Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीमी प्रश्न सोडवतो पण सत्ता पिळवणूक करणाऱ्यांच्याच....

मी प्रश्न सोडवतो पण सत्ता पिळवणूक करणाऱ्यांच्याच….

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली खंत

राज्यात आपत्कालीन सुविधांच्या अभावावरही कडाडले

मुंबई : येणाऱ्या पावसाळ्यात शासकीय यंत्रणांनी बिहार मधील कोसळलेल्या पुलाची पुनरावृत्ती होऊ नये, त्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते आज मनसेच्या साधनसुविधा विभागाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी मी प्रश्न सोडवतो पण मतं मिळत नाहीत ही खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली.

ते म्हणाले, मी जिथे जातो तिथे बरेच लोक प्रश्नं घेऊन येतात, आम्हीही ते प्रश्न सोडवतो. पण हीच लोकं मतदानाच्या वेळी कुठे जातात? जे तुमची पिळवणूक करतात त्यांच्याच हातात तुम्ही सत्ता देता मग माझ्याकडे कशाला येता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बिहारचा पूल पडेल असं एका पत्रकाराचं होतं भाकित

वर्षभरापूर्वी बिहारच्या पुलाची बांधणी पाहून एका पत्रकाराने हा पूल कोसळेल, असं भाकित केलं होतं. मात्र तिथल्या सरकारने त्याला अटक केली. बांधकाम पूर्ण झालं असतं आणि रहदारी सुरु झाली असती तर आज कितीजण मृत्यूमुखी पडले असते. त्यामुळे शासकीय यंत्रणांनी याकडे तीक्ष्ण नजेरेने पाहिलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडत असतात. अशी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू नये, असं राज ठाकरे म्हणाले.

कोकणात दरडी कोसळू शकतात

यावर्षी पावसात कोकणात दरडी कोसळू शकतात, असं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे जी आपत्ती उद्भवेल त्यासाठी मनसेच्या नेमणूक केलेल्या कार्यकर्त्यांना मदतीसाठी तत्पर केल्याचं राज ठाकरे म्हणाले. तसेच प्रशासनानेही या गोष्टीकडे लक्ष द्यावे, असा इशारा दिला.

मुंबईतील चार नद्या मारुन टाकल्या

आधी मुंबईमध्ये पाच नद्या होत्या आता केवळ एकच उरली आहे. बाहेरच्या राज्यांतून लोक येऊन नदीकिनारी झोपड्या बांधतात, घाण करतात यामुळे नदी तुंबते, याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.

फक्त मनसे मदतीला धावली

भाषणादरम्यान राज ठाकरेंनी रायगडावरुन परततानाचा एक अनुभव सांगितला. ते निघत असताना चार-पाच माणसांनी त्यांच्याजवळ येऊन आभार मानले. गेल्या वर्षी कोकणात पावसाच्या तडाख्यामुळे हाल झालेल्या भागांतील ते रहिवासी होते. आमच्या मदतीला त्यावेळी केवळ मनसेची लोकं धावून आली, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले.

परदेशी आपत्कालीन यंत्रणा अधिक चांगल्या

दुबईला झालेल्या एका मॅचमध्ये पाऊस पडल्याने ग्राऊंड सुकवण्यासाठी लगेच सुरुवात झाली, शिवाय हेलिकॉप्टर आणून त्याच्या वार्‍याने ग्राऊंड सुकवण्यात आले. मात्र आमच्याकडे अहमदाबादला मॅचदरम्यान पाऊस पडल्यावर मॅच थेट उद्यावर ढकलण्यात आली. असं का तर, ‘आज आम्ही ग्राउंड हेअर ड्रायरने सुकवतोय’, असा टोला त्यांनी लगावला.

मला चांगले सहकारी मिळाले

राज ठाकरे म्हणाले की, आपल्या आजूबाजूला अनेक दुर्घटना घडत असतात. पण त्यासाठी तितक्या सुविधा पण असल्या पाहिजेत. अशा वेळी धावून जाणारा मनसे हा एकमेव पक्ष आहे, असा दावा त्यांनी केला. सरतेशेवटी राज्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, अशी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

राज्यात अपुर्‍या साधनसुविधांमुळे लोकांचे हाल होतात यासाठी सरकारने आपत्कालीन सुविधांकडेही लक्ष दिले पाहिजे, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर मदतीला धावून येणार्‍या आपत्कालीन यंत्रणांचे आपण सगळ्यात जास्त आभार मानले पाहिजेत, असं ते यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -