नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील जुन्या संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची तसेच घटक पक्षांच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची एकमताने एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली असून रविवारी ९ जूनला संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या बैठकीत सर्व घटकपक्षांच्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लांबलचक भाषण करत, घटकपक्षांचे आभार मानले. तसेच, आजचा क्षण माझ्यासाठी भावूक असल्याचे सांगत नरेंद्र मोदींनी एनडीएची (NDA) बीजं रोवणाऱ्या देशातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावे घेतली. त्यामध्ये, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचंही नाव मोदींनी घेतले. तसेच, दिवंगत अटलबिहारी वाजपेयींसह एनडीच्या स्थापनेतील दिग्गज नेत्यांचा उल्लेख करत त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.
मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटले की, एनडीए घटकपक्षाचे सर्व नेते, नवनिर्वाचित खासदारांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्यासाठी ही आनंदाची बाब आहे की इतक्या मोठ्या समुहाचं स्वागत करण्याची संधी मला मिळाली. जे खासदार निवडून आले आहेत ते अभिनंदनाचे अधिकारी आहेत. पण, ज्या लाखो कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत करुन, इतक्या भयंकर गरमीत परिश्रम घेतले त्या सर्व कार्यकर्त्यांना या संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमधून डोकं टेकून वंदन करतो, असे म्हणत मोदींनी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले.
पुढे बोलताना मोदींनी म्हटले की, तुम्ही सर्व सदस्यांनी माझी नेतेपदी निवड करुन माझ्यावर नवी जबाबदारी दिली आहे. मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. व्यक्तिगत जीवनात मी जबाबदारीची जाणीव ठेवतो. २०१९ मध्ये या सभागृहात मी बोलत होतो, ज्यावेळी माझी नेतेपदी निवड केली होती त्यावेळी म्हणालो होतो ‘विश्वास’.. आज मी परत म्हणतो, माझ्यावर जे दायित्व दिलं आहे, त्याचं कारण आपला एकमेकांप्रती विश्वास आहे. आपलं अतूट नातं विश्वास मजबूत करतं, हेच सर्वात मोठं वैभव आहे. त्यासाठी हा क्षण माझ्यासाठी भावूक करणारा आहे, आणि तुमच्या सर्वांचे जेवढे आभार मानू तितके कमी आहेत.
हिंदुस्थानाच्या लोकशाहीची इतकी ताकद आहे की, एनडीएला देशातील २२ राज्यांत सरकार बनवून जनतेने सेवेची संधी दिली. आमची युती ही भारताचा आत्मा आहे, स्पिरीट आहे, त्याचं हे एक प्रतिबिंब आहे. त्यामुळेच मी म्हणतो आपल्या देशात आमच्या आदिवासी बंधूंची संख्या निर्णायक आहे. आदिवासींची संख्या जिथे जास्त आहे, अशा १० राज्यांपैकी ७ राज्यात एनडीए सेवा करत आहे. सहकाऱ्यांनो आम्ही सर्वधर्म समभावाच्या आमच्या संविधानाला समर्पित आहे. देशातील गोवा असो की नॉर्थ इस्ट इथे मोठ्या प्रमाणात आमचे ख्रिश्चन बंधू भगिनी राहतात. त्या राज्यातही एनडीएला सेवा करण्याची संधी मिळाली आहे.
सहकाऱ्यांनो प्री पोल अलायन्स, हिंदुस्थानातील राजकीय इतिहासात, प्री पोल अलायन्स इतका यशस्वी कधीही झाला नाही जितका एनडीए झाला. हे गटबंधन किंवा युतीचा विजय आहे, असेही मोदींनी एनडीए आघाडीबाबत बोलताना म्हटले. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे. लोकशाहीचा हा सिद्धांत आहे. मात्र देश चालवण्यासाठी सर्वमत आवश्यक आहे. मी आज देशवासियांना विश्वास देऊ इच्छितो की तुम्ही आम्हाला बहुमत देऊन सरकार चालवण्याची संधी दिली, आम्ही सर्वमतांचा आदर करु आणि देश पुढे नेण्यासाठी सर्व ते प्रयत्न करु. एनडीएला तीन दशकं पूर्ण झाली आहेत. ही सामान्य घटना नाही. तीन दशकं खूप मोठा काळ आहे, त्या काळात एनडीए एकत्र आहे. एनडीए ही सर्वात यशस्वी आघाडी आहे.पाच वर्षांचा कार्यकाळ असतो, आम्ही पाच पाच वर्षांचे तीन टर्म पूर्ण केले आहेत, आता हीच आघाडी चौथ्या टप्प्यात प्रवेश करत आहोत.
जे राजकीय तज्ज्ञ आहेत, जर त्यांनी मुक्त मनाने विचार केला तर एनडीए ही सत्ता मिळवण्यासाठी जमलेली टोळी नाही, तर देशसेवेसाठी कटिबद्ध असलेला हा समूह आहे. देशाच्या राजकारणातील ही ऑरगॅनिक अलायन्स आहे. आज श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, शरद यादव, जॉर्ज फर्नांडिस असे अनेक दिग्गज आहेत, ज्यांनी विश्वासाने बीजं रोवली त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. आमच्या सर्वांजवळ या महान नेत्यांचा वारसा आहे त्याचा आम्हाला गर्व आहे, असेही मोदींनी भाषणात म्हटले.
नितीश कुमार असो, चंद्राबाबू असो आमच्या सर्वांच्या मनात गरीबांचे कल्याण हे एकमेव ध्येय आहे. देशाने एनडीएचा हा कार्यकाळ पाहिलाच नाही तर जगला आहे. सरकार कसं काम करतं, कसं चालतं हे जनतेने पाहिलं. आम्ही देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वांच्या साथीने प्रयत्न केले. एनडीएच्या माध्यमातून आम्ही पुढच्या दहा वर्षात सुशासन, विकास, क्वालिटी ऑफ लाईफ, सामान्य मानवी जीवनात खासकरुन मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्गाच्या आयुष्यात सरकारची दखल जेवढी कमी होईल, तेवढी लोकशाही मजबूत होईल.
आम्ही विकासाचा नवा अध्याय लिहू, सुशासनाचा नवा अध्याय लिहू, जनता जनार्दनाच्या भागीदारीचा नवा अध्याय लिहू आणि सर्वसामान्यांच्या स्वप्नातील नवा भारत उभा करु. संसदेत कोणत्याही पक्षाचा कोणीही सदस्य असेल तर माझ्यासाठी सर्वजण समान असतील, असे मोदींनी म्हटले. लोकसभा असो की राज्यसभा, आमच्यासाठी सर्वजण सारखेच असतील. आपले परके असे कोणीही नसेल, सर्वांना गळाभेट घेण्यात आम्हाला कमीपणा वाटणार नाही, असेही पंतप्रधान म्हणाले.
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…