Friday, May 9, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमुलाच्या खोडसरपणामुळे शिक्षकावर गुन्हा दाखल

मुलाच्या खोडसरपणामुळे शिक्षकावर गुन्हा दाखल

क्राइम – अ‍ॅड. रिया करंजकर

छडी लागे छम छम, विद्या येई घमघम असं पूर्वी शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी ब्रीदवाक्य होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही की, गुरुजी मुलांना छडीने चूक देत असत. मुले छडीला घाबरून व मास्तरांच्या मारा लागून अभ्यास तरी करत होते. मोठ्या मोठ्या पदांवर पोहोचलेली विद्वान लोकं विदुषी हे सर्व छडीचा मार खाल्ल्याशिवाय पुढे गेलेले नाहीत.

आता बालकांसाठी कायदे झाले आणि छडीचा मार गायबच झाला. आजकाल शिक्षकांची अवस्था अशी झालेली आहे की, मुलाला हात लावला तरी मुले शिक्षकाने मारले असे आई-वडिलांना सांगतात. पालक शिक्षकांची तक्रार पोलीस स्टेशनला करतात. त्यामुळे शाळेचे काही कायदे बदललेले आहेत. मुलांना मारू नका, मुलांना प्रेमाने सांगा, मुलांना प्रेमाने शिकवा अशी नवीन शैक्षणिक धोरणंही आलेली आहेत. आज अशी परिस्थिती झाली आहे की, विद्यार्थ्यांनी हात उचलला तरी चालेल पण शिक्षकाने हात उचलू नये. त्यामुळे शाळेतील शिस्त बिघडत चालली आहे.

ओमकार नावाचा सात वर्षांचा मुलगा शाळेत जाऊ लागल्यापासून त्याच्या आई-वडिलांनी त्याला प्रायव्हेट ट्युशनला टाकलेलं होतं. यामध्ये त्याचे वडील सुरेश स्वतः शिक्षक असूनही त्याने आपल्या मुलाला ट्युशनला मात्र बाहेर घातले होते. कारण ओमकार हा लहानपणापासूनच मस्तीखोर मुलगा होता. प्रायव्हेट ट्युशन घेणारे शिक्षक विजय त्याला नेहमी सुधारण्यासाठी सल्ला, नेहमी चांगल्या गोष्टी सांगायचे तरी तो ऐकत नव्हता. नेहमी चांगलं अक्षर न काढता मुद्दामहून तो घाणेरडे अक्षर काढायचा. ज्यामुळे शिक्षकांना ते वाचताच येऊ नये. शिक्षकांनी विचारलं अरे तू लिहिलेस ते मला वाचता येत नाही, तर ओमकार उत्तर द्यायचा की, मी बरोबर लिहिलंय तुम्ही वाचा. त्याचे उत्तर चुकीचे जरी असले तरी तो माझं उत्तर बरोबर आहे, तुम्हाला वाचता येत नाही अशी उत्तरे तो शिक्षकांनाही देत असे. म्हणून विजय सरांनी त्याचं अक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ते दोन महिने सतत त्याच हस्ताक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न करत होते पण ओमकार काय त्याचे अक्षर सुधारत नव्हता. तो जाणूनबुजून घाणेरडे अक्षर काढत असे. कारण आई-वडिलांना सांगणार की माझे उत्तर बरोबर होते पण शिक्षकांना वाचता येत नाही.

एक दिवस ओमकारच्या आई-वडिलांनी ओमकारला विजय सरांकडे सोडले आणि पुढे ते लोक आपल्या कामासाठी निघून गेले. ओमकारचे आई-वडील घरी आले. पण ओमकार क्लासवरून घरी आला नव्हता. त्यामुळे आई-वडिलांनी विजय सरांना फोन केला. विजय सरांनी ओमकारला घरी आणून सोडले. थोड्या वेळाने ओमकारने आई-वडिलांना विजय सरांनी मारल्याचे सांगितले. हे बघा माझ्या पाठीवर, पोटावर वळ उठल्याच्या लाल खुणा दिसत होत्या. वडिलांनी त्याला विचारलं असता मला कमरेच्या पट्ट्याने मारल्याचे सांगितले. वडिलांनी घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. ओमकारच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला विजय सरांच्या विरोधात तक्रार केली. ओमकारच्या वडिलांनी विजय सरांकडे कोणतीच सहानिशा न करताच तक्रार केली होती.

विजय सरांना ताब्यात घेण्यात आले. विजय सरांविरुद्ध कोर्टामध्ये केस चालू झाली. दर महिन्याला विजय सर कोर्टात जाऊन हजेरी देऊ लागले. विजय सरांना अनेक वर्षं शिक्षकी पेशात आपली प्रगती करण्यात आणि नाव कमवण्यात गेली होती. ओमकार ऐकत नाही. सुधारण्याचा अनेक प्रयत्न करूनही सुधारत नसल्याने विजय सरांचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्यांनी फक्त मारलं. पण ओमकारने तक्रार करून विजय सरांनी कमवलेली इज्जत धुळीला मिळवली होती. आज विजय सर वयस्कर झालेले आहेत. कोर्टात केस चालू असल्याने ते आपल्या मुलाकडे जाऊ शकत नव्हते. एखाद्या शिक्षकाविरुद्ध तक्रार करताना आपल्या मुलाची किती चूक आहे याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. आपल्या मुलाला कशासाठी मारले याचा शोध घेतला पाहिजे, कारण आपल्या मुलांवर विश्वास ठेवून एका शिक्षकाचे आयुष्य बरबाद होऊ शकते.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -