ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव जिवंत, चित्रमय संवाद रेखाटतात याची अनेक उदाहरणे सापडतात. अर्जुनातील गुणांचं, स्वभावाचं अतिशय साजेसं वर्णन ज्ञानेश्वरीत श्रीकृष्णांच्या तोंडी येतं. ते वाचताना वाटतं, जणू श्रीकृष्ण आणि अर्जुन खरंच आता बोलत आहेत. या साऱ्या दाखल्यांतून ज्ञानदेवांची लेखणी ही अमृताची पुरवणीच असल्याचे प्रतीत होत राहते आणि वाचक माऊलींच्या लेखणीत गुंतून जात असतो.
हे (कौरव) म्हणतील “गेला रे गेला! अर्जुन आम्हांस भिऊन पळून गेला!” अरे, असा हा दोष तुझ्यावर आलेला चांगला का?
‘हे म्हणती गेला रे गेला। अर्जुन आम्हां बिहाला।
हा सांगे बोलु उरला। निका कायी॥ ओवी क्र. २०८
अर्जुनाला समजावताना आलेला हा श्रीकृष्णांचा संवाद! ज्ञानदेव किती जिवंत, चित्रमय संवाद रेखाटतात याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण! ‘ज्ञानेश्वरी’च्या दुसऱ्या अध्यायात आलेली ही नाट्यमय ओवी आहे.
कौरवांची दया येऊन रणांगणावरून माघारी फिरू पाहणारा अर्जुन! त्याचं समुपदेशन (counselling) करणारे श्रीकृष्ण! अर्जुनाला त्यांच्या लढण्यासाठी प्रवृत्त करताना त्यांच्या तोंडी ज्ञानदेवांनी जे संवाद दिले आहेत, ते लाजवाब!
श्रीकृष्ण सांगतात – ‘अर्जुना, तुझी अपकीर्ती होईल’ हे सांगताना ते अर्जुनाच्या बुद्धीला आणि हृदयाला साद घालतात. अर्जुनासारख्या महाबलाढ्य वीराला स्वतःविषयी ‘गेला रे गेला। अर्जुन आम्हां बिहाला।’ हे ऐकून साहजिकच वाईट वाटेल, त्याच्यातील स्वाभिमान जागृत होईल. ‘मी लढतो’ असे तो म्हणेल, अशी ताकद देणारी ही ओवी आहे.
ज्ञानदेव दाखवून देतात की श्रीकृष्ण नाना प्रकारे अर्जुनाला लढाईसाठी तयार करतात. त्यातील हा एक प्रभावी मार्ग की त्याच्यातील ‘स्व’ आणि पराक्रमाला जाग आणणं, न लढल्यास त्याची अपकीर्ती होईल हे त्याला ऐकवणं. पुढे दुसरा मार्ग म्हणजे त्याच्या पराक्रमाचं वर्णन करणं, ती आठवण करून देणं. श्रीकृष्णाच्या मुखातून अर्जुनाच्या वीरतेचं वर्णन येतं. ते ज्ञानेश्वरांमधील कवीची प्रतिभा दाखवणारं!
श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ‘देशांतरीचे राजेरजवाडे, स्तुतिपाठक होऊन तुझी कीर्ती गातात, ती ऐकून यमादिकदेखील तुला भितात!’
‘त्या कीर्तीचा महिमा गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मल व गहन आहे आणि तो ऐकून जगातील मोठमोठे योद्धेही स्तब्ध होतात.’
ती ओवी अशी –
दिगंतींचे भूपती। भाट होऊनि वाखाणिती।
ऐकिलिया दचकती। कृतांतादिक॥ ओवी क्र. २१२
किती दिव्य कल्पना आहे ज्ञानदेवांची! ‘दिगंतीचे भूपती’ या शब्दाचा अर्थ ‘देशोदेशींचे राजे.
माऊली मात्र ‘दिगंतीचे भूपती’ असा खास शब्द योजतात. यात ‘त’ या अक्षराच्या पुन्हा येण्यातून एक लय लागते! पुन्हा ‘दिगंत’ या शब्दातून अर्थही व्यापक झाला आहे. या शब्दाद्वारे दिव्यता, भव्यता साकारते. तसेच भूपती हा शब्दही खास! ‘भू’चा पती यातून राजांची स्वामित्व भावना जाणवते. असे बलाढ्य ‘भूपती’ तुला (अर्जुनाला) वाखाणिती. या ‘वाखाणिती’मध्येही ‘त’ची नादमयता आहेच! पुढे येतं – ‘ज्या यमराजाला सर्व जग घाबरतं, तो यमराजदेखील तुला घाबरतो, असा अर्जुना तुझा महिमा!’ या दाखल्यातून ज्ञानदेव, अर्जुनाचा प्रचंड पराक्रम नेमक्या उंचीवर नेतात. याच दृष्टीतून पुढचा दाखला देखील पाहता येतो. अर्जुन कीर्तिमान आहेच. विशेष म्हणजे ती कीर्ती सरळ मार्गाने जाऊन मिळालेली आहे, म्हणून विशेषण येतं ‘गंगेप्रमाणे निर्मल व गहन असा कीर्तीचा महिमा!’अर्जुनातील गुणांचं, स्वभावाचं असं साजेसं वर्णन ‘ज्ञानेश्वरी’त श्रीकृष्णांच्या तोंडी येतं. ते वाचताना वाटतं, जणू श्रीकृष्ण आणि अर्जुन खरंच आता बोलत आहेत. असे भगवान मग आपलेही आधार होतात. ज्ञानेश्वरी लेखनाला सातशे पंचवीसपेक्षा अधिक वर्षं लोटली, तरी आजही ते आपले दीपस्तंभ होतात! या दीपस्तंभांना साष्टांग नमन!
(manisharaorane196@gmail.com)
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…