करा तक्रार, कारण नाठाळ आहेत जाहिरातदार

Share

वसुंधरा देवधर, मुंबई ग्राहक पंचायत

जाहिरात! कमीत कमी वेळात आणि कमीत कमी शब्दांत नेमका संदेश पाठवणारी कला आणि व्यवसाय सुद्धा. आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत अशा प्रकारे पोहोचवायचे की, त्याला ते खरेदी करावेसे वाटावे. व्यवसाय वाढला पाहिजे, हे एकमेव ध्येय. मग जाहिरातीवर विश्वास ठेवून खरेदी करणाऱ्या ग्राहकाची फिकीर कोण करतो? स्वयंशिस्त पाळण्याचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे असून सुद्धा उपरोक्त बेजबाबदार वृत्तीतून जाहिराती निर्माण होणे बंद होत नाही. आस्की अर्थात ॲडव्हटायझिंग स्टँर्डस कॉन्सिल ऑफ इंडियाचा २०२३-२४ चा वार्षिक अहवाल हीच बाब अधोरेखित करतो आहे. जाहिरात करणाऱ्या कंपन्या, उत्पादक कंपन्या आणि त्यात सहभागी असणारे कलाकार यांनी किती प्रकरणी नियमांचे उल्लंघन केले याचा लेखाजोखा या अहवालात मांडला आहे.

सद्य परिस्थितीत छापील किंवा टीव्हीवरील जाहिरातींपेक्षा डिजिटल माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर जाहिराती प्रसारित होतात व अधिकतर तरुण ग्राहकांकडून पाहिल्या जातात. यामध्ये इंस्टाग्राम (४२%), वेबसाईट (३०%), फेस बुक (१७%) आणि यू ट्यूब (९%) हे मुख्य तर ट्वीटर, विविध मोबाइल ॲप, गुगल असे आणखीही खेळाडू आहेत. एकूण ८२२९ जाहिरातींची जी सखोल चौकशी आस्कीने केली, त्यात या माध्यमातील जाहिराती ८५% होत्या. मद्याच्या जाहिरातींना बंदी असून त्या सुद्धा आढळून आल्या. या डिजिटल जाहिराती इंस्टाग्राम, यूट्यूबवरून इन्फ्लुएन्सर, या जाहिरात क्षेत्रातील काहीशा नवीन खेळाडूंनी केलेल्या आहेत. त्यांची नावे सुद्धा आस्कीच्या संकेत स्थळावरील तपशीलवार माहितीत नमूद केलेली आहेत. या इंफ्लूएन्सरसाठी आस्कीची मार्गदर्शक तत्त्वे आणि कोड उपलब्ध आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे डिजिटल माध्यमातील या जाहिरातींना कोणताही विषय जणू वर्ज्य नाही. शिक्षण संस्था, फॅशन, शक्तिवर्धक पेये, मोबाइल फोन, एअर परफ्युम्स आणि अशी अनेक उत्पादने. या माध्यमातून तसेच टीव्ही, छापील परिपत्रके, वर्तमानपत्रे अशा विविध माध्यमातून हर एक प्रकारच्या उत्पादने आणि सेवांच्या जाहिराती बिनदिक्कत केल्या जातात. त्या त्या उत्पादनाच्या जाहिरातीसाठी असणारे वेगळे कायदे – जसे अन्न / औषधे यासाठी आहेत – आणि सर्वच जाहिरातीसाठी असणारे स्वयंशिस्तीचे नियम धाब्यावर बसवले जातात.

आरोग्यविषयक उत्पादने, शिक्षण संस्था, खाद्य पेये आणि मालमत्ता या नेहमीच्या उद्योगांनी यावर्षी सुद्धा मीप्रमाणे भरपूर नियमभंग केलेत. शैक्षणिक संस्था जाहिरातीत जे दावे करतात त्यातील आक्षेपार्ह दावे कोणते? तर नोकरीची १०० % हमी. संस्थेला मिळालेल्या एखाद्या ॲवाॅर्डचा जाहिरातीत केलेला उपयोग. संस्थेतील शिक्षकांना काही खास पारितोषिक मिळाले असेल तर त्याचा उल्लेख. पण खेदाची गोष्ट अशी की सेलिब्रिटीसाठी असलेल्या मार्गदर्शक सूत्रांचे उल्लंघन तब्बल १०१ जाहिरातींतून झालेले आढळून आले. काळजी करण्याची बाब म्हणजे बेकायदेशीर जुगाराशी निगडित १३११ जाहिराती सापडल्या. त्यामध्ये जरी भारतीय सेलिब्रिटी दिसत असले तरी या संस्था भारताबाहेर नोंदलेल्या आणि त्यांची संकेत स्थळे-वेबसाईट-भारतीय नागरिकांसाठी सहज उपलब्ध होती. त्या जाहिरातीतील भारतीय चेहेरे सामान्य ग्राहकांची दिशाभूल करणारे ठरतात, ज्यामुळे ते जुगारसदृश खेळ खेळणारे ग्राहक/ नागरिक बळी पडतात. ही अतिशय गंभीर बाब आहे. ग्राहकांच्या दृष्टीने आणखीन एक मुद्दा लक्षात येतो तो असा की, एकूण १०,०९३ जाहिरातींपैकी, ज्यांना जनरल पब्लिक म्हणावे अशांनी २०% तक्रारी केल्या तर ७७.७% तक्रारी आस्कीच्या स्वत:च्या टीमने केल्या.

अतिशयोक्त आणि दिशाभूल करणारी, अवाच्या सव्वा दावे करणारी जाहिरात, कोणाही सुद्न्य प्रेक्षकाला / वाचकाला सहज समजते. धोकादायक पद्धतीने वाहने चालवताना दाखविली, तर त्या जाहिरातीखाली नोंद असावी लागते, हेही आता सामान्य ग्राहकांच्या लक्षात आले असेलच. सौंदर्य प्रसाधनाचे अतिशयोक्त दावे कमी झाले असले तरी त्यांना अजून आळा घालायची गरज आहे. वर उल्लेखिलेल्या जुगारसदृश खेळांच्या जाहिरातीबाबत मोठा आवाज उठविण्याची गरज आहे. थेट रक्कम मिळाली असे सांगणाऱ्या जाहिरातींना प्रश्न विचारायला हवेत. तरुण पिढीचे रक्षण आपल्या एका योग्य तक्रारीने होऊ शकते. त्यासाठी व्हॉट्सॲपवरून आक्षेपार्ह जाहिरातीची तक्रार कशी करायची याविषयी थोडेसे : आस्कीच्या वेबसाईटवरून किंवा अगदी व्हाॅट्सॲप क्रमांकावरून (७७१००१२३४५) आक्षेपार्ह जाहिरातीची तक्रार करता येते. त्यासाठी आवश्यक ती सगळी माहिती पुरवणे हे तक्रारदाराचे कर्तव्य आहे. आवश्यक माहितीचे तपशील मुद्दाम मुळात आहेत तसे इंग्रजीतून दिले आहेत.

1. Company name
2. Brand name
3. Product name
4. Where did you see this advertisement?
Specify channel/paper / digital platform
5. When did you see the ad – date – DD/MM/YYYY & time – HH:MM
6. Describe the ad
7. Specify objections – like claims/ visuals /both
8. Email
9. Mobile
10. Attachment – video or photograph

उपरोक्त क्रमाने सर्व तपशील व्हाॅट्सॲप क्रमांकावर पाठवावा. स्वत:ची इतर माहिती किंवा हाय इत्यादी काही पाठवू नये. पाठवलेल्या माहितीबाबत तक्रारदाराला पूर्ण खात्री असली पाहिजे. चुकीचा किंवा फेक व्हीडिओ पाठवल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा सावधगिरीचा इशाराही आस्कीने दिलेला आहे. जाहिरातीचा मौसम कायम असतो. उघडा डोळे बघा नीट, व्हा धीट. चुकीच्या गोष्टींना आपणच आळा घालायला हवा, ही खूणगाठ बांधून कामाला लागू या.
mgpshikshan@gmail.com

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

1 hour ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

2 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

2 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

2 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

2 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

3 hours ago