- पाचवा वेद : भालचंद्र कुबल
मध्यंतरी एक व्हीडिओ क्लिप नाट्यवर्तुळात प्रचंड व्हायरल झाली होती. नसिरुद्दीन शहांच्या एका भाषणाची ती क्लिप होती. त्यात ते पोटतिडिकेने सांगत होते, “आजच्या परीस्थितीत कुणीही तुम्हाला येऊन तुझं नाटक करतो म्हणून सांगायला येणार नाही. तुम्हीच एकत्र या, तुम्हीच सादर करा. नाटक करायला काय लागतं? एखादी छान संहिता, दोन पात्रं आणि पाच प्रेक्षक..! नाटकासाठी प्रचंड मोठे थिएटर, हजारोंच्या संख्येने प्रेक्षक असायलाच पाहिजेत असं नाही. मला जे म्हणायचंय, मला जे द्यायचंय, ते मला माझ्या प्रेक्षकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवता आलं पाहिजे.” शहांचे हे प्रभावी वक्तव्य परिणामकारक ठरेल का? किंवा किती तरुण रंगकर्मी याचा पाठपुरावा करतील? या विचारात असतानाच, “कुणी गोविंद घ्या..?”चा प्रयोग पाहायचा योग आला. दीपेश सावंत या तरुण लेखक-दिग्दर्शकाने त्याच्या वयाच्या रंगकर्मींना घेऊन उभारलेलं नाटक म्हणजे त्याच उर्मीचा प्रत्यय म्हणावे लागेल. कुठल्याही निर्मितीत व्यावसायिक दृष्टिकोन ताकदीचा असावा, ज्यातून आर्थिक गणिते, थोडीफार का होईनात, सुटत जावीत, हाच नवा पोस्ट कोविड पायाभूत विचार उदयास आल्याने, हे नाटकही त्यास अपवाद नाही.
मोनाली तांगडी, शेखर दाते, दुर्वा सावंत आणि सुप्रिया गोविंद चव्हाण या चार निर्मात्यानी एकत्र येऊन कुठलाही व्यावसायिक आविर्भाव न आणता या नाटकाची निर्मिती केली आहे. सध्याचे दिवस नाटकांसाठी चांगले नाहीत. चांगले दिवस यायला, काय काय कसरती केल्या. म्हणजे मराठी प्रेक्षक नाट्यगृहापर्यंत येतील हे संशोधन जवळपास प्रत्येक निर्माता करत असेल; परंतु प्रयोगमूल्य जर मर्यादित ठेवले आणि जास्तीत जास्त प्रयोग कसे होऊ शकतील, याचा व्यावहारिक विचार केल्यास कदाचित थोडेफार यश मिळू शकेल, याबाबत ही मंडळी आशावाद बाळगून आहेत. तीन पात्रांत खेळवता येईल असे सुटसुटीत कथानक, प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकवर्गाचा विचार, विनोदी आशयाने विचार मांडण्याची पद्धत, हे सर्व एलिमेंट असलेलं नाटक फॅब्रिकेट करणं खूपच अवघड काम असतं, कारण असे फॅब्रिकेशन बऱ्याचदा खोटे, बेगडी अथवा प्लास्टिकचे (कचकड्याचे) होऊ शकते; परंतु या नाटकाबाबत तसे अनुमान काढता येणार नाही. लेखकाने अगदी सहजवृत्तीने पात्रापात्रांमधला संघर्ष उभा करताना विनोदाशैलीचा वापर केला आहे. ही विनोदीशैली नाटकाचा साधारणतः दोन तृतीयांश आवाका व्यापते. उरलेले एक तृतीयांश नाटक मात्र अभिनयाधिष्ठित ठेवण्याची कमाल दिग्दर्शकाने केली आहे.
प्रेमविवाह झाल्यावरही एकमेकांच्या स्वभावाला कंटाळून आपल्या वकील मित्राद्वारे घटस्फोट घेण्यासाठी त्यालाच आपल्या घरात राहायला लावून निर्णय घ्यायला भाग पाडण्याची गंमत, हेच या नाटकाचे संक्षिप्त कथानक. प्रसाद रावराणे, विभूती सावंत आणि सिद्धेश नलावडे हे तिघे नाटकाचा डोलारा व्यवस्थित तोलून धरतात. या तिघांना हौशी रंगभूमीवर काम करण्याचा अनुभव आहे. राज्यनाट्य स्पर्धा किंवा एकांकिका स्पर्धांमधून यांचा अभिनय पाहण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे नटाला आवश्यक असणारी अभिनय समज तिघांकडेही आहे, याबद्दल खात्री देता येईल. या नाटकाची कथा तीन स्थळांवर घडते पैकी बगीच्यात घडणारा एक प्रसंग सोडला, तर एका फ्लॅटच्या पार्श्वभूमीवरच नाटक उभे केले गेले आहे. लेखनात काही अंशी फ्लॅशबॅक पद्धत आहे पण ती दिग्दर्शकाच्या ताब्यात गेल्याने, प्रकाशयोजनेतील बदलाद्वारे अधोरेखित होते. मुळात हे कसलेच अवडंबर नसलेलं खरंखुरं नाटक आहे. दीपेश सावंत या तरुण दिग्दर्शकाने छोट्या छोट्या दिग्दर्शकिय क्लृप्त्या अखंड नाटकभर शिताफीने वापरल्या आहेत. त्यामुळे घटस्फोटासारख्या कथानकात दोन पात्रांच्या संघर्षात ताणतणाव न येऊ देता प्रेक्षकांना रिलॅक्स ठेऊन गोड शेवटाकडे नेण्याची किमया दिग्दर्शकाने चांगली हाताळली आहे.
नाटकाचा उत्तरार्ध मात्र विभूती सावंत ही नवोदिता अभिनय कौशल्याने खेळवते. मूल न होऊ देण्यामागची कारणमिमांसा स्पष्ट करतानाच्या फ्लॅशबॅकमधील दुसऱ्याच्या बाळाचा अनावधानाने झालेल्या अपघात प्रसंगातील अभिनयाला तोड नाही. याच फ्लॅशबॅकने नाटकास अचानक वळण मिळाल्याने नाटकभर प्रसाद रावराणे आणि सिद्धेश नलावडे, जी बॅटिंग करत असतात, ती विभूतीपुढे निष्प्रभ ठरत जाते. मात्र हेच दोघे नाटकाचा पूर्वार्ध अशा पद्धतीने रंगवत नेतात की, विभूतीच्या अभिनयाबाबत प्रेक्षकवर्ग थोडा गाफील रहातो. ही जाणते किंवा अजाणतेपणी घडलेली दिग्दर्शकिय किमया असावी, असं मला वाटतं. मुद्दामहून हे न घडता सहजरीत्या घडलेला तो बॅलन्स असावा.
नुकतेच आलेलं किरकोळ नवरे, डाएट लग्न आणि कुणी गोविंद घ्या अशी तीन तीन नाटके एकाच पठडीतील आहेत. त्यामुळे सुज्ञ प्रेक्षकवर्गाने नाटकाची माहिती काढल्याशिवाय यापैकी कुठल्याही नाटकास जाऊ नये. पैकी माझा नाटक बघण्याचा कल मात्र नवोदित रंगकर्मीद्वारा व्यावसायिक मंचावर सादर होणाऱ्या “कुणी गोविंद घ्या…?” या नाटकाकडे असेल. रंगभूमी अथवा मालिका गाजवलेली प्रस्थापित नटमंडळी या नाटकात नाहीत, भव्यदिव्य डोळे दीपवणारा सेट इथे नाही, रंगीबेरंगी प्रकाशयोजना इथे नाही, ओसंडून वहाणारा कपडेपट इथे नाही किंवा शहाणपण शिकवणारं हे बोधप्रद नाटकही हे नाही, तरीही हे नाटक आपलेसे वाटते, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या नाटकातील प्रत्येकजण ज्येन्युअली नाटक जगतो. म्हणूनच नवोदितांची नाटकं बघणंही मनावर घ्यायला हवं. नाटक जगायला हवं. अशा रंगकर्मींची मेहनत आणि खऱ्या सादरीकरणाची ओढ वाया जाऊ नये म्हणून “कुणी गोविंद घ्या…!” प्रश्नचिन्ह दूर सारून बघायला हवं.