Friday, May 9, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनरत्नागिरी : स्वातंत्र्यवीरांची कर्मभूमी...

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीरांची कर्मभूमी…

  • दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

क्रांतिकारक, हिंदू संघटक, श्रेष्ठ साहित्यिक, भाषा शुद्धी चळवळीचे प्रेरक, तत्त्वज्ञ, विचारवंत विनायक दामोदर सावरकर या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची आज १४०वी जयंती. इंग्रज बाहेरून आलेत, ते केव्हातरी परत जातील. पण त्या आधी विस्कळीत झालेला समाज, हिंदू समाज यांना संघटित करणे आवश्यक आहे. समाजातील चुकीच्या रूढी-परंपरांना दूर सारून समाजाला नव्या दिशेने घेऊन जाणे गरजेचे आहे, याची जाणीव असलेले आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर! त्यांच्या या विचारातून प्रत्यक्ष कृती घडताना कोकणातील रत्नागिरी या शहराने प्रत्यक्ष तो इतिहास बघितला आहे. नव्हे हा इतिहास रत्नागिरीसुद्धा जगली आहे, त्यात सहभागी झाली आहे. त्याची सदैव आठवण म्हणून रत्नागिरी शहरातील उभे असलेले पतित पावन मंदिर होय.

अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले होते. ६ जानेवारी १२९४ ला रत्नागिरीत आलेले सावरकर प्रथम इथल्या कारागृहात होते. त्यानंतर रत्नागिरीमध्ये त्यांचे वास्तव्य होते. या १३ वर्षांच्या काळात सावरकरांनी रत्नागिरीच्याच भूमितून हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी कार्य केले. हिंदू समाजाच्या अधःपतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्यावर काम करण्यास सुरुवात केली. अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. त्यामध्ये अनेक मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि रत्नागिरीचे सुपुत्र दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या साथीने सर्वांसाठी ‘पतित पावन मंदिर’ व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. पतितपावन मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. ही त्या काळची खूप मोठी गोष्ट होती.

इंग्रजांनी आपल्यावर अन्याय केलाय, देश स्वतंत्र झाला पाहिजे याची जाणीव अनेक क्रांतिकारक, देशभक्त, नेते समाजाला करून देत होते. पण या स्वातंत्र्य संग्रामानंतर इंग्रज देश सोडून जातील. मात्र जाती, रूढी, अंधश्रद्धा याच्या जोखडात अडकलेल्या समाजाला त्यातून स्वतंत्र करणे आवश्यक आहे याची जाणीव स्वा. सावरकरांना झाली होती आणि त्यासाठी त्यांनी काम सुरू केले होते. त्यासाठी रत्नागिरी ही त्यांची कर्मभूमी झाली होती. स्वा. सावरकर रत्नागिरीत सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. त्यावेळी त्यांच्यामुळे रत्नागिरी हे छोटेसे शहर या चळवळीचे केंद्रबिंदू झाले होते. संपूर्ण देशाचे, केवळ इंग्रज्यांचेच नव्हे, तर अन्य स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे लक्ष सुद्धा रत्नागिरीवर केंद्रित झाले होते. रत्नागिरीतील त्यांच्या वास्तव्यात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. हेडगेवार या महत्त्वपूर्ण भेटी इथेच झाल्या. याच काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अस्पृश्यता निवारण चळवळ, सर्वधर्मीयांना मंदिर प्रवेश, स्वधर्म प्रवेश, पुनर्विवाह, दलितांचा हिंदू बँड, व्यायामशाळा, पतित पावन मंदिर निर्मिती, धर्मांतरावर बंदी, सर्व धार्मियांच्या मुलांना शाळेत प्रवेश, स्वदेशी चळवळ, मराठी भाषा शुद्धी आणि हिंदू महासभेची स्थापना केली.

यामुळेच स्वा. सावरकर यांचे त्यांच्या जयंती दिनी स्मरण करताना रत्नागिरी या त्यांच्या कर्मभूमीलासुद्धा विसरून चालणार नाही. रत्नागिरीची भूमीसुद्धा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे सदैव स्मरण करते. आजही त्या महान व्यक्तिमत्त्वाच्या कार्याची मूल्ये ही भूमी जपते आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -