मालदीव, लक्षद्वीप आणि सुंदर कोकण…!

Share

माझे कोकण: संतोष वायंगणकर

देशाचे पंतप्रधान लक्षद्वीपला गेले. तिथल्या समुद्रकिनाऱ्यावर काही काळ थांबले. स्वच्छता किती आवश्यक आहे, हे कृतीतून दाखविले. अखंड जगाने हे सारं पाहिलं. मालदीव सुंदर आहेच; परंतु लक्षद्वीप त्यापेक्षाही सुंदर आहे. मालदीव आणि लक्षद्वीपची तुलना पर्यटन व्यवसायासंबंधित होत असताना यात कोकणचं नाव घेतले जाणार नाही असे होऊच शकत नाही.

परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे कोकण होय. इतका स्वच्छ समुद्रकिनारा, स्वच्छ हवा कुठेही नाही. डोंगर, दरी, नारळ, आंबा, पोफळी, काजू अशा फळबागा आहेत. रेवस ते रेडीपर्यंतचा समुद्रकिनारा ही कोकणला लाभलेली मोठी देणगीचं आहे; परंतु तुझे आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी… अशीच काहीशी अवस्था आपली आहे. मालदीव, लक्षद्वीप चर्चेच्या निमित्ताने समजायला लागलं की, आपले कोकण कॅलिफोर्निया पेक्षाही पुढे आहे. कॅलिफोर्नियाची आठवण अशासाठी झाली की, तब्बल एक-दोन नव्हे, तर तीस-चाळीस वर्षे काँग्रेसी सत्ताधाऱ्यांनी कोकणचं कॅलिफोर्निया करणार, हे कोकणवासीयांच्या तोंडी गाजर देऊन कॅलिफोर्नियाच्या भोवती कोकणवासीयांना फिरविलं गेलं. शाळा, कॉलेजच्या शिकत्या वयात कॅलिफोर्निया शब्द वारंवार कानी पडायचा; पंरतु कळायचं काहीच नाही. नंतरच्या काळात कॅलिफोर्नियाचा हा नेमका भूलभुलैया काय आहे, हे समजलं.

कोकणात गेल्या काही वर्षांत पर्यटन वाढतयं. १९९७ मध्ये कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पर्यटन हा व्यवसाय आहे, तो व्यवसाय म्हणून केला पाहिजे, त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, हे समजलं. तो विचार लोक करू लागले. इथल्या निसर्गाने भुरळ घातल्यानेच अनेक मराठी चित्रपट, मराठी मालिकांचे शूटिंग कोकणात होत आहे. छोट्या पडद्यावर, मोठ्या पडद्यावर कोकणचे सौंदर्य दिसू लागले… कोकणातील पर्यटन हे गोव्यातील पर्यटन व्यवसायाशी तुलना करता येणारे नाही.

गोव्यात पर्यटन व्यवसाय प्रचंड वाढला, बहरला, मात्र त्याचबरोबर येणाऱ्या अनेक चुकीच्या प्रवृत्तींनी गोव्यात प्रवेश केला. अमली पदार्थांनी तर गोव्याला विळखाच घातला आहे. मात्र, गोवा सरकारने नेहमीच पर्यटन व्यवसायाला प्राधान्य देत राज्याच्या अर्थकारणाचा पाया पर्यटन व्यवसायातून तयार केला. अनेक पंचतारांकित हॉटेल आदी पर्यटनाशी संबंधित व्यवसाय, उद्योगांची उभारणी झाली. कोकणात काय झालं जो आज निसर्ग आहे, तो पूर्वीही होताच; पंरतु पर्यटनाचा विचार १९९७ पूर्वी कधी आला नाही आणि आला असेल तरी कृतीत काही येऊ शकला नाही.

महाराष्ट्रातील सत्तेमध्ये नेहमीच पश्चिम महाराष्ट्राचा नेहमी वरचष्मा राहिला. विदर्भ, मराठवाडा, कोकण नेहमीच अर्थसंकल्पात तुटपुंजी आर्थिक तरतूद होत राहिली. साखर उद्योगाला वर्षानुवर्षे राज्यकर्त्यांनी भरभरून मदत केली, करीत आहेत. मात्र कोकणातील पर्यटनाबाबत तिजोरीतले झुकते माप प्रतीक्षेतच राहिले. कोकण पर्यटनासाठीचे विशेष धोरण ठरविले गेले नाही. पर्यटन क्षेत्रात कोकणाने मोठी भरारी केव्हाच घेतली असती; परंतु ते तसे प्रयत्न झाले नाहीत की कोकणातील जनतेनेही त्यासाठी आजवर कधीही सहकार्याची भूमिका घेतली नाही. नेहमीच विरोधाची भूमिका घेतली गेली. पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी जागा द्यावी लागते, ती आजही मानसिकता नाही. उलट विरोध करून मोडून घालण्याची आजही तीच मानसिकता आपण जपली आहे. यात जर आपण बदल केले, तर पर्यटन व्यवसायावर बहरलेले कोकण आपल्याला दिसेल. मालदीवच्या विषयानंतर लक्षद्वीपची चर्चा सुरू झाली आणि लक्ष कोकणाकडे गेले.

क्रिकेट विश्वातला देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सिंधुदुर्ग पर्यटनासाठी सर्वोत्तम असल्याचे एक्सवरून म्हटले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये कोकणातील निसर्ग, समुद्र आणि किनारे स्वच्छ सुंदर असल्याचे सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर क्रिकेट खेळतानाचा एक फोटोही शेअर केला आहे. सचिन तेंडुलकर एवढ्यावरच थांबलेले नाहीत, तर आपण आपला ५०वा वाढदिवस कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे किनाऱ्यावर कसा साजरा केला हे तर सांगितलेच आणि त्याचबरोबर इथल्या सुग्रास भोजनाची चव आजही जिभेवर कशी रेंगाळते हे सांगायलाही सचिन विसरलेला नाही. २४ एप्रिल २०२३ रोजी सचिन हे भोगवे, किल्ले निवती बीचवर आले होते. एक्सवर फोटो आणि व्हीडिओ सचिन तेंडुलकर यांनी शेअर केले आहेत. हे मालदीव नाही सुंदर कोकण असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्गच्या बीचचे एक्सवर फोटो शेअर केले आहेत.

यावर्षी ४ डिसेंबरला नौसेना दिन मालवणला साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मालवणच्या राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटनही करण्यात आले. त्यानंतर कोकणातील पर्यटन अधिक वाढले आहे. नेहमीच्या तुलनेत मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळ सुट्टीच्या काळात गजबजलेली आहेत. आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्या एक्सवरील कोकणच्या किनाऱ्याबद्दलच्या केलेल्या वर्णनाने आणि माहितीने कोकणला पर्यटन व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही सुंदर कोकणचा किनारा असल्याचे एक्सवर म्हटले आहे. आता यापुढच्या काळात कोकणातील पर्यटनस्थळांवर अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ही जबाबदारी घेऊन जास्तीत जास्त निधी कोकणातील पर्यटन विकासासाठी दिला जावा. कोकणातील जनतेनेही कोकणातील पर्यटन विकासातून आर्थिक सक्षमता, उन्नती होण्यासाठी प्रयत्न करावेत. मालदीव, लक्षद्वीप पेक्षाही आपलं कोकण सर्वांग सुंदर आहे. येवा कोकण आपलाच आसा. आता कोकणवासीयांची मोठी जबाबदारी आहे. कोकणचे वैशिष्ट्यपूर्ण आदरातिथ्य आपल्या मुलखातल्या माणसांनी जपायला हवे… नाहीतर काळ कुणासाठी थांबत नाही!

Tags: कोकण

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

2 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

2 hours ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

2 hours ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

2 hours ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

2 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

4 hours ago