मालेगावहून पंढरपूरसाठी सुटणार ६८ जादा बस
मालेगाव : यंदा विठुरायाचा आषाढी वारीचा (Ashadhi Ekadashi 2024) सोहळा १७ जुलै रोजी पंढरीत रंगणार आहे. त्यानिमित्ताने प्रशासनाने देखील जय्यत तयारी केली आहे. मानाच्या पालख्या पंढरीच्या (Pandharpur) दिशेने निघाल्या आहेत. पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवासी येतात. अनेक प्रवासी स्वतःच्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखींबरोबर चालत दिंडीने येतात. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल भक्तांना पंढरपुरात पोहोचणे सोपे व्हावे, यासाठी मालेगाव येथून विशेष बस सेवा (Special Bus) सुरु केली आहे. त्यामुळे भक्तांना आता सहजरित्या मालेगावहून थेट पंढरपूर गाठता येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासनाने अनेक ठिकाणाहून वारकऱ्यांच्या सेवेसाठी बससेवा सुरु केल्या आहेत. त्याचप्रमाणे मालेगाव आगाराने वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘मागेल तिथे बस’ अशी बससेवा सुरु केली आहे. पंढरपूरला जाणारे ४४ प्रवासी एकत्र आल्यास ही बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
७५ वर्षांपुढील नागरिकांसाठी मोफत प्रवास
वारकऱ्यांच्या व प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी मालेगाव आगारातर्फे समूहाने ४४ प्रवाशी एकत्र आल्यास थेट त्या गावातून पंढरपूर वारीसाठी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या गावापासून बस मार्गस्थ होईल तेथून तिकिटाची आकारणी केली जाईल. बस मनमाड, शिर्डी, अहिल्यादेवी नगरमार्गे पंढरपूरला पोहोचेल. मालेगाव ते पंढरपूर प्रवासासाठी एका प्रौढ व्यक्तीला ५५० रुपये तिकीट द्यावे लागेल. महिला व मुलांसाठी २७५ रुपये तिकीट दर असणार आहेत. तर ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत मिळेल.
असे असेल बसचे नियोजन
- १३ जुलै ४ बस
- १४ जुलै ७ बस
- १५ जुलै १५ बस
- १६ जुलै १५ बस
- १७ जुलै १५ बस
- १८ जुलै ४ बस
- १९ जुलै ४ बस
- २० जुलै ४ बस