस्थित केला. त्यानंतर लवकरच मी या सगळ्या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करेन आणि मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नी काय तोडगा काढता येईल यासाठी प्रयत्न करेन, अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आरक्षणाचा चेंडू विरोधी पक्षाच्या कोर्टात आला असून आता विरोधी पक्षाला मराठा आरक्षण प्रश्न व ओबीसी आरक्षण प्रश्न याबाबत त्यांची भूमिका काय आहे हे मांडावं लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -