बरेचदा आपण गड-किल्ले पाहतो आणि घरी परततो. मनातल्या मनात अनेकांना दोष देतो. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यांची अवस्था पाहवत नाही. या किल्ल्यांच्या दुरवस्थेसाठी जबाबदार कोण व त्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्नच असला तरी पण ‘पर्यटक’ म्हणून आपण नेमके काय करतो नि काय करायला हवे? याचाही विचार करायला हवा.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूरला जावे लागले आणि कित्येक वर्षांपासून मनात असलेला ‘पन्हाळा गड’ पाहण्याचा योग जुळून आला. आधी पाहिलेले रायगड, शिवनेरी, अजिंक्यतारा किल्ला या सर्व पार्श्वभूमीवर ‘गड’ कसा असतो हे कुठेतरी अनुभवलेले होते; परंतु हा गड थोडासा वेगळा वाटला. याचे कारण कुठेही चढावे लागले नाही. गाडी गडावरच्या प्रत्येक ठिकाणापर्यंत जात होती. त्यामुळे फक्त गाडीतून उतरून ते ठिकाण पाहता येत होते. तसे पन्हाळा गड पाहण्यासाठी अत्यंत आकर्षक अशी एक छोटी बससुद्धा तिथे मला दिसली.
अनेकांना गड पाहायचे असतात; परंतु गड पाहण्यासाठी खूप चढण असते. साधारण पन्नाशी उलटल्यावरच अलीकडे माणसांना आपल्या संसारातून, कामातून थोडासा मोकळा वेळ मिळतो. थोडासा पैसाही हाती असतो. या वयापर्यंत चांगले मित्र-मैत्रिणी जमवलेले असतात आणि मग एकमेकांच्या सोबतीने सहली काढल्या जातात. जेव्हा सहलींचा विषय येतो तेव्हा ‘गड-किल्ले’ म्हटल्यावर अर्धे जण तिथेच गळून जातात. उर्वरित अर्धे खूप हिम्मत करून येतात; परंतु ‘गड चढणे’ त्यांना अवघड होऊन जाते. काही अर्ध्यापर्यंत चढून तिथूनच माघारी फिरतात. या पार्श्वभूमीवर मला पन्हाळा गडाविषयी सांगायचे आहे की, तिथे चढण्यास असमर्थ असलेला कोणीही संपूर्ण गड आरामात पाहू शकतो.
आता थोडेसे गडाविषयी – आपण उत्साहाने गड पाहू लागतो आणि लक्षात येते की, गडाच्या रक्षणार्थ पुरेसे मनुष्यबळ तिथे नाही. याचा फायदा अनेक प्रकारे पर्यटक घेतात. आता पहिल्याच ठिकाणी आत जाण्यासाठी आम्ही वळलो, तेव्हा दारात असलेल्या पाटीवरचा मजकूर पूर्णतः मिटलेला होता. लोखंडाची पाटी अर्धी-अधिक गंजलेली होती. इथे विचारण्यासाठी कोणी माणूस की गाईडही नव्हता. त्यामुळे गडावरचा हा कोणता भाग, कोणते ठिकाण आपण पाहतोय हे कळायलाच मार्ग नव्हता.
‘प्री-वेडिंग शूटिंग करण्यास बंदी आहे तसे आढळल्यास दंड आकारला जाईल.’ अशी पाटी गडावरच्या एका ठिकाणी वाचायला मिळाली.
आत गेल्यावर तिथे ‘प्री-वेडिंग शूटिंग’ चालू होते की नाही यावर मला भाष्य करायचे नाही. गडावर अनेक ठिकाणी अनेक पाट्या होत्या, त्या कोणालाही वाचता येतील अशा ठिकाणी असूनही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करत होते. जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या असंख्य मावळ्यांनी सर्वस्व पणाला लावले, अशा गड-किल्ल्यांची अवस्था पाहवत नाही. गडावरच्या भिंतींवर वाढलेल्या झाडांमुळे त्यांची होत असलेली पडझड, वाढलेले गवत आणि कचरा, जागोजागी पाणी तुंबून सुटलेली दुर्गंधी या गोष्टीकडे लक्ष देणे कोणाच्या अखत्यारीत येते, माहीत नाही. सामान्य पर्यटकांनी अशा सगळ्या गोष्टींसाठी कोणाकडे तक्रार करायची हे कळत नाही. परत त्यावर काही बोलावे-लिहावे, तर कदाचित त्याविषयी काही चौकशा होऊ शकतात, त्याचे पुरावे मागितले जाऊ शकतात, यासाठीही आपण अशा गोष्टी टाळतोच!छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, त्या काळातले दगडी बांधकाम, स्थापत्यशास्त्रातले नमुने, काही चिन्हांचे अर्थ, अप्रतिम कलाकुसर, पाणी-धान्य साठवण्याची कोठारे, हत्ती-घोडे-शेळ्या-मेंढ्या-गाई-म्हशी-कोंबड्या वगैरे यांचा ऊन-पावसापासून बचाव करण्यासाठी बांधलेले शेड, उभारलेल्या छावण्या हे सगळे इतिहासाच्या पुस्तकातून आपण वाचलेले असते. ते प्रत्यक्षात पाहायला मिळते का? देशरक्षक, रयतेचा राजा, राज्यातल्या प्रत्येकाची काळजी घेणारे छत्रपती शिवाजी महाराज कसे होते? त्यांनी नेमके काय केले? याचा इतिहास अशा गड-किल्ल्यांवर नवीन पिढीला घेऊन जाऊन गाइडद्वारे समजावून सांगण्याची गरज आहे. पण नवीन पिढीला अशा ठिकाणांना भेट द्यावीशी वाटते का? असे काही प्रश्न मनात उभे राहिले.
हे सगळे प्रश्न माझ्यासारखे अनेकांच्या मनात उभे राहतात. आपण गड-किल्ले पाहतो आणि घरी परततो. मनातल्या मनात अनेकांना दोष देतो. पण ‘पर्यटक’ म्हणून आपण नेमके काय करतो, नेमके काय करायला हवे?, याचा थोडा विचार करूया!
pratibha.saraph@gmail.com
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…