लक्ष्मण हाकेंचा इशारा तर दुसरीकडे मराठ्यांनी दिलेल्या मुदतीचा अखेरचा दिवस
राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न
मुंबई : राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष (Maratha Vs OBC) शिगेला पोहोचला आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयऱ्यांबाबत अध्यादेश काढण्याची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी त्यांनी राज्य सरकारला दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस आहे. तर दुसरीकडे हा अध्यादेश काढल्यास अख्खी मुंबई जाम करु, असा इशारा ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी दिला आहे. या परस्परविरोधी मागण्यांमुळे राज्य सरकार कोंडीत सापडलं आहे.
सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला सरसरकट ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. आज हा अल्टिमेटम संपत असून मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) शांतता रॅली काढणार आहेत. यावेळी ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला अध्यादेश न काढण्याचा कडक इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही राज्यातल्या १२ कोटी समाजाचे नेतृत्व करीत आहात. आम्ही ६० टक्के ओबीसींनी तुम्हाला मते दिली आहेत. तुम्ही सगेसोयरेंचा अध्यादेश काढू नका, अशी विनंती लक्ष्मण हाके यांनी केली आहे. इतकंच नाही, तर तुम्ही सगेसोयरेचा अध्यादेश काढला तर आम्ही राज्यातील सर्व ओबीसी बांधव मुंबईत येऊन चक्काजाम आंदोलन करू, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. त्यामुळे एकाबाजूला मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना दिलेला शब्द आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचा इशारा यामुळे राज्य सरकारच्या पुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.