Immoral relation: स्वतःचे अनैतिक संबंध मुलांवर लादणे अयोग्य!

Share

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

समाजामध्ये वाढत चाललेली अनैतिकता, प्रेमाच्या आणि शारीरिक, भावनिक गुंतवणुकीच्या नावाखाली सुरू असलेला व्यभिचार, स्त्री तसेच पुरुषांनी सोडलेल्या वैवाहिक बंधनाच्या मर्यादा, समाजाची, कुटुंबाची तमा न बाळगता सुरू असलेले विवाहबाह्य संबंध, स्त्री तसेच पुरुष दोघांच्याही मुलांसाठी खूप त्रासदायक ठरत आहेत, हे समुपदेशन करताना जाणवते. आपण पालक म्हणून असेही मुलांवर अनेक गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध लादत असतोच. त्यांना विविध कारणावरून रागावणे, बोलणे, धाक दाखवणे पालक म्हणून आपले कर्तव्यच आहे. पण अनेक ठिकाणी आपल्या चुका, आपले चुकीचे निर्णय, आपल्या व्यक्तिगत सोयीसाठी, आनंदासाठी-आवडीसाठी आपण अनैतिक, चुकीच्या पद्धतीने जवळ केलेल्या व्यक्तींनादेखील आपल्या मुलांनी जवळ करावे, त्यांच्याशी चांगलेच वागावे, बोलावे, त्यांचा आदर करावा अशा अपेक्षा पालक म्हणून आपण करणे अत्यंत चुकीचे आहे. मूल लहान आहे तोपर्यंत आपल्या दबावामुळे, भीतीमुळे असं करतीलसुद्धा पण ते मोठे झाल्यावर, स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर आपण त्यांच्या नजरेतून उतरलेलो असू हे नक्की.

आर्या (काल्पनिक नाव) अकरावीत शिकणारी महाविद्यालयीन मुलगी. तिच्या बालपणीच तिच्या वडिलांचे निधन झाले होते. आई रश्मी (काल्पनिक नाव) खासगी नोकरी करून तिचा सांभाळ करत होती. रश्मीची वयोवृद्ध आई म्हणजेच आर्याची आजीदेखील त्यांच्यासोबत राहत होती. आर्याला वडिलांच्या निधनानंतर आई रश्मी हेच एक हक्काचं नातं होतं आणि या नात्यातून तिला तिच्या वयानुसार खूप अपेक्षा होत्या. आर्याला जेव्हा तिच्या वर्ग शिक्षकांमार्फत समुपदेशनासाठी आणलं गेलं तेव्हा ती खूप तणावात, खूप दबलेली, खूप शांत, नाराज वाटत होती. तिच्या ट्युशनच्या शिक्षकांनी सर्वतोपरी प्रयत्न करून तिला समजावण्याचा, विचारण्याचा प्रयत्न केला होता की, वर्गातपण ती इतकी शांत का असते, अजिबात बोलत नसते, सगळ्या मित्र-मैत्रिणीत मिसळत का नाही? हिच्या चेहऱ्यावर कधीच हसू का दिसत नाही? परंतु शिक्षकांना काहीच समजू शकलं नव्हतं. आर्या पहिल्या भेटीत तर जास्त काही बोलली नाही; परंतु दुसऱ्या चर्चासत्रात तिच्याशी खूप गप्पा मारल्यावर, ती खूप हसून खेळून मनमोकळी वागायला लागली होती. नंतर ती स्वतः वयात आल्यापासून कोणत्या आणि किती तणावात आहे, हे तिने कथन केले होते. आर्याची आई रश्मी मागील तीन-चार वर्षांपासून समीर (काल्पनिक नाव) सोबत रिलेशन शिपमध्ये होती. आर्याच्या माहितीनुसार समीर विवाहित होता, पण त्याची बायको आणि मुलगा त्याच्यापासून वेगळे राहत होते. रश्मी आणि समीरचे तीन-चार वर्षांपासून सुरू असलेले चुकीचे संबंध आर्या रोज स्वतः समोर बघत होती. समीर रोज नित्यनेमाने रश्मीच्याच घरी जेवायला, राहायला येत होता. दोघेही वृद्ध आजी आणि लहान आर्या यांच्यासमोर एकमेकांशी उघड उघड संबंध ठेऊन होते. आपल्या वृद्ध आईला काय वाटेल किंवा लहान मुलीच्या डोळ्यांसमोर असं वागणं चुकीचे आहे, याचे भान रश्मीला नव्हतं आणि समीरला तर त्याबाबत काहीही घेणं-देणं नव्हतं. आर्या आणि तिची आजी अतिशय हतबल आणि आगतिक होत्या. कारण त्या रश्मीवरच अवलंबून होत्या. समीर सतत आपल्या घरात असतो, त्याची नोकरीची वेळ संपली की, तो आणि रश्मी कामावरून निघाली की, ते दोघेही एकत्रच घरी येतात. कोणताही दिवस असो, सण असो, आर्याचा वाढदिवस असो, वा इतर काहीही खास प्रसंग असो, आर्या आजारी असो की, आजीला बरे नसो, आर्याला आणि आजीला आई म्हणजेच रश्मी कधी एकटी भेटतच नव्हती. समीर कधी आपल्या आईचा पिच्छा सोडत नाही आणि आईपण सतत त्याच्या मागे-पुढे नाचत राहते, याचा आर्याला खूप राग येत होता. सातत्याने समीरने आपल्या आयुष्यावर केलेलं आक्रमण, त्याचा आपल्या घरातील हस्तक्षेप, आपल्या घरातील त्याचा मुक्तसंचार आर्याला अजिबात आवडत नव्हता. समीर जरी आर्याला पैसे देत होता, तिला काय हवं, काय नको विचारत होता, तिला जाता-येता काहींना काही घेऊन देत होता. तरीही आर्याच्या मनात समीरबद्दल खूप कटुता होती.

समीर घरी आल्यावर आर्याचं तुटक वागणं, तोंड पाडून बसणं, त्याच्याशी नीट न बोलणं, नीट न जेवणं, हसून-खेळून न राहणं, त्या दोघांसोबत कुठेही जायला नकार देणं, मात्र रश्मीला हे पटत नव्हतं. रश्मीचा अट्टहास होता की, आर्याने समीरला बाबाच म्हटलं पाहिजे. त्याच्याशी मिळून-मिसळून राहीलच पाहिजे. त्याला आदर दिलाच पाहिजे. यासाठी ती अनेकदा आर्यावर रागावली होती. तिच्यावर चिडली होती.

आर्या सांगत होती, तो माझ्या मम्मीचा मित्र, त्याचं माझं कोणतंही नातं नाही. तो माझा बाबा नाही, मी का त्याला जबरदस्तीने बाबा म्हणू? त्या माणसामुळे मला खूप त्रास होतोय. मम्मी कामावर गेल्यावर मला आजूबाजूच्या घरातील लोकं, माझ्या मैत्रिणी विचारतात रोज तुमच्याकडे ते काका का येतात? का राहतात? ते कोण आहेत? तुझी आई कायम त्यांच्यासोबत कुठे जाते? कुठून येते? ते दोघेही दार लावून रूममध्ये का बसतात? तुमच्या घराचं दार कायम बंद का असते? ते काय करतात? ते घरात असल्यावर तुला का घराबाहेर एकटं बाहेर बसवतात? हे सांगताना आर्याला रडू कोसळलं होतं.
आर्याला आई असून सुद्धा ती पोरकेपणा सहन करत होती. आर्याची मानसिकता लक्षात घेऊन काहीतरी ठोस निर्णय या परिस्थिती बदलासाठी घेणे आवश्यक होते. रश्मीशी बोलल्यावर तिने तिची भूमिका स्पष्ट केली. रश्मीच्या मते ती समीरशिवाय जगण्याची कल्पना सुद्धा करू शकत नव्हती. तिला समीर हा उर्वरित आयुष्यासाठी एकमेव आधार वाटत होता. ती आर्यासाठी किंवा स्वतःच्या आईसाठी समीरला सोडणं अशक्य होतं. आर्याचे पुढे मागे लग्न होऊन जाणार आहे, आपली वृद्ध आई आपल्याला आयुष्यभर पुरणार नाही, समीरच आहे, जो आपल्याला शेवटपर्यंत सोबत करेल, असं तिचं मत होतं. रश्मीच्या आयुष्यात आज सगळ्यात महत्त्वाचा समीर होता. समीर पण पत्नी आणि मुलांपासून लांबच राहतोय, तर रश्मीने त्याच्याशी कायदेशीर लग्नच करायला काय हरकत आहे? असेच बेकायदेशीर एकत्र का राहता या संबंधांना काहीच अर्थ नाही, हे सांगितल्यावर रश्मीने तिच्या बाजूने समीरसोबत लग्न करून राहण्याची पूर्ण तयारी दाखवली. रश्मी म्हणाली, आम्ही लग्न केल्यावर मी त्याच्या बायको-मुलाला स्वीकारायला तयार आहे. तो त्यांना भेटू, बोलू शकतो.

समीरशी लग्नाबद्दल बोलल्यावर मात्र त्याने फोनवरच स्पष्ट शब्दांत सांगून टाकलं की, माझी बायको-मुलगा फक्त लांब राहतात. आमचा काही कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. तशी कल्पना मी रश्मीला सुरुवातीलाच दिली आहे. रश्मीशी मी लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्या बायको-मुलाला स्वीकारणारी ही कोण? माझ्या लग्नाच्या बायकोला का आता माझी रखेली स्वीकारेल? रश्मीला कोणाचा आधार नाही, ती होतकरू आहे, स्वभावाने चांगली आहे, बिचारी एकटीच कमवून मुलीला, आईला सांभाळते. यामुळे तिच्या आयुष्यात थोडं फार सुख, समाधान, आनंद यावा म्हणून मी तिच्यासोबत आहे. आमच्या दोघांच्या गरजा भागतात म्हणून आम्ही एकत्र आहोत. तिला आजही सुयोग्य जोडीदार लग्नासाठी मिळत असेल, तर माझी कोणतीही हरकत नाही. तिच्या आणि मुलीच्या भवितव्यासाठी ती कोणताही निर्णय घेऊ शकते.

आता काय करायचं? ज्या समीरसाठी रश्मीने स्वतःच्या मुलीचं बालपण भरडून टाकलं होतं. स्वतःच्या वृद्ध आईला गृहीत धरलं होतं, त्याचं स्पष्ट धोरण त्याने सांगून टाकलं होतं. समीरचा निर्णय ऐकून रश्मीला फार काही फरक पडला नव्हता. आर्या तर अगदीच कोवळ्या वयात, या प्रकरणामुळे त्रस्त झालेली होती. आर्याच्या मानसिक भावनिक गरजा समजून घेऊन आईची भूमिका निभवावी, समीरशी रोज रोज स्वतःच्या घरात भेटणं थोडं कमी करावं, त्याच सारखं येणं, घरावर त्याचा प्रभाव, स्वतःच्या आयुष्यातील त्याचा प्रभाव थोडा तरी कमी करावा, स्वतःची सामाजिक प्रतिमा सांभाळून राहावे, मुलीच्या डोळ्यादेखत एकत्र राहू नये, तिच्यासमोर ऐका रूममध्ये दार बंद करुन असताना तिला काय वाटत असेल, याचा गांभीर्याने विचार करावा. आर्यावर जबरदस्तीने समीरला बाप म्हणून स्वीकारण्यासाठी भाग पाडू नये, समीरपेक्षा आर्या रश्मीच्या म्हातारपणाचा आधार असणार आहे, आर्याच्या शिक्षकांना भेटून बोलून तिच्या निकोप मानसिक वाढीसाठी प्रयत्न करावेत, तिचा अभ्यास, आवडी निवडी, खाणंपिणं याकडे आई म्हणून वैयक्तिक लक्ष द्यावं, समीर प्रकरण थोडं मर्यादेत ठेवणंच रश्मी आणि आर्याच्या हिताचे आहे. यासारख्या मुद्द्यावर रश्मीला समुपदेशन करण्यात आले.

 

Recent Posts

Gold rate: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…

28 minutes ago

PBKS vs DC, IPL 2025: धरमशालामध्ये पाऊस थांबला, पंजाब किंग्सची पहिली फलंदाजी

धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…

43 minutes ago

पाकिस्तानकडून तणाव वाढवण्याचा प्रयत्न निष्फळ, भारताचे जशास तसे प्रत्युत्तर

नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…

54 minutes ago

जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगांचा भारत दौरा

नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…

1 hour ago

भारताने पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हचा बुरखा फाडला

नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…

1 hour ago

पाकिस्तानचा खासदार घाबरला; संसदेत ढसाढसा रडला!

एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…

2 hours ago