माणूस हा खरं तर ईश्वराचा अंश आहे, पण त्याला याची जाणीव नसते. ‘मी’ म्हणजे ‘माझा देह’ आणि ‘मी कर्ता आहे’ अशा भावनेने तो जगत असतो, हे त्याचं अज्ञान होय; परंतु ईश्वरी कृपेमुळे त्याचा हा भ्रम नाहीसा होतो. मग संसारातील कोणत्याही गोष्टीची त्याला भीती कुठून वाटणार? कारण त्याचं चित्त परमेश्वराशी एकरूप झालेलं असतं.
‘जेव्हा भक्ताचे चित्त पूर्णपणे माझ्या ठिकाणी एकरूप होईल तो माझा प्रसाद होय’ असे भगवान म्हणतात. हा विचार सांगताना ज्ञानदेव एक साजेसा दाखला योजतात. सूर्यप्रकाशाची मदत डोळ्याला मिळाल्यावर मग अंधाराची किंमत आहे काय?
त्याप्रमाणे माझ्या प्रसादाने ज्याची जीवदशा नाहीशी झाली आहे, त्याला संसाराच्या बागुलबुवाची भीती काय?
ती ओवी अशी –
सूर्याचेनि सावायें। डोळा सावाइला होये।
तैं आंधाराचा आहे। पाडु तया?॥ ओवी क्र. १२७१
तैसा माझेनि प्रसादें। जीवकणु जयाचा उपमर्दे।
तो संसाराचेनि बाधे। बागुले केवीं?॥ ओवी क्र. १२७२
डोळ्याचे कार्य ‘पाहणे’ आहे, पण ते पाहण्याची शक्ती डोळ्याला सूर्यप्रकाश मिळाल्यावरच येते. सूर्यामुळे अंधार नाहीसा होऊन दृष्टी लाभते. हा दाखला देऊन ज्ञानदेवांना अज्ञानी जीवाविषयी सांगायचं आहे. माणूस हा खरं तर ईश्वराचा अंश आहे, पण त्याला याची जाणीव नसते. ‘मी’ म्हणजे ‘माझा देह’ आणि ‘मी कर्ता आहे’ अशा भावनेने तो जगत असतो, हे त्याचं अज्ञान होय. परंतु ईश्वरी कृपेमुळे त्याचा हा भ्रम नाहीसा होतो. स्वतः आणि इतर सर्वांमधील ईश्वरी तत्त्व त्याला जाणवतं. अशा वेळी मग संसारातील कोणत्याही गोष्टीची त्याला भीती कुठून वाटणार? कारण त्याचं चित्त परमेश्वराशी एकरूप झालेलं असतं. परमेश्वराशी चित्त एकरूप होणं, त्याची कृपा होणं म्हणजे सूर्यप्रकाश लाभणं होय. या दाखल्यात खूप अर्थ आहे. सूर्य हा महाबलशाली, तेजोमय, स्वयंप्रकाशित आणि संपूर्ण विश्वाचा आधार आहे. परमेश्वरी कृपा ह्या सूर्यप्रकाशाप्रमाणे आहे. या प्रकाशाने जीवाच्या ठिकाणी असलेलं अज्ञान म्हणजेच अंधार नाहीसा होतो. त्याचं आयुष्य उजळून निघतं. हा विचार मांडताना ज्ञानदेवांनी योजलेला दृष्टान्त किती नाट्यमय, काव्यमय आहे!
‘संसाराचेनि बाधें। बागुलें केविं?’ म्हणजे संसाराची भीती कोठून राहणार?
या प्रश्नात नाट्य आहे, ठसका आहे. अशी नाट्यमय प्रश्नयोजना हे ज्ञानदेवांच्या प्रतिभेचं खास वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरीत ठायी ठायी हे नजरेस पडतं. पुन्हा यात वापरलेला ‘जीवकणू’ हा शब्द किती सार्थ आहे!
यापुढे एक अप्रतिम ओवी येते. ती अशी -‘अरे अभिमानामुळे माझे हे सर्व बोलणे तुझ्या काना-मनाला शिवू देणार नाहीस, तर तू नित्यमुक्त व अविनाशी आहेस ते निरर्थक होईल व देहासंबंधीचा घाव तुझ्या अंगावर बसेल..’
मूळ ओवी –
अथवा हन अहंभावें। माझें बोलणें हें आघवें ।
कानामनाचिये शिवे। नेदिसी टेंकों॥ ओवी क्र. १२७४
तरि नित्यमुक्त अव्ययो। तूं आहासि तें होऊनि वावो।
देहसंबंधाचा घावो। वाजेल आंगीं॥ ओवी क्र. १२७५
अहंभावामुळे तू माझा उपदेश ऐकला नाहीस, तर किती भयंकर परिणाम होईल हे श्रीकृष्ण अर्जुनाला ऐकवतात. ज्ञानदेव ते आपल्यासमोर आणतात अशा प्रभावी पद्धतीने!
गुरू ‘चांगली गोष्ट कर’ असं शिष्याला सांगून थांबत नाही, तर ‘वाईट गोष्ट करू नको’, ती केल्यास काय परिणाम होतील ते स्पष्ट करून दाखवतो.
महर्षी व्यास व ज्ञानदेव हे असे ‘गुरू’ आहेत. त्यामुळे हा उपदेश ऐकल्यावर अर्जुनाप्रमाणे श्रोतेही चांगली गोष्ट करण्यास प्रवृत्त होतात, वाईट गोष्ट करण्यापासून परावृत्त होतात.
श्रोत्यांच्या मनातही हा उपदेश चांगल्या प्रकारे बाणतो. यात ज्ञानदेवांनी वापरलेली ‘कान व मन’ ही नादमय रचना सुंदर आहे. त्याचबरोबर ‘देहसंबंधाचा घाव’ म्हणजे देहासंबंधित गोष्टींनी घायाळ होणं ही कल्पनाही अर्थपूर्ण आहे. यातून त्याचं कविमन दिसतं. तसेच गीतेतील उपदेश श्रोत्यांना कळावा, त्यांच्या वागण्यात यावा ही तळमळ दिसते. त्यातून त्यांच्यातील ‘गुरू-मन’ जाणवतं. अशा गुरूंना, कविवर्यांना आपण आठवतो. त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. त्यांचा उपदेश आचरतो.
(manisharaorane196@gmail.com)
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…