Friday, May 9, 2025

होलिओ…!

दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

“हुरा रे हुरा आणि आमच्या ग्रामदेवतेच्या पालखीला सोन्याचा तुरा रे… होलिओ…”, “आईनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना…”, “ऐरावत रे ऐरावत आणि आमच्या देवाची पालखी आली मिरवत रे होलिओ…” सध्या कोकणात हीच सारी धूम सुरू आहे. फाग पंचमी म्हणजे फाल्गुन कृष्ण पंचमीला वाड्या-वाड्यांमध्ये होळी उभी राहिली आहे. गावातील लहान थोर मंडळी रात्री या होळीभोवती जमून होम करत आहेत. वर्षभरात एकमेकांबद्द्ल असलेला आकस या होमात जाळून पुन्हा नवे नात्याचे मैत्रीचे बंध जोडत आहेत. ही होळी फाल्गुन पौर्णिमेला मध्यरात्री पेटवली जाणार. एकीकडे थंडी पळून जाणार आणि उन्हाळ्याचे दिमाखात आगमन होणार. अर्थात सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने सर्वत्र उत्साहाला बंधने असली तरीही कोकणात शिमगोत्सव म्हणजेच कोकणी असल्याचे दुसरे नाव आहे.

तसं पाहिलं तर होळी हा सण संपूर्ण देशात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. प्रांत भाषा प्रदेश वेगवेगळे असलेल्या या देशात प्रत्येक ठिकाणी हा सण साजरा करण्याची पद्धत वेगळी आहे. पण या उत्सवावर प्रत्येकाचेच प्रेम आहे. कारण होळी म्हणजे रंग, प्रेम आणि वसंत ऋतू होय. होळी म्हणजे राधा आणि कृष्ण यांच्या दैवी प्रेमाचा उत्सव. होळी म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक. कारण हिरण्यकशिपूवर नृसिंहाच्या रूपात विष्णूविजय मिळवून वाईटाचा अंत करतो. होळी, होलिकादहन, शिमगा, हुताशनी महोत्सव, फाग, फागुन कितीतरी नावाने हा उत्सव साजरा होती. पण आमच्या कोकणात मात्र ह्यो आमचो शिमगो! महाराष्ट्रात पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. पुरणपोळीचा नैवेद्य हमखास होळी पौर्णिमेला होतोच. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन अर्थात ‘धुळवड’ साजरी केली जाते. पण कोकणात मात्र रंगपंचमीला रंगांची होळी खेळली जाते.

कोकणात आताचा काळ शेतकरी वर्गासाठी निवांत वेळ आहे. शेतीची कामे संपलेली आहेत. शेतीची भाजवळ होत आली आहे. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे ६-७ जूनपर्यंत विश्रांतीचा काळ आहे. त्यामुळे हा काळ कोकणात शिमगा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यात विशेष म्हणजे गावागावांतील देवळातले देवघर भेटीसाठी पालखीतून बाहेर पडत असतात. हीया भेटीसाठी प्रत्येक कोकणवासीय आतुर असतो. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. रत्नागिरीत हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम’ असे म्हणतात.

वाराप्रमाणे सण साजरे केले जातात ते याच उत्सवात. पौर्णिमेला तिखटाचा सण म्हणतात. काही ठिकाणी रात्री बारा ते पहाटे पाच या वेळात होम लावतात, यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, याला गोडाचा सण असे म्हटले जाते. काही ठिकाणी ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो. हा होम झाल्यावर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात व त्यावर गावातील ठिकठिकाणी होळी पेटवतात. चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो. होळीच्या-होमाच्या आदल्या दिवशी, नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशात मानकरी हा प्रकार खेळतात. श्री केदारनाथ देवस्थानचे मानकरी हातात जळती लाकडे घेऊन, उघडबंब आणि पायात चप्पल न घालता मैदानात दोन बाजूला उभे राहतात. दोन बाजूला उभे असलेले मानकरी एकमेकांवर ही जळती लाकडे फेकतात. असा खेळ काही वेळ खेळला जातो. यामध्ये कोणाला इजा होत नाही हे विशेष. आसूद येथे होळीच्या सणाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लुटतात. होळी अतिशय सुंदररीत्या सजवतात. रांगोळ्या काढतात. पताका लावतात. फुलांची सजावट करतात. होळीची पूजा करून होळीभोवती फेर धरून लोकगीते म्हणतात.

कोकण किनारपट्टीवर राहणारे कोळी बांधव आणि त्यांची कुटुंबे शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. छोट्या गावाचे व त्या त्या वाडीचे देव किंवा ग्रामदैवते ही वर्षभर मंदिरात किंवा गावच्या मानकरी व्यक्तीच्या घरी पेटाऱ्यात ठेवलेली असतात. शिमगा उत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात हे देव पालखीत बसून वाड्यावाड्यातून फिरतात आणि भक्तांना दर्शन देतात. गावातील पुरुष सदस्य या काळात पालख्या घेऊन फिरतात. त्यासाठी गावातील घरे सजवतात. देवाच्या स्वागताची विशेष तयारी केलेली असते. महाप्रसादाचे आयोजन करतात. प्रत्येक गावची जी पालखी असते तिला ‘सहाण’ असे म्हणतात. पालखीतून येणाऱ्या स्त्री देवतांची ‘ओटी’ भरली जाते, तर देवाला हुल्पा दाखवला जातो.

या उत्सवात होणारे मनोरंजन हे लोककलेचा मोठा भाग आहे. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यासारखी सोंगे असे विविध प्रकार यादरम्यान सादर होतात. ढोल-ताशाचे युवा पथक हेही अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते. शिमगा सणापूर्वी गावातून या खेळांचा सराव केला जातो. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथही असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर होतात. होमासाठी सुरमाडाचे झाड निवडले जाते. या झाडात देवतेचा वास असतो अशी कोकणात धारणा आहे. या झाडाची आधी पूजा केली जाते व नंतर ते तोडले जाते. काही ठिकाणी देवाच्या खुणा काढल्या जातात.

अशा अनेक प्रथा, परंपरा या एका उत्सवात कोकणात दिसून येतात. गाव बदलतो, तशा शिमगा साजरा करण्याची पद्धत बदलते. पण त्यातील उत्साह आणि एकोपा कायम असतो. गेली अनेक वर्षे कोकणी माणूस नोकरी-धंद्यासाठी गावाबाहेर पडला आहे. पण तो या शिमग्याला परत येतो, गावपण पुन्हा अनुभवतो आणि ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेऊन जीवनातील नव्या आव्हानांसाठी पुन्हा सज्ज होतो. याच काळात गाव गजबजत, कोकण जिवंत होत. ते जिवंत कोकण याच दिवसात सगळीकडे दिसतं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -