Friday, May 9, 2025
Homeसंपादकीयविशेष लेख‘सा. विजयंत’ची ५८ वर्षांची जनसेवा

‘सा. विजयंत’ची ५८ वर्षांची जनसेवा

सेवाव्रती : शिबानी जोशी

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी १९५२ यावर्षी कै. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली जनसंघाची स्थापना केली आणि त्यानंतर त्यानी देशभर प्रवास करायला सुरुवात केली होती. असाच त्यांचा एक प्रवास सांगली इथे होता. सांगली येथे ते ‘जनसंघ का आणि कशासाठी?’ या विषयावर भाषण द्यायला आले होते. त्या काळामध्ये जनसंघ फारच कमी जणांना माहीत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते सांगलीमध्ये काम करीत होते. त्यापैकी केवळ चार कार्यकर्ते या भाषणाला पोहोचले. चार प्रेक्षक असूनही दीनदयाळ उपाध्याय यांनी दीड तास तिथे भाषण केले. संघातील सुरुवातीच्या अशा कार्यकर्त्यांच्या चिकाटी, मेहनत आणि निस्वार्थी भावनेमुळेच संघाचे इतके मोठे रूप आज पाहायला मिळत आहे. त्यांच्या भाषणातून प्रेरणा घेऊन हे चार कार्यकर्ते जोमाने कामाला लागले, त्यामध्ये बापूराव पुजारी, राम सावंत, बाबासाहेब गलगले, बाबा पोतदार यांचा समावेश होता. त्यांनी आपल्यापरीने जनसंघाचे काम सुरू केले.

जनसंघाच्या वाढीसाठी अनेक सामाजिक चळवळी, खुजगाव धरणाला विरोधी परिषद इ. कामांनी त्यांनी जनसंघाचे काम सुरू केले. त्यानंतर १९६५ यावर्षी खुद्द अटलबिहारी वाजपेयी यांची सांगली येथे मोठी सभा झाली. सभा खूपच छान झाली. वाजपेयी यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीमध्ये अत्यंत तळमळीने प्रामाणिक विचार मांडले; परंतु सांगली जिल्ह्यातील कोणत्याही स्थानिक वर्तमानपत्रांनी याची साधी बातमी देखील छापली नाही, कारण त्यावेळी सर्वत्र कसं वातावरण होते हे सांगण्याची गरज नाही. जनसंघ किंवा संघाची बातमी वर्तमानपत्र छापत नसत, त्यामुळे अक्षरशः जाहिरातीचे पैसे भरून जाहिरात स्वरूपात ही बातमी कार्यकर्त्यांनी छापून आणली. पण ही खंत मात्र त्यांच्या मनाला लागून राहिली होती आणि त्यामुळेच आपणच अशा प्रकारचे वृत्तपत्र का सुरू करू नये?, अशी एक भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. आपण ज्या चळवळी, कार्यक्रम, उपक्रम करीत आहोत, त्याची माहिती लोकांना व्हावी यासाठी साप्ताहिक विजयंताचा जन्म झाला.

१९६६ यावर्षी गणेश चतुर्थीला साप्ताहिक विजयंताचा पहिला अंक निघाला. बापूराव पुजारी यांनी पहिला अंक काढला. त्यानंतर ‘राष्ट्रीय सहकारी प्रकाशन मर्या.’ अशी एक संस्था स्थापन करण्यात आली आणि त्या संस्थेद्वारे हे साप्ताहिक सुरू झाले. सुरुवातीला ‘साप्ताहिक विजयंता’ असे साप्ताहिकाचे नाव होतं. त्यानंतर एकदा स्वतः प. पू. गोळवलकर गुरुजी सांगली येथे आले असता, त्यांनी साप्ताहिक वाचलं आणि विजयंता ऐवजी ‘विजयंत’ असे नाव करावे, असे सुचविले. त्यानुसार त्यानंतर आजपर्यंत साप्ताहिक विजयंत या नावाने हे साप्ताहिक सुरू आहे. यात सुरुवातीला स्थानिक चळवळी, राष्ट्रीय विचारांचे कार्यक्रम याच्या बातम्या येत असत. आता सहा/आठ पानी अंक निघत आहे आणि या अंकात संपादकीय, काही तज्ज्ञांचे राजकीय/सामाजिक लेख आणि इतर विविध विषयांवरचे अभ्यासपूर्ण लेख छापून येतात. संघ कार्यकर्ते माधव बापट हे २००८ यावर्षी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी साप्ताहिकामध्ये पूर्ण वेळ लक्ष द्यायला सुरुवात केली आणि विविध उपक्रमही सुरू केले.

संस्थेतर्फे गेली ८ वर्षे तीनदिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली जाते. या व्याख्यानमालेत स्थानिक नामवंत, विचारवंत, लेखक, तज्ज्ञ वक्त्यांची भाषणे सांगलीकरांसाठी आयोजित केली जातात. संस्थेचा आणखी एक विशेष उपक्रम गेली १० वर्षे सुरू आहे. तो म्हणजे प्रतिवर्ष सांगलीतील स्थानिक दोन संस्था तसेच महाराष्ट्रातल्या विविध भागांत शिक्षणाविषयी चांगले काम करणारी एक संस्था अशा एकूण तीन संस्थांना आर्थिक मदत दिली जाते. ही अार्थिक मदत सर्वसामान्यांच्या लोकवर्गणीतून केली जाते. यासाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर असे वर्ष धरले जाते. पहिल्या वर्षी हा पुरस्कार २५,०००/- रुपयांचा होता. या वर्षी त्याची रक्कम दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे. या उपक्रमाचे नाव प. पू. श्री गुरुजी स्मृतीसेवा पुरस्कार (इदम न मम) असे आहे.

पहिल्या वर्षी रेणू दांडेकर यांच्या चिखली येथील शैक्षणिक उपक्रमाला हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील पसायदान शाळा, कमलबाई जोशी शाळा, सिद्धिविनायक शाळा, नर्सिंग शाळा अशा अनेक गरजू शाळांना ही आर्थिक मदत देण्यात आली. प्रतिवर्ष हा एक मोठा समारंभ साप्ताहिक विजयंतमार्फत सांगली येथे आयोजित केला जातो.
प. पू. गोळवलकर गुरुजी यांचा जन्मदिवस म्हणजेच माघ वद्य एकदशी विजया एकादशीला प्रतिवर्ष हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या आर्थिक मदतीमुळे या शाळांच्या कामाला थोडा हातभार लागतो, परंतु या शाळा लोकांसमोर आल्यामुळे त्यांना त्यानंतर अनेक देणग्या मिळतात, अशी उदाहरणे आहेत. सांगली नगरात कामगारांच्या वस्तीत कानिटकर आजी यांची सिद्धिविनायक शाळा अशी एक छोटी शाळा चालत होती, ती शाळा शोधून त्या शाळेला आर्थिक मदत देण्यात आली. संस्थेची आर्थिक मदत थोडी असली, तरी लोकांसमोर ही शाळा आल्यामुळे एका पत्र्याच्या खोलीत चालणारी या शाळेचे रूपांतर आता तीन मजली इमारतीत झाले आहे आणि केवळ शाळेची इमारत झाली नाही, तर ज्यांच्या घरी शिक्षणाचे संस्कार नाहीत अशा कामगार वस्तीतील या शाळेत शिक्षण घेणारी मुले आता स्पर्धा परीक्षांना बसत आहेत आणि त्यातील अनेकांना चांगल्या नोकऱ्याही लागल्या आहेत. त्यामुळे समाजात चांगले काम करणाऱ्या संस्थांना अशा प्रकारची आर्थिक मदत देऊन या संस्थांच्या कार्याला हातभार लावण्याचे काम साप्ताहिक विजयंतमार्फत केले जाते.

सुरुवातीला साप्ताहिक विजयंतचे स्वतःचे कार्यालय नव्हते. डॉ. केळकर यांच्या कृपाशीर्वादाने एका छोट्याशा जागेत हे साप्ताहिकाचे काम केले जात असे; परंतु २०१९ साली संस्थेचे स्वतःचे कार्यालय उभे राहिले आहे. आता संस्थेचे आणि साप्ताहिकाचे असे काम या कार्यालयातून चालते. साप्ताहिकला कुठलाही व्यवस्थापनाचा खर्च नाही, कारण सर्व कार्यकर्तेच साप्ताहिकासाठी काम करीत असतात. माधव बापट स्वतः संपूर्ण वेळ साप्ताहिकासाठी देतात. साप्ताहिकमध्ये दर आठवड्याला एक अनुवादित कथा, एक समुपदेशनावर आधारित लेख, राजकीय लेख तसेच सामाजिक उपक्रम आणि सध्या कार्यकारी संपादक असलेले अजय तेलंग यांचा अग्रलेख प्रत्येक अंकात असतात व याशिवाय प्रासंगिक म्हणजे पंढरीची वारी, अयोध्येच राम मंदिर अशा विषयांवर सुद्धा विविध लेखकांचे लेखही घेतले जातात. असा प्रत्येक आठवड्याला गेली ५८ वर्षे हा अंक अखंडितपणे प्रकाशित होत आहे. आज पंधराशे जणांकडे हा अंक पोहोचतो आहे. साप्ताहिक विजयंतचा दिवाळी अंकही वैशिष्ट्यपूर्ण असा असतो. दिवाळी अंकातही अनेक मान्यवरांचे वैचारिक लेख, लेख, कविता वाचकांना वाचायला मिळतात. त्याशिवाय संस्थेतर्फे प्रासंगिक उपक्रमही राबविले जातात.

येत्या २२ जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिर राम मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. त्यानिमित्ताने १८ जानेवारीला सामूहिक रामरक्षा पठण आणि राम तांडव नृत्य असा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांगलीतील विद्यार्थ्यांनी राम तांडव नृत्य बसविले आहे. अशा तऱ्हेने राष्ट्रीय विचार पोहोचविण्यासाठी संस्थेतर्फे साप्ताहिक, दिवाळी अंक, व्याख्यानमाला आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत इ. कामे सुरू आहेत.

joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -