अंगणात उगवलं
‘पैशाचं’ झाड;
अंगभर लगडून
पैशाचं घबाड!
वाऱ्यावर झूऽम झूऽम
इकसडून तिकडे झुले;
पैशांच्या पाचोळ्यावर
डल्ला मारती मुलें!
खण् खण् छन् छन्
नाण्यांचा पडे पाऊस;
मडकी भरून वाहू लागली
पुरतीच फिटली हौस!
एकच झाली झोंबाझोंबी
मुठी, खिसेही भरले;
पोतीही कमी पडली
तरी, पैसे पुरून उरले!
सारे झाले श्रीमंत
सुखात लागले लोळू;
शाळा, अभ्यास सोडून सारें
उनाड लागले खेळू!
पैशासाठी नियत फिरली
मुले लागली भांडू;
दगड मारून झाडावरती
लागले पैसे पाडू!
झाड झालं रक्तबंबाळ
बापडे लागले रडू;
म्हणाले “देवा आता धाव इथें,
भलतंच लागलंय घडू”!
देवाने मग ‘अभय’ दिलं, नि
कात टाकली झाडाने;
पैसे झाले गायब,
फुटली फुलं-फळं-पानें!
तेव्हापासून झाड बघा
जगतेय आनंदात;
फुलां-फळांनी बहरून
अपुले जीवन गाणे गात!
– पांडुपुत्र (डाॅ. प्रा. प्रकाश पांडुरंग गोसावी), कल्याण प.
हळूच कशी विरघळले
शब्दांच्या गोड मिठीत
छुम छुम अक्षरांवरच
जडलीय माझी प्रीत…१
शब्दांची गोजिर नक्षी
अलवार घेतली कोरून
सुखओंजळीत प्रेमाच्या
स्वप्न घेतेय सजवून…२
आठवांचा हिंदोळा झुले
शब्द सरींच्या प्रांगणी
क्षितिजही समीप भासे
लखलखत्या नभांगणी…३
शब्दवेल्हाळ माधुर्याचा
जीवनी आला गोडवा
निसर्ग नवेलीने जणू
केसात माळलाय मारवा…४
आयुष्याच्या घरट्यातून
सजवू मनाचा देव्हारा
अक्षरज्योतीने उजळे
शब्दचांदण्यांचा गाभारा…५
– सपना भामरे, ठाणे
पावसाच्या सरीत ढगांचा खेळ
त्याक्षणी जमतो प्रेमाचा मेळ
मातीचा सुगंध दरवळतो श्वासात
त्याक्षणी निश्चित जागा होते मनात
चहुकडील सृष्टी भासते नवी
त्याक्षणी मनातली नवलाई देखील हवी
हिरवेगार गालिचे नाचवते मनाला
त्याक्षणी क्षणभंगुर अर्थ देते आयुष्य जगण्याला
रिमझिम बरसतो आणि निवांत वारा
त्याक्षणी गरमागरम भजी अन् चहाच्या धारा
नेहमीच्या वेळा बाजूला ठेवशील का? पावसात माझ्यासोबत भिजशील का? कामाचे ना कारण ना भाव देऊस
येतोस ना संदीप पावसात भिजायला की तुला उचलून नेऊ?
– रसिका मेंगळे, मुलुंड (पूर्व)
वस्त्र माझ्या जीवनाचे
सांधले अलवार मी
वेचूनी धागे सुखाचे
गुंफली जरतार मी||ध्रु||
उसवले काही क्षणांचे
भोवती धागे जसे
लिंपले मी प्रेम थोडे
बांधले नाते असे
त्या सुखाला आठवाने
कोंडले माझ्यात मी ||१||
वस्त्र माझ्या जीवनाचे
सांधले अलवार मी
वेचूनी धागे सुखाचे
गुंफली जरतार मी||ध्रु||
रेशमाचे पदर रंगीत
खुलुनी हसले वेगळे
मंद वारे लहरताना
मन पिसांचे सोहळे
किरण तेजाचे निघाले
नाहले किरणात मी||२||
वस्त्र माझ्या जीवनाचे
सांधले अलवार मी
वेचूनी धागे सुखाचे
गुंफली जरतार मी||ध्रु||
घालूनी टाके मनाचे
गुंफले सुख रेशमी
स्वच्छ केलाआरसा
अन घेतली त्याची हमी
तेज सारे भावनांचे
झिरपले माझ्यात मी
झिरपले माझ्यात मी||३||
वस्त्र माझ्या जीवनाचे
सांधले अलवार मी
वेचूनी धागे सुखाचे
गुंफली जरतार मी||ध्रु||
– मानसी मोहन जोशी, ठाणे
एकदा एका पत्रकाराची
घेतली पक्ष्याने मुलाखत |
पण त्यानेच त्याच्यासमोर
मांडले त्याचे मनोगत |
काय राव, तुमच्याच राज्यात
पडतो का फक्त पाऊस |
आम्ही पण भिजत असतो
हे तुम्हास नाही का ठाऊक |
आमची घरटी असतात मातीची
जातात ती कोलमडून |
कोणीही येत नाही तिथे
फुकटची मदत घेऊन |
वाऱ्याावरती झुलत असते
घरटे ते सुगरणीचे |
वादळाच्या तडाख्यात तुटले तरी
अनुदान मागते का मदतीचे? |
आमची घरटी आम्हीच विणतो
मेणाची कोणी बांधून देत नाही |
सरकारकडून मदतीची
वाट कधी बघत नाही |
म्हणून म्हणतो ऐक माणसा
आमचे थोडे निवेदन |
झाडे लावून , झाडे जगवून
कर त्यांचे संवर्धन |
विकासाच्या नावाखाली
जंगलतोड तुझी राहू दे |
आमचे आहे जंगल ते
आमच्यासाठीच बहरू दे |
आमचे आहे जंगल ते
आमच्यासाठीच बहरू दे ||
– गौरी असित थत्ते, दापोली
पाऊस म्हणजे गार वारा
घेऊन येतो पावसाच्या धारा…
पाऊस म्हणजे सगळीकडे हिरवळ
काढून टाकतो मनाचा मरगळ…
पाऊस म्हणजे माणसाची प्रवृत्ती
मानवास वागण्यास सांगतो प्रकृती…
पाऊस कधीकधी बरसतो भरभराट
मात्र कधीकधी शेतीचेही करे नायनाट…
पाऊस कधी मनसोक्त बरसतो
प्रेमीयुगेलास मात्र पर्वणी ठरतो…
पावसाचे पाणी गालावर ओघळणारे
त्याक्षणी डोळ्यांतली अश्रू ओघळणारे…
पावसात चातकाला मिळे पाणी
सर्वत्र पावसासंगे गाऊ लागे गाणी…
पावसाच्या बरसण्याने कोणाचे हरवलेले क्षण
तर कोणी पावसात हलके करतो मन…
– रसिका मेंगळे, मुलुंड, पूर्व
गहिवरला आज दिनी
अव्यक्त भाव मनातला |
रूप शब्दांचे घेऊनी
कागदावरी उतरला ||१||
देवब्राह्मणांच्या साक्षीने
सौभाग्य लेणे सजले |
प्रेमसरींच्या वर्षावात
मन माझे मोहरले ||२||
अंधारातही साथीला
प्रीत काजव्यांचे चांदणे |
सुख, समाधानाच्या सरींनी
असेच नयनांतूनी बरसणे ||३||
लुप्त होणारे अवसेला
नको पौर्णिमेचे चंद्रतारे |
दीपस्तंभासम प्रेम सख्याचे
मज अहर्निश सावरणारे||४||
अनुपमेय प्रेम आपुले
जगण्याचा आधार बनले |
सुखदुःखाच्या भट्टीमध्ये
जीवन सुवर्ण झळाळले ||५||
भय ना वाटते मला
संसारातील तापत्रयाचे |
प्रेम, विश्वासानेच झाले
दृढ रेशमीबंध नात्यांचे ||६||
आनंद, तृप्तीच्या सरींनी
ओंजळ सदैव भरू दे |
अमृतवेल सहजीवनाचा जन्मोजन्मी बहरू दे||७||
– दीपाली सुनील वाणी, ठाणे
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…