आपण आपल्या लहानपणी आंधळी-कोशिंबीर हा खेळ खेळलो असू. त्यात डोळ्यांना पट्टी लावून लपा-छपी खेळायचे. हा खेळ खेळताना अनेकदा अगदी पहिल्या दहा-पंधरा मिनिटांतच आपण धडपडतो आणि अस्वस्थ होतो. मग अंध व्यक्ती किती संयमाने, शांतपणे व धाडसाने आयुष्याला सामोऱ्या जात असतील?
आपल्या समाजातील अंध व्यक्तींप्रती आपला दृष्टिकोन कसा असतो? रस्त्यावरून चालताना अनेकदा आपण एखादी अंध व्यक्ती पांढरी काठी टेकत चालत असताना पाहतो. कधीतरी या व्यक्तीसोबत त्याच्या किंवा तिच्या मदतीला कुटुंबीय किंवा एखादा मित्रसुद्धा असतो. समाज कधी या व्यक्तींकडे सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनातून पाहतो, तर कधी आपल्या वाटेतला अडथळा म्हणून तुसडेपणाने देखील. यात आपणा सर्वांना समतोल साधून अंध व्यक्तींना मदत करता येईल का? एक सामाजिक कर्तव्य म्हणून. अंध व्यक्तीच्या आयुष्याबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी मी आमच्या परिचयातील सौ. अनुजा नेटके यांच्याशी फोनवर संपर्क साधला, कारण गेली सहा वर्षे त्या अंध व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी मदत करत आहेत.
अनुजाताई यांचे कोल्हापुरातील मंगळवार पेठेत संगणकीय कार्यालय आहे. त्या कार्यालयातून येता-जाता त्यांना अंध मुले पालकांचा हात धरून रस्ता ओलांडताना दिसायची. यातून अनुजाताईंच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. ‘ही मुले पालकांच्या सुरक्षिततेच्या कोंदणात आहेत तोवर ठीक, पुढे या मुलांचे भवितव्य काय असेल? ती समाजापासून वंचित राहत असतील का? शाळेचा वेळ सोडल्यास त्यांना मोकळेपणाने खेळायला, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला मिळत असेल का? शिक्षण पूर्ण झाल्यावर ही मुले आर्थिकदृष्ट्या आपल्या पायावर उभी राहू शकत असतील का?
अशा सर्व प्रश्नांनी अंतर्मुख झालेल्या अनुजाताई एके दिवशी न राहावून कोळेकर तिकटीतील ‘ज्ञानप्रबोधिनी’ या अंधशाळेत गेल्या. अंधशाळा पाहून अनुजाताईंनी तिथल्या व्यवस्थापकांना विचारले, “मी इथे कोणत्या स्वरूपात मदत करू शकते?” त्यावर “तुम्ही आमच्या मुलांसाठी काय करू शकता?” असा प्रश्न तिथल्या व्यवस्थापकांनी अनुजाताईंना विचारला. “मी इथे रीडर म्हणून काम करेन. चालेल का?” अनुजाताईंनी त्यांना विचारले. त्यांनी “हो”, असे म्हटल्यावर अनुजाताईंच्या कामाला खरी धुमारी फुटली. शाळकरी वयातील अंध मुलं-मुली त्यांचे मित्र-मैत्रीण बनू लागले. आता शाळा शिकून उत्तम शिक्षण घेतलेली, स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलं-मुली वेदिका फडके, तेजस्विनी, विनायक त्यांना अधून-मधून भेटतात. फोन करतात. या विद्यार्थ्यातील वेदिका फडके ही एम.काॅम. झाली असून सध्या नोकरी करत सी.ए.च्या परीक्षा देते आहे. तिच्या आईचे, अनघा फडके हिचे विशेष कौतुक आहे, कारण आपल्या मुलीला वाढविताना, तिच्यावर चांगले संस्कार करताना तिच्यातील आई कधी डगमगली नाही. तेजस्विनी बी.ए. झाल्यानंतर तिला अंधत्व आले; परंतु तिची जिद्द सुद्धा वाखाणण्यासारखी आहे. यांच्यातील विनायक हा राधानगरी जवळील खेड्यात रेल्वे खात्यात शिपायाचे काम करतो. तो अधे-मध्ये अनुजाताईंना फोन करून आपली ख्याली-खुशाली कळवितो.
अशी अनेक मुले अनुजाताईंशी बोलतात. आपल्या व्यथा, अडचणी सांगतात. अनुजाताई म्हणतात, “या मुलांचे कर्तृत्व त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असते.” हे पाहून आम्हा सर्वांनाच (शाळा, पालक व स्वयंसेवक) त्यांचे कौतुक वाटते.
लहानपणापासून आमच्या मुलांना व्यवहारज्ञानाचे (नोटा कशा ओळखायच्या, भाज्या-फळे, सामान कसे घ्यायचे?), फुटपाथवरून कसे चालायचे यांसारख्या गोष्टींचे ट्रेनिंग देणे आवश्यक असते. आता अशी तयार झालेली आमची स्वाभिमानी मुले पाहून आमचे मन आनंदाने भरून जाते. ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वागत थोरात सर यांचे मार्गदर्शन या क्षेत्रात काम करत असणाऱ्या आम्हा स्वयंसेवकांना मिळत असते, असे अनुजाताई म्हणतात. ‘आमच्या मुलांकडून नम्रता, इतरांचे कौतुक करण्याची वृत्ती हे गुण घेण्यासारखे आहेत. इतर हात-पाय नसलेल्या मुलांबद्दल या अंध मुलांना विशेष अनुकंपा वाटते. आम्ही निदान भिंतीला धरून तरी चालू शकतो. पण आमच्या या अपंग मित्रांसाठी ही लढाई आणखीनच कठीण!’ याबाबत मुले त्यांच्या लाडक्या अनुरिमाताईंचे उदाहरण देतात. अनुरिमाताईबाबत घडलेली सत्यघटना तर सगळ्यांना माहीतच आहे. ११ एप्रिल २०११ रोजी अनुरिमा लखनऊहून दिल्लीला येत होती. तेव्हा चार-पाच मुलांनी तिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. अनुरिमाने आपली चेन देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी तिला चालत्या रेल्वेतून फेकून दिले. पुढे पाय तुटलेल्या अवस्थेत लोकांनी तिला दवाखान्यात दाखल केले. उपचारानंतर अनुरिमाला प्रोस्थेटिक पाय लावण्यात आला. अत्यंत खडतर परिस्थितीत अनुरिमाने एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले. त्यामुळे २०१५ मध्ये तिला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. मुलांना अनुरिमाताईचे उदाहरण सकारात्मकतेकडे घेऊन जाते.
“आमच्या दुःखापेक्षाही अनुरिमाताईंचे दु:खं जास्त आहे. तिच्याकडील मनोधैर्य वाखाखण्यासारखे आहे. तसे आम्ही आमचे आयुष्य का नाही जगू शकत?” अनुजाताई म्हणतात, “आपल्या या मित्रबांधवांना जास्तीत जास्त स्वावलंबी कसे करता येईल यासाठी प्रयत्नशील असणे हे सर्वप्रथम पालक, मग शिक्षक व समाज यांचे कर्तव्य आहे. काही पालक अजूनही आपल्या मुलांना घरातच लपवून, दाबून ठेवतात हे चुकीचे आहे. समाजात वावरण्याचा आत्मविश्वास त्यांना यायला हवा, कारण त्यांचे पालक त्यांना आयुष्यभर पुरे पडू शकत नाहीत.”अनुजाताईंचा दररोजचा अंदाजे तास-दीड तास वेळ हा अंधांसाठी वृत्तपत्रातील बातम्या तयार करण्यात जातो व या तयार बातम्या रेकार्ड करून दररोज समाजमाध्यमांवर प्रसारित होतात, दिव्यदृष्टी या नामाखाली. महाराष्ट्रातील अंदाजे पाच हजार अंध व्यक्तींपर्यंत या बातम्या पोहोचतात. त्याबाबत या व्यक्तींचा, मुलांचा प्रतिसाद फारच उत्स्फूर्त असतो. “तुमच्या बातम्यांमुळे जगात आजूबाजूला काय घडते ते आम्हाला समजते, कारण घरात दररोज येणारे वर्तमानपत्र आम्हाला वाचता येत नाही आणि दूरदर्शनवर बातम्या ऐकायला मर्यादा पडतात कारण घरातली मंडळी अधे-मधे चॅनल्स बदलत राहतात. त्यांच्या एका विद्यार्थिनी सोबत बोलताना ती म्हणाली, “आम्ही अनुजाकाकूंच्या बातम्या बघतो…… अरे! नाही ऐकतो, त्या अतिशय नियमितपणे बातम्या देतात. त्या ऐकून आम्हाला जगातील घडामोडी समजतात.”
माणुसकीसाठी चाललेल्या या लढ्यात पराभूत होऊन कसे चालेल? आणि खरोखरच २०२१ या वर्षात अनुजाताईंना विनामोबदला समाजकार्य याअंतर्गत ‘अपराजिता’ पुरस्कार नवरात्रीच्या काळात मिळाला. दुर्गारूपी शक्ती त्यांच्या कार्यातून मुलांपर्यंत पोहोचते. अनुजाताई म्हणतात, “अंध मुलांकडून मी प्रचंड सकारात्मक गोष्टी शिकले, ज्या मला सर्वसामान्य माणसांकडून खचितच शिकायला मिळाल्या असतील”. त्याचप्रमाणे अनुजाताईंना २२ जानेवारी २०२३ ला जालना ल्युई ब्रेल संस्थेकडून ‘ल्युई ब्रेल पुरस्कार’ मिळाला. म्हणूनच म्हणावेसे वाटते, ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती.’
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…