Sharad Pawar : तुम्ही काही करताय की मी मैदानात उतरू?

Share

निवडणूक प्रचारातून मोकळे झालेल्या शरद पवारांचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

मुंबई : राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. भीषण पाणीटंचाईमुळे मागील वर्षी राज्यात केवळ अकराशे टँकर होते. सध्या ती संख्या ११ हजारांच्या वर गेली आहे. अशा बिकट परिस्थितीत आणि ऐन निवडणुकीच्या धामधुमीतही राज्य सरकारकडून वेळोवेळी प्रशासकीय बैठकांचे सत्र आयोजित करुन संबंधितांना उपाययोजना करण्यासाठी तातडीने निर्देश देण्यात आले. मात्र निवडणूक प्रचार संपल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिले असून यात त्यांनी तुम्ही काही ठोस निर्णय घेणार आहात की मी संघर्षासाठी मैदानात उतरू, अशी धमकीच दिली आहे.

शरद पवारयांनी या पत्रात म्हटले आहे की, जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण झाले असून, राज्यातील पशूधन धोक्यात आले आहे. पाण्याअभावी फळबागांची परिस्थिती बिकट झाली असून, राज्य शासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. दुष्काळ निवारणाच्या योजना तळागळापर्यंत पोहोचल्या नाहीत. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसेच दुष्काळी परिस्थिती हाताळताना मी राज्य सरकारशी सातत्याने सहकार्याची भुमिका घेत आलो आहे. परंतु, या भीषण दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पाहून स्वस्थ राहणं कठीण झालं आहे. दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकारने तातडीनं पावलं उचलावीत असं मी आवाहन करतो. मात्र, त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिसल्यास मला संघर्षाची भुमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे नमूद करणारे पत्र पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे.

या पत्रात त्यांनी दुष्काळाबद्दल राज्य सरकारला आठवण करून दिली आहे. दुष्काळाबाबत सरकारने कुठलीच भूमिका घेतली नाही असे शरद पवार म्हणाले आहेत. तसेच, सातत्याने पाठपुरावा करूनही सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे आता मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही पवारांनी या पत्राच्या माध्यमातून राज्य सरकारला दिला आहे.

राज्यात सध्या दुष्काळासारखी स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे लोकांना रोज वणवण करावी लागत आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही, असे शरद पवार म्हणाले. जर ही दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत, तर महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळ निवारणाबाबत योग्य कार्यवाही करावी अशी मागणी पवारांनी केली आहे.

याआधी मी २४ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्या पत्रकार परिषदेत मी राज्य सरकारशी सहकार्य करण्याची आणि दुष्काळी परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची भुमिका घेतली होती. आपणही आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र, ह्या महत्वपुर्ण बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधींसह मंत्री गैरहजर होते. आपण सदर बाबीची योग्य ती दखल घेतली असेलच. मात्र, राज्य सरकार अद्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो, असेही पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.

मागील दहा दिवसांत दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यातील उजनी, जायकवाडी सारखी महत्वाची धरणे आटली आहेत. संपुर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ बाजूच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ विभागाला देखील बसली आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगांव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी तहानलेली आहे. मराठवाडयासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी ह्या तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Tags: Sharad Pawar

Recent Posts

रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त; भारताच्या ड्रोन हल्ल्याने पाकिस्तान हादरला!

पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…

39 minutes ago

Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, ‘या’ भागात यलो अलर्ट

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…

1 hour ago

१६ वर्षांपूर्वीचा बॉम्बस्फोट, पण अजूनही निकाल नाही!

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…

1 hour ago

नालेसफाई नव्हे, ही तर भ्रष्टसफाई! पालकमंत्री आशिष शेलार यांचा थेट हल्ला

मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…

2 hours ago

‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरुच! दहापट उत्तर देणार, पाकिस्तानची घाबरगुंडी, केंद्राची सर्वपक्षीय ताकद एकवटली

नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…

2 hours ago

Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’!

पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने नष्ट देशभरात मॉकड्रील करण्यापूर्वीच भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. पाकिस्तान झोपेतून…

2 hours ago