माझे कोकण: संतोष वायंगणकर
मुंबईतील महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात कणकवली – देवगड – वैभववाडीचे आ.नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केटयार्ड नांदगाव या मध्यवर्ती आणि सोईच्या ठिकाणी व्हावे अशी मागणी राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे करण्यात आली. पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनीही आ. नितेश राणे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. उपसचिवांना मार्केटयार्डचा प्रस्ताव बनविण्याच्या सूचनाही दिल्या. सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीत उभं राहणारं हे मार्केटयार्ड केवळ सिंधुदुर्गलाच उपयुक्त ठरेल असे नाही, तर रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांनाही याचा लाभ घेता येण्यासारखा आहे.
कोकणात आंबा, काजू, कोकम, चिवाकाठी, जांभुळ, करवंद असं बरंच काही आहे; परंतु यातलं कशाचंही मार्केट निटपणाने बागायतदार शेतकरी यांना मिळतच नाही. बरं गेल्या अनेक वर्षांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला आंबा आजही नवी मुंबईच्या फळ, फुले मार्केटमध्ये हातरूमालाच्या खालून बोटामध्ये त्याची किंमत होते. वाशी मार्केटमधील गेली अनेक वर्षे आंब्याची दलाली करणारा दलाल कोकणातील आंब्याचा दर ठरवत आला आणि कोकणातील बागायतदार शेतकरीही दलाल ठरवेल तो दर आणि दलाल आंब्याची पाठवेल ती पट्टी याच पट्टीतून आंब्याची किंमत बागायतदाराला कळवली जाते. गेली अनेक वर्षे रुमाला आडचा हा आर्थिक व्यवहार सुरू आहे.
संगणक आणि ऑनलाइनच्या जमान्यातही हा आर्थिक व्यवहार अशाच पद्धतीने होतो. काजू ‘बी’ला शासनाने हमीभाव दिलेला नाही. यामुळे व्यापारी ठरवतील तो काजू ‘बी’चा दर अशी स्थिती आहे. यातच आफ्रिकन काजू ‘बी’ मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये येतो. यामुळे कोकणातील चविष्ट असणारा काजूगराला योग्य दर मिळत नाही. चिवाकाठीच्या बाबतीतही तीच स्थिती आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होऊ शकतो. ही संकल्पनाच कोकणात तरी ती म्हणावी तशी रुजलेली नाही. कोकणातील देवगड, वेंगुर्ले, मालवण, राजापूर, लांजा, रत्नागिरी भागात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादित होतो. कोट्यवधी रुपयांची आंब्याची उलाढालही होते; परंतु मार्केटयार्ड नसल्याने कोकणात उत्पादित होणाऱ्या फळांना योग्य मार्केट उपलब्ध नाही.
राज्य सरकारच्या पुढाकाराने नांदगाव येथील नियोजित मार्केटयार्डमुळे कोकणातील फळ, मासे, चिवाकाठी अशा अनेक उत्पादित वस्तूंना निश्चितच चांगलं मार्केट उपलब्ध होऊ शकेल. मध्यल्या कोरोना कालावधीत आंब्याच्या बाबतीत एक नवीन मार्केट मिळालं. कोकणातील आंबा बागायतदारांच्या बागेमध्ये येऊन अनेक व्यापारी आंबा खरेदी करू लागले किंवा कोल्हापूर, सोलापूर, पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये शेतकरी पेटी आंबा खरेदीदाराच्या दारात नेऊन देऊ लागला. यामध्ये बागायतदार शेतकरी अधिकचे पैसे मिळवू लागला. हे सगळं जरी खरं असलं तरीही कोकणसाठी मार्केटयार्डची उभारणी करण्यात आली पाहिजे. फळ, मासे याला योग्य दर आणि योग्य पद्धतीने साठवणूक करण्यासाठी मार्केटयार्ड असलं पाहिजे. ती सिंधुदुर्गची, कोकणची खरी गरज होती. सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होऊन २३ वर्षे झाली. या २३ वर्षांत कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रयत्न जरूर केलेत; परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. मुळातच मार्केटयार्ड असतं ही कल्पना कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांनी कधी मनाकडेच येऊ दिली नाही. मार्केटयार्डचे कोणते फायदे याचाही विचार केला नाही. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात याच मार्केटयार्डमुळे गुळाने जगभराच मार्केट प्राप्त केलं. नव्या तंत्रज्ञाने गूळ निर्मिती झाली आणि मार्केटयार्डमुळे कोणत्याही वस्तूचं, फळांचं ग्रेडिंग होऊ लागलं. त्याचा चांगला परिणाम झाला. वस्तूला आणि फळांना निर्यात करता येऊ लागले. दर्जा आणि गुणवत्ता द्यावीच लागते. दर्जा राखल्याशिवाय मार्केटमध्ये टिकाव लागूच शकत नाही. मार्केटयार्डमुळे सर्व फळबाजार एकाच छताखाली येईल. त्याची खरेदी-विक्री मार्केटयार्डमध्येच होईल.
आ. नितेश राणे यांनी मार्केटयार्ड नांदगाव येथे उभारणीची मागणी करण्यामागे दूरदृष्टिकोन त्यामागे आहे. देवगड, मालवण, वेंगुर्ले, विजयदुर्ग या भागांतून मासे, आंबा एक दीड तासांत नांदगावच्या मार्केटयार्डमध्ये येऊ शकेल. नांदगाव रेल्वे स्टेशन आहे. खास बोगीतून फळ, मासे एक्सपोर्ट होऊ शकतात. मार्केटयार्डमध्ये मोठमोठाली शितगृह उभारणी होणार असल्याने निश्चितच शितगृहाचा वापर, फळ, मासे साठवणुकीसाठी करता येऊ शकेल. आज कठीण वाटणाऱ्या अनेक समस्या या एका मार्केटयार्डच्या निर्मितीने सुटतील. कोकणची अर्थव्यवस्था या मार्केटयार्डमुळे अधिक गतीमान होईल, बळकट होईल. यासाठी मार्केटयार्डच्या लवकरात-लवकर उभारणीसाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. आ. नितेश राणे यांच्या विकासाच्या दूरदृष्टीने काम करण्याच्या कार्यपद्धतीतील कोकणच्या विकासातील हे नवं, पुढचं पाऊल असंच म्हणावं लागेल.
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…
जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…