Share

माेरपीस: पूजा काळे

शिशिर ऋतूचं आगमन निसर्गाच्या ठायीठायी जाणवत होतं. पानगळतीच्या दिवसातल्या निष्पर्ण झाडांच्या सावल्याही उदास, भकास वाटत होत्या. नुकतचं कॅन्सरचं निदान झालेल्या सुजाताला आयुष्यात मोठी पोकळी जाणवू लागली होती. केमोथेरपीची ही तिसरी वेळ. अशा आणिक किती यातनामय थेरपींना सामोर जावं लागणार, या विचारात मग्न असतानाचं, गर्द झाडीतून सुजाताची गाडी आवारात शिरली. हाॅस्पिटलच्या आसपासची गुलमोहरी झाडं मन प्रसन्नित करणारी. शरीराचा नाही, तर मनाचा दाह कमी करणारी, दाटीवाटीनं उभी राहिलेली. ग्रीष्मात भगव्या लालसर पिवळ्या रंगानं बहरणारा गुल खुणावत होता तिला. तो आपल्या तांबूस मोहरानं…!

येईल बहर, जुन्या आठवांना. जणू नयन किनारी पूर आसवांना जीवनातला चढ-उतार पाहता, आयुष्याच्या काठावर कधी झंझावाती फेसाळणाऱ्या लाटा, तर कधी शांत लहरी घेऊन येतात, भरती-ओहोटीला हृदयाच्या अमाप सागरात. त्यावेळी जीवनरथाशी जोडलेलं कालचक्र सोहळा ठरतं आयुष्याचा, तर कधी आजन्म व्यथा होते. बळावलेल्या कॅन्सरसारखं क्रूर, जीवघेणं आजारपण. महागडे उपचार अशा अवस्थेत आजारानं बाहू पसरवत, शरीरावर बाजी मारल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. कवी मनाची सहृदयी सुजाता बहर येण्याआधीच कोलमडलेली. तिच्या अंतर्मनातील कवितेच्या जागा भीतीयुक्त, संवेदनारहित जगणं स्वीकारत होत्या. सवयीप्रमाणं बेडवर झोपली ती. आता सिस्टर ठरल्याप्रमाणं त्याचं काम करणार होत्या.

वाॅर्ड नंबर चारमधल्या खिडकी शेजारच्या बेडमधून रस्त्याच्या दुतर्फा पसरलेली लक्षवेधक गुलमोहरी, मनबावरी झाडं सुजाताचं लक्ष वेधून घेत. तिचा बराचसा वेळ त्यांच्याकडे पाहण्यात जात असे. यालाच जीवन म्हणत असावेत बहुदा. शिशिरातील निसपर्ण वृक्षापरी भासू लागलेलं आयुष्य कधी तृण पात्यावर सांडलेल्या दवबिंदूप्रमाणं चमकू लागतं. पर्ण गळले तरी वृक्ष जगतात, वसंताच्या आशेने. जगण्याची वाट शोधतात. तोवर तत्पर उगवते पहाट. वसंत आगमनाची दिशा देऊन, बळ देते नव्यानं! बहरू लागते पालवी भग्न वृक्ष जीवनी. सावरू लागतो पळस जगण्याची उमेद घेऊनी आणि गुलमोहर बहरतो, फुलतो तांबूस पिवळ्या रंगाने.

हिरव्या झाडांची शोभा शब्दातीत करताना झालेला आनंद सुजाताच्या काव्यातून समरसून वाहताना, एक झाड शोभा वाढवणारं. पर्णरहित झाडात बाजी मारणारं. थकलेल्या जीवाला आसरा देणारं. त्रिदल पाकळ्यांनी सावलीत तृष्णा भागवणारं, असं गुलमोहर नामक एक झाड.अशा रचनांनी गुलमोहर मनात रूजू लागतो, सजू लागतो. आजारपणावर मात करेल, इतकी झाडाशी मैत्री घट्ट झालेली असते तिची. गुलमोहराचा परिणाम तिच्या चेहऱ्यावर जाणवण्याइतपत रूळतो. खळखळून हसावं, त्याच्या छायेत बसावं सहज विशिष्ट भावविश्वातलं हे समरूप होणं, ऊर्जा देत होतं तिला. अशा भग्नावस्थेत सगळं निसपर्ण दिसू लागलेलं. जन्म-मृत्यूच्या गर्तेत निसर्गाशी नात सांगण्यासाठी खंबीर राहावं बहरण्यासाठी. अनुभवाच्या माथ्यावरती विराजमान होऊन करावं लागतं धाडस जे तिच्या अंगी होतं.

सुजाताची हाॅस्पिटल वारी वाढून एव्हाना आजार वाढीस लागलेला. निसर्ग ही कात टाकू लागलेला. मोहरगळती होऊन, त्याच्या जागी लालसर, पिवळ्या रंगाची दुलई पांघरलेली शोभीवंत डेरेदार झाडं स्वागताला उभी असलेली. त्यातल्या काही फांद्या खिडकीतून आत डोकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या. एका फांदीवर काड्या-कचरा-कापूस थोटकं यांनी रचलेलं पक्षाचं घरटं पाहून सुजाताला भारी आनंद झालेला.

मानवी आयुष्य क्षणभंगुर असलं, तरी निसर्गाची किमया किती अगाध आहे, या भावनेनं तिचं मन भरून आलं. या मैत्रबंधात एका चिमुकल्या पक्षाचा प्रवेश मनाला उभारी देणारा. नव्हे नव्या जन्माची खूणगाठ बांधणारा. तो कशाची तरी चाहूल देणारा ठरावा, या हेतूनं, भरल्या नजरेनं, अतीव आनंदानं, सुजातानं गुलूकडे पाहिलं आणि ती पहुडली स्वच्छ पांढऱ्या बेडवर निपचित, परत कधी न उठण्यासाठी. मार्गावर लाल पिवळ्या गुलमोहर फुलांचा सडा जाणीवपूर्वक तिच्या स्वागताला पखाली घालत होता. कदाचित त्यालाही जाणवली होती, तिची अंतिम इच्छा यात्रा. जीवनाच्या वाटेवर बाळगावी लागते शिदोरी सकारात्मकतेची. तेव्हा येते झळाळी पुन्हा बहरण्याची. अजून मी हरले नाही. शर्यत अजून संपली नाही. शर्यतीत भिडतात डाव नवे. कातरवेळी उडतात जसे पक्ष्यांचे थवे, सकाळच्या पारी पक्ष्यांचे थवे खिडकीतल्या गुलमोहरापाशी चिवचिवाट करत होते. घरट्यात नवीन जीव जन्माला आला होता. इथं मात्र आयुष्याला गुलाबी रंगाची संजीवनी देणारा गुलमोहर अजूनही शांत, संयमी, तटस्थ होऊन उभा होता, विस्तीर्ण आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांसाठी सावली बनून.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

2 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

3 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

3 hours ago