मुंबई : जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र गणल्या जाणाऱ्या भारताच्या लोकसभा निवडणुकीची मंगळवारी (दि. ४ जुन) मतमोजणी होणार असून केंद्रीय निवडणुक आयोगाने त्या त्या राज्यातील निवडणुक आयोगाच्या माध्यमातून व स्थानिक पोलिसांच्या सहकार्यांने मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे. गुजरातमधील एका मतदारसंघात बिनविरोध निवडणूक झाल्याने उर्वरित ५४२ मतदारसंघासाठी सात टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीची मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतमोजणीनंतर देशाचा कारभार कोण चालविणार, याचे उत्तर मिळणार आहे.
देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्र राज्यात पाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया झाली. १९ एप्रिल रोजी निवडणुकीचा पहिला टप्पा झाला. त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या पाच टप्प्यात महाराष्ट्रातील ४८ मतदार संघात मतदान झाले. त्यानंतर सहावा टप्पा २५ मे रोजी तर शेवटचा टप्पा १ जून रोजी झाला. देशात इंडिया आघाडी आणि एनडीए यामध्येच प्रमुख लढत होती. एनडीएचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तर इंडिया आघाडीची बाजू राहुल गांधी यांनी सांभाळली. चार जून रोजी लोकसभा निवडणुकांसोबत आंध्र प्रदेश आणि ओडिसा विधानसभेची मतमोजणी होणार आहे.
देशातील सर्वच एग्झिटपोलनुसार पुन्हा एनडीएकडे सत्तेची सूत्र जात आहे. सलग दहा वर्षे सत्तेत राहून देशात भाजप विरोधी वातावरण झालेले नाही. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीचा प्रभाव पडलेला दिसून येत नाही. सर्वच संस्थांनी ३५० पेक्षा जास्त जागा एनडीएला मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला १२५ ते १५० पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालापूर्वी आणि एक्झिट पोलनंतर दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिल्ली गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. देशात सर्वच ठिकाणी निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्रातील ४८ मतदार संघातही मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली आहे. राज्यातील ४८ मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर एकूण १४५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण २८९ हॉल मध्ये ४३०९ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी ४ जून रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे होणार आहे. यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून जी.एस प्रियदर्शी (आय.ए.एस.) व राम प्रकाश (एस.सी.एस.) तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक म्हणून राजीव रंजन (आय.ए.एस) व नवाब दीन (एस.सी.एस.) यांची नियुक्ती केली आहे.
सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून भाजपाच सत्तेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रविवारी अरुणाचलमध्ये विधानसभा मतमोजणीत भाजपाला दणदणीत यश मिळाल्याने भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेमंडळी उत्साही असल्याचे देशाच्या कानाकोपऱ्यात पहावयास मिळत आहे.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…