Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीजातीपातीचे राजकारण आणि धार्मिक धुमाकुळ घालण्याचा प्रयत्न

जातीपातीचे राजकारण आणि धार्मिक धुमाकुळ घालण्याचा प्रयत्न

राज ठाकरे यांची विरोधकांवर टीका

पुणे : आजपर्यंत देशात झालेल्या लोकसभेच्या निवडणुका मुद्यांवर लढल्या गेल्या. ही पहिलीच निवडणूक आहे, ज्यामध्ये कोणताच मुद्दा नाही. जातीपातीचे राजकारण आणि धार्मिक धुमाकुळ घालण्याचा विरोधकांकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सर्व हिंदू बांधवानी एकत्र येऊन मुरलीधर मोहोळ आणि महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन ‘मनसे’ पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केले.

मोहोळ यांच्या प्रचारासाठी ठाकरे यांच्या सभेचे सारसबाग येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मनसेचे नेते बाबू वागस्कर, अजय शिंदे, किशोर शिंदे, प्रविण तरडे, श्रीनाथ भिमाले, आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, पुण्याची वेगाने वाढ होत आहे. शहराची लोकसंख्या ७० लाखांपर्यंत पोहचली आहे. शहराचे नियोजन झाले नाही तर शहरे नष्ट होतील. शहरे वाचवण्याची जबाबदारी खासदार, आमदार आणि नगरसेवकांवर आहे. त्यामुळे जो पक्ष सत्तेत येणार आहे, त्या पक्षाच्या उमेदवाराच्या सभेसाठी मी आज आलो आहे. पुणे विद्येचे माहेरघर आहे. याठिकाणी अनेक विद्यापीठे शासकीय संस्था आहेत. उद्योग आहेत. केंद्र सरकारला पुण्यातून ७५ हजार कोटींचा कर जातो. अशा शहराचे नियोजन योग्य पध्दतीने होणे आवश्यक असल्याचेही ठाकरे यांनी नमूद केले.

गेल्या काही वर्षापासून राज्यात जातीपातीचे राजकारण सुरु झाले आहे. शाळा आणि महाविद्यालयापर्यंत हे राजकारण पोहचले आहे. त्यामुळे अशा वातावरणात लोक राहण्यास तयार नाहीत. जातीपातीचे राजकारण कशासाठी ? आपल्याला चांगली शहरे पाहिजेत. काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे निघत आहेत. त्यामुळे हिंदू बांधवांनी सुध्दा एकत्र येवून महायुतीला मतदान केले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण गुढीपाडव्याला पाठिंबा दिला. माझ्यासाठी आपण अक्षयतृतीयेला सभा घेत आहात याचा आनंद आहे. पुण्याविषयी आपल्या मनात प्रेम आहे. पुण्याचा विकास करत असताना आपल्या संकल्पनेतील पुण्याचा विकास करण्याचा प्रयत्न मी करेल, असे आश्वासनही दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -