मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचा नव्हे तर सिमेंटमिश्रीत ग्रीट ओतण्याचा कार्यक्रम
शैलेश पालकर
पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (Mumbai Goa Highway) वरील गेल्या चार दिवसांपासूनचा मेगाब्लॉक हा चक्क डम्परमधून सिमेंटमिश्रीत दगडाची भुकटी म्हणजेच ग्रीट खड्डयांमध्ये ओतण्याचा कार्यक्रम ठरल्याची वस्तुस्थिती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दिसून आली. ११ ते १३ जुलैदरम्यान दिवसांतून दोन वेळा हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या काळात कोलाडजवळील पुई येथील पुलावर गर्डर टाकण्यासाठी घेण्यात आलेल्या या मेगाब्लॉकदरम्यान इंदापूर ते वीर दरम्यानच्या महामार्गावरदेखील खड्डे बुजविण्याचा देखावा सुरू करण्यात आला होता.
पळस्पे ते इंदापूर दरम्यानचे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल १२ वर्षे रखडले असून कासू ते इंदापूर दरम्यानच्या पुलांची कामेदेखील रूंदीकरण पूर्णत्वाला जात आले तरी रखडलेले दिसून येत आहे. पुई येथील नियोजित पुलावर गर्डर बसविण्याकामी वाहतूक महासंचालक कार्यालयामधील पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी या पुलावर गर्डर बसविण्यासाठी ११ ते १३ जुलैदरम्यान सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या दरम्यान मेगाब्लॉक घेण्यास मान्यता देऊन या कालावधीमध्ये महामार्गावरील वाहतूक पुणे बंगलोर रस्ता व अन्य पर्यायी मार्गावरून वळविण्याची अधिसूचना जारी करण्यात आली. याच दरम्यान पुई येथील पुलावर गर्डर बसविण्यासाठी ६ गर्डर आणि हे गर्डर पुलावर चढविण्यासाठी यंत्रसामुग्री आणून ठेवण्यात आल्याचे दिसून आले.
या मेगाब्लॉकदरम्यानच्या महामार्गावरील वाहतुकीला बंदीदरम्यान इंदापूर ते वीर रेल्वे स्टेशनदरम्यान संबंधित ठेकेदारांकडून महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी डम्परमध्ये सिमेंटमिश्रीत ग्रीट म्हणजेच दगडाची भुकटी थेट डंम्परमधून खड्डयांमध्ये ओतण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.
या सिमेंटमिश्रीत ग्रीट म्हणजेच दगडाची भुकटीच्या डम्परमधून खड्डयांवर हे मिश्रण ओतता येईल अशा तऱ्हेने डम्पर खड्डयांजवळ उभा करून थांबविला जात असल्याचे तसेच डम्परमधील कामगार डम्परमधील सिमेंटमिश्रीत ग्रीट म्हणजेच दगडाची भुकटीचे मिश्रण खड्डयामध्ये फावड्याने ढकलून डम्परखालील कामगार ते मिश्रण खड्डयामध्ये पसरवित असल्याचे दृश्यं इंदापूर ते वीर दरम्यान महामार्गावर अनेकांना पाहायला मिळाले.
याच दरम्यान मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पावसाची संततधार कोसळत असल्याने खड्डयांतील सिमेंटमिश्रीत ग्रीट म्हणजेच दगडाची भुकटीचे मिश्रण चिखलमय होऊन वाहनांचे टायर या भरावावरून गेल्याने मिश्रण खड्डयाबाहेर पडू लागल्याने या मिश्रणाचे उंचवटे तयार होऊन खड्डे बुजण्याची प्रक्रिया यशस्वी झाली नाही. त्यामुळे सध्या इंदापूर ते वीर दरम्यान जिथे जिथे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न झाला तिथे वाहनांना खड्डे आणि उंचवटयांमधून वाट काढताना प्रचंड हेलकावे बसत असल्याचे सार्वत्रिक दृश्य दिसून येत आहे.