शनिवारपासूनच सर्वत्र मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागला आहे. यावर्षी तब्बल दोन आठवडे कडकडीत उन्हाचा तडाखा संपूर्ण महाराष्ट्राला बसला. या कालावधीत साधी एक सर सुद्धा बरसावी यासाठी प्रत्येकजण आसुसलेला होता. मात्र प्रत्येकाची परीक्षा या पावसाने बघितलीच. पण एक संकटाची सूचना सुद्धा देऊन ठेवली आहे.
पाऊस हा निसर्गाचे वरदानच आहे. आशियामध्ये तर एका विशिष्ट वेळापत्रकाप्रमाणे पाऊस पडतो आणि त्यावर इथली पीक व्यवस्था, फाळफळावल आणि त्यामुळेच इथले जीवनमान अवलंबून आहे. १ जूनला मान्सूनची पहिली सर कोसळणारच आणि ७ जूनला तो कोकणात दाखल होणारच हा ठाम विश्वास आपल्याला आहे, नव्हे म्हणूनच या तारखा अगदी अभ्यासक्रमामध्येही नमूद करण्यात आल्या आहेत. मात्र कोणालाही आणि कोणत्याही गोष्टीला किंवा व्यक्तीला गृहीत धरणे आणि आपण आपल्या मनासारखे वागणे हे नेहमीच चुकीचे असते. पावसालासुद्धा असेच गृहीत धरले गेले आहे आणि मनुष्य त्याला हवं तसं वागला आहे. निसर्गनियमाच्या विरोधात वागला आहे. त्याचेच विपरित परिणाम आपण आता पाहत आहोत.
निसर्गाच्या विरोधात जाऊन आपण काय नाही केले… नवीन वस्ती वाढली, शहरीकरण या नावाखाली मोठ्या प्रमाणात जंगले नष्ट केली. सिमेंटचे जंगल वाढवले. इंधनावर चालणाऱ्या गाड्यांचे प्रमाण वाढले, त्यामुळे प्रदूषण वाढले. एअर कंडिशनरसारखे शोध मनुष्याला सुखी करत आहे. पण त्याचे परिणाम जग पाहाते आहे. या सगळ्या मानवी बदलाचा निसर्गावर परिणाम होत आहे, त्याचे चक्र बदलत आहे, याची जाणीव सुद्धा आपल्यातील बुद्धिवान लोकांना झाली होतीच. त्यांनी जगभरात निसर्ग वाचवण्यासाठी चळवळी सुरू केल्या. या चळवळीसुद्धा अनेक संघर्षातून, सत्ताधिशांना टक्कर देत पुढे आल्या आणि निर्धाराने टिकल्या. पण आता निसर्ग वाचावा ही मोहीम तीव्र केली पाहिजे. कारण ती गरज आता निसर्गाकडून मिळणाऱ्या संकेतांवरून स्पष्ट होत आहे.
कधी तीव्र मुसळधार पाऊस, तर कधी अत्यंत तीव्र उन्हाळा. असे दोन टोकाचे तापमानाचे चित्र दिसू लागले असून तापमानात वेगाने वाढ होत आहे. साधारण पाच वर्षांपूर्वी पावसाने अशीच हुलकावणी दिली होती. त्यानंतर आता या वर्षी पुन्हा पावसाने तोंडचे पाणी पळवले होते. कालपासून जर तो पडला नसता, तर भीषण परिस्थिती निर्माण झाली असती. हाच मान्सून कोकण, संपूर्ण महाराष्ट्रानंतर देश व्यापतो. याच मान्सूनच्या पावसावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे.
त्यामुळे पावसाचे वेळपत्रक बिघडू नये, निसर्गाचा समतोल बिघडू नये यासाठी वेगाने हालचाल करणे गरजेचे आहे. एक ठोस कार्यक्रम तयार केला पाहिजे. त्यासाठी केवळ ‘सरकार करेल, ही मानसिकता बदलून आपण सारे मिळून करूया’, ही मानसिकता असणे आवश्यक आहे. निसर्गाचे बिघडलेले घड्याळ दुरुस्त करण्यासाठी मानवानेच अनेक युक्त्या शोधून ठेवल्या आहेत. पण त्याची अंमलबजावणी करताना काही गोष्टी त्यागाव्या लागतील, काही गोष्टींचा मोह टाळावा लागेल, एकजुटीने, निर्धाराने पुढे यावे लागेल. जो याला विरोध करेल त्याला उत्तर द्यावे लागेल, तरच अगदी आपल्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत सगळ्यांचेच जीवन सुकर होणार आहे.
anagha8088@gmail.com
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…