मुंबई : महायुतीने राज्यसभेसाठी चार उमेदवारांची घोषणा केली आहे. यात भाजपाने महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी दिली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना (Ashok Chavan, Medha Kulkarni and Ajit Gopchade) भाजपाने उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून याबाबत आज अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप उमेदवारी जाहीर झाली नाही.
अशोक चव्हाण आणि अजीत गोपछडे हे दोन्ही नेते नांदेडमधील आहेत. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा झाली होती. याबाबत आज भाजपाकडून अधिकृत माहिती देण्यात आली.
अजीत माधवराव गोपछडे हे मूळचे नांदेड येथील आहेत. लिंगायत ओबीसी समाजाचे अजीत गोपछडे यांनी संघ प्रचारक म्हणून काम केले आहे. त्याशिवाय ते कारसेवक आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची संधी मिळाली आहे. नांदेडमध्ये लोकसभा आणि नांदेड तसेच नायगाव विधानसभेसाठी नेहमीच चर्चेत राहिलेल्या डॉ. गोपछडे यांना अखेर पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे.
डॉ. गोपछडे यांचे मूळ गाव कोल्हे बोरगाव (ता. बिलोली) असून त्यांचे वडील प्रा. माधवराव गोपछडे तर काका प्राचार्य गोविंदराव गोपछडे आहेत. गोपछडे कुटुंब नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असून या संस्कारक्षम कुटुंबात जन्म घेतलेल्या डॉ. गोपछडे यांचे बारावीचे शिक्षण नांदेडला यशवंत महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी एमबीबीएस औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर पदव्युत्तर शिक्षण (बालरोगतज्ज्ञ) अंबेजोगाई (जि. बिड) येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात झाले.
महाविद्यालयात असताना त्यांनी मार्डच्या चळवळीचे नेतृत्व केले. त्याचबरोबर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच नितीन गडकरी यांच्या संपर्कातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले. त्यानंतर नांदेडला आल्यावर त्यांनी अमृतपथ बालरुग्णालय सुरु केले. पत्नी डॉ. चेतना गोपछडे या देखील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. नांदेडला सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. गोपछडे यांनी अनेक उपक्रम राबवले. त्याचबरोबर गुरुगोविंदसिंघजी रक्तपेढी सुरु करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.
चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरुडमधून आमदारकीला उतरवल्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज होत्या. त्यांनी आपली नाराजी अनेकदा बोलून दाखवली होती. आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी देत नाराजी दूर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांची निवडणूक होत आहे. या सहा जागा लढवण्याची महायुतीने जय्यत तयारी सुरु केली होती. अशोक चव्हाण भाजपामध्ये दाखल झाल्यामुळे याला आणखी बळ मिळाले होते. मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये जवळपास अडीच तास चर्चा झाली. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एक एक जागा मिळणार होती. तर भाजपाने चौथ्या जागेसाठी तयारी सुरु केली होती. पण चर्चेनंतर सध्या मतांची जुळवाजुळव करणे कठीण असल्याचे दिसल्यामुळे भाजपाने चौथा उमेदवार देण्याचे टाळले आहे. भाजपाकडून चौथा उमेदवार न दिल्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…
जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…