सुट्टीतला कलाविष्कार

Share
  • मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर

‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे…’
अत्यंत दुर्मीळ असलेला असा हा मनुष्य जन्म लाभल्यानंतर या जन्मावर आणि या जगण्यावर आपल्याला खरंच प्रेम करता यायला हवं ना? पण छोट्या छोट्या गोष्टींनी आपण किती नाराज होतो, चिडतो आणि निसर्गाने आपल्याला मुक्तहस्ते दिलेलं जगण्याचं मौलिक वरदान व्यर्थ घालवून बसतो. वास्तव नेहमीच आपल्या मनाप्रमाणे असेल असं नाही. पण ते स्वीकारून पुढे जाणं म्हणजेच जगण्यावर शतदा प्रेम करणं!आणि या आनंददायी प्रवासात आपल्याला हवीहवीशी सोबत करतात ते आपले छंद आणि कला!

सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि चढाओढीच्या जमान्यात कला साधनेचा मुक्त आनंद घेता येणं, ही खरं तर एक पर्वणीच मानायला हवी. अशी संधी मुलांना मिळते ती सुट्टीतल्या छंद वर्गातून.

मुलांना विविध कलांची ओळख करून देताना आपल्या आवडीच्या क्षेत्रात रस घेऊन त्यात पुढे जाण्यासाठी योग्य दिशा देण्याचं काम करावं या उद्देशाने आम्ही काही मोजक्या समविचारी मंडळींनी एकत्र येऊन रूहीज् कलाविष्कार या उपक्रमाची सुरूवात केली. विविध कलांची तोंडओळख करून देण्याबरोबरच कलेचे काही आणखी वेगळे आविष्कार त्यांना अनुभवता यावेत आणि कसलीही परीक्षा वा गुणांची अट नसलेल्या कलेचा मुक्त, निरामय आनंद त्यांना घेता यावा एवढाच आमचा माफक हेतू त्यामागे होता आणि आज १०-१२ वर्षांनंतर ते उद्दिष्ट गाठण्यात आम्ही बऱ्यापैकी सफल झालो आहोत, असं म्हणायला हरकत नाही.

दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांची चाहूल लागताच आमची तयारी सुरू होते, ती समर कॅम्पची. साधारण मार्च एप्रिलपासूनच यंदा काय नवीन द्यायचं? याबद्दलची विचारचक्रं डोक्यात फिरू लागतात आणि त्या दिशेने तयारीही हळूहळू सुरू होते.

यावर्षी देखील काही आमच्या समर कॅम्पमध्ये काही खास गोष्टींचा आवर्जून समावेश केला. लहान मुलं ही ओल्या मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. जशी आकार देऊ तशी ती घडत जातात. यावेळी मुलांनाच मातीच्या खेळाचा प्रत्यक्ष अनुभव द्यायचा, असं आम्ही ठरवलं. त्यासाठी शाडूची माती आणली. या मातीपासून मुलांनी गणपती बाप्पांच्या मूर्ती, भातुकलीची भांडी, दिवे असे नानाविध आकार बनवले आणि दोन दिवसांनी ते सुकल्यावर सुंदर रंग चढवून त्यांना नवा साजही दिला. मुलांची कल्पकता पाहून आम्ही थक्क झालो.

राॅक पेंटिंग हा असाच आणखी एक अनोखा उपक्रम. त्यासाठी आम्ही नदीकिनारी जाऊन गोळा करून आणलेल्या दगड-गोट्यांवर मुलांनी आकर्षक पेंटिंग्ज केली. काहींनी पक्षी-प्राणी चितारले, तर काहींनी त्यावर निसर्गदृश्य चितारली. साध्या ओबडधोबड दगडालाही रंगरूप देऊन किती सुंदर बनवता येतं, याचा वस्तुपाठ मुलांना बरंच काही शिकवून गेला – त्यांना वेगळा आत्मविश्वास देऊन गेला.

समर कॅम्पची आमची मुलं माती व दगडातून नवनिर्मिती साकारत असताना तिथे कुतूहलापोटी पाहण्यासाठी आलेल्या झोपडपट्टीतल्या काही गरीब मुलांना आम्ही स्वतः साहित्य पुरवून त्यात त्यांनाही सामील करून घेतलं. काही क्षणापुरतं का होईना, पण त्यांचं भावविश्व आनंदाच्या रंगांनी उजळून निघालं! नेहमीच्या चित्रकलेसोबत पारंपरिक आदिवासी कला वारली पेंटिंगचा समावेश केल्याने मुलांना कलेच्या एका अनोख्या दालनाची ओळख झाली.

नृत्य आणि संगीत हे मुलांमध्ये उपजत असतंच. गरज असते त्याला सकारात्मकतेने साद घालण्याची. मग मुलांकडूनही त्याला तसाच प्रतिसाद मिळतो. नियमित व्यायाम व नृत्याच्या स्टेपस् शिकून मुलांनी फिटनेस व नृत्याचा नितांत सुंदर आविष्कार सादर केला.

संगीताच्या सप्तसूरांबरोबरच बासरी, मोरसिंग, पियानो, ड्रम्स अशा विविध वाद्यांची ओळख मुलांना करून दिल्याने संगीत विश्वाच्या अथांगतेची कल्पना त्यांना आली.

जादूच्या प्रयोगाची धमाल अनुभवताना तर मुलांसोबत पालकही लहान होऊन गेले. कलाविष्कारच्या जादुई दुनियेतली ही सफर समर कॅम्पला चार चाँद लावून गेली.

मानवाला लाभलेल्या बुद्धी व स्मरणशक्तीच्या वरदानाचं महत्त्व प्राणी आणि पक्ष्यांच्या मजेशीर संवादातून सांगणाऱ्या नाटकाद्वारे मुलांना छान अभिनय शिकायला मिळाला आणि उपयुक्त संदेशही मिळाला. शेवटच्या दिवशी कॉस्च्युमसह त्यांनी या नाटुकल्याचं उत्तमरित्या सादरीकरणही केलं.

दररोज एक्सरसाइज व प्रार्थनेने सुरू होणारा दिवस! त्यात नृत्य, चित्रकला, मूर्तीकला यासोबत दर दिवशी काहीतरी नवी थिम ठेवल्याने मुलांच्या व पालकांच्याही कल्पकतेला जरासा ताण मिळाला. यातूनच नकळतपणे मूल्य शिक्षणाचे धडेही आत्मसात करत मुलांनी शिबिराचा भरभरून आनंद घेतला.

कला शिक्षणाच्या बरोबरीने खुल्या आभाळाखाली, झाडा-फुलांच्या सानिध्यात मातीशी घट्ट नातं निर्माण करणारे खेळ, जे आपण लहानपणी खेळलो- त्याचाही एक छान अनुभव या जनरेशन नेक्स्टला द्यावा असं सहज मनात आलं. मग त्यात काही हटके खेळांचा आम्ही समावेश केला. उदा. मामाचं पत्र हरवलं, आंधळी कोशिंबीर,सापशिडी, कथाकथन इ. खेळासोबत मनाचे श्लोकांचे पठण केले. विशेष म्हणजे यासाठी एक दिवस कॅम्पच्या बाहेर जाऊन पक्षी अभयारण्याला भेट दिल्याने मुलांना खुल्या वातावरणात निसर्गाचा मनमुराद आनंद घेता आला.

शेवटच्या दिवशी मुलांनी सात दिवसात शिकलेल्या विविध कलांची wझलक पालक व निमंत्रितांसमोर सादर केली. नृत्य, गायन, नाटक यांच्या परिपूर्ण अशा आविष्काराला निमंत्रित व पालकांनी खूप छान प्रतिसाद देत भविष्यात असेच आणखी कार्यक्रम होत राहावेत, अशी इच्छा व्यक्त केली. या समर कॅम्पची प्रेरणा घेऊन लवकरच कलाविष्कार टीम अॅक्टिव्हिटी सेंटर सुरू करणार आहे.

छंद आणि कला आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात. प्रत्येकात काही ना काही कला कौशल्य दडलेलं असतं. त्याच्या आधारे आयुष्यात आनंदाची फुलबाग फुलवता येते. मात्र यासाठी गरज असते ती योग्य वयात त्या सर्जनशीलतेला योग्य प्रकारे वाट करून देण्याची, तिची जोपासना करण्याची आणि हे काम यांत्रिक पद्धतीने होऊ शकत नाही. ते त्यांच्या कलाने, विनासायास आणि उत्स्फूर्ततेने व्हायला हवं. कलाविष्काराला कोणत्याही विशिष्ट चौकटीत कोंबणं योग्य नसतं. अन्यथा त्याचा वेलू गगनावेरी जाण्याऐवजी त्याचा दिवाणखान्यातील शोभेचा बोन्साॅय होऊन बसतो. रूहीज कलाविष्कारला बोन्साॅय नव्हे तर तो रुजवायचा आहे. गगनावरी जाणारा मोगऱ्याचा वेलू, ज्याच्या सु-मनांचा गंध अवघ्या आसमंतात दरवळत राहील आणि आपल्या अस्तित्वालाही अर्थ देत राहील.

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

35 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago