ताईला आवडते
हर्मोनियम वाजवायला
आणखी तबल्यावर
ठेका धरायला
आईची बोटे
छेडिती सतार
संतूर वाजवण्यातही
गोडीच फार
दादा वाजवतो
व्हायोलिन छान
गिटारही वाजवी
घेऊन तान
बाबा वाजवती
बासरी सुरात
सांरगीवर त्यांचा
बसलाय हात
पखवाज वाजवण्यात
आजोबा सरस
टाळ कुटण्यात
आजीला रस
वाद्यांवर प्रेम आमचे
आहे अतोनात
म्हणूनच फुलतात
सप्तसूर घरात
काव्यकोडी – एकनाथ आव्हाड
१) त्रिज्येच्या दुप्पट
असतो व्यास
भूमितीत करतात
याचा अभ्यास
परिघही त्याला
असतो बरं
सांगा या आकृतीचं
नाव काय खरं?
२) पृथ्वीची छाया
चंद्रावर पडते
पौर्णिमेला पाहा हे
अवचित घडते
सूर्य आणि चंद्रामध्ये
पृथ्वी सरळ येते
सांगा बरं त्यावेळी
नक्की काय होते?
३) हातात चिपळ्या
गळ्यात माळा
मोरपिसांची टोपी
गाता गळा
सकाळी घरोघरी
यायचा कोण?
देवाची गाणी
गायचा कोण?
उत्तर –
१) वर्तुळ
२) चंद्रग्रहण
३) वासुदेव