Friday, May 9, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखपरंपरा की हातपाय पसरा?

परंपरा की हातपाय पसरा?

  • डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ अभ्यासक

राज्यातील शांतता आणि सुव्यवस्थेला नख लागेल, अशी कृत्ये बघायला मिळणे वा जाणीवपूर्वक कोणी तसा प्रयत्न करणे निषेधार्हच आहे. त्यामुळे अलीकडे अकोला, त्र्यंबकेश्वर, शेवगाव आदी ठिकाणच्या घटना काळजी वाढवणाऱ्या ठरल्या. ही कृत्ये करणाऱ्यांचे नेमके मानस जाणून घेणे गरजेचे आहे. त्र्यंबकेश्वर घटनेनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. अशा चर्चांच्या माध्यमातून काहीजण अगदी विरोधी मत प्रदर्शित करत असतात, तर काहीजण त्याच्या बाजूने मत व्यक्त करतात. सगळी एका देवाची लेकरे असल्यामुळे परधर्मीय आपल्या मंदिरांमध्ये आले, तर काय बिघडले, असा काहींचा खास पुरोगामी सूर असतो. पण गंमत अशी की, हीच बाब कोणी मशिदीबाबत बोलताना दिसत नाही. उद्या एखाद्या अन्य धर्मियाने मशिदीत जाऊन हनुमान चालिसाचे पठण करायचे म्हटले वा आपल्या देवतेची मूर्ती नेऊन तिथे पूजन करायचे ठरवले, तर सगळी एकाच देवाची लेकरे असल्याने त्याला मान्यता दिली जाईल का? हा खरा प्रश्न आहे.

एकदा एका वृत्तवाहिनीवरील अशाच एका विषयावरील मुलाखत आज स्मरते आहे. सोमनाथच्या मंदिरात ‘अहिंदूंना प्रवेश नाही’ अशी पाटी लावण्यात आली होती, तेव्हा जोरदार चर्चा झाली होती. चर्चेच्या सूत्रसंचालकाने मंदिरात अहिंदूंना प्रवेश नाकारण्याबद्दल विचारले तेव्हा मी याचे समर्थन करत सांगितले होते की, आम्ही त्यांच्या धर्माच्या काळजीपोटीच हे करतो, कारण इस्लाम बुतपरस्ती म्हणजे मूर्तीपूजेच्या विरोधात आहे. अशा वेळी एखादा मुसलमान बांधव सोमनाथाच्या मंदिरात गेला, तिथे त्याने दर्शन घेतले आणि नंतर त्याच्याच धर्मियांनी त्याच्या विरोधात फतवा काढला, तर त्या व्यक्तीला मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. यात त्याचे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी मंदिरात अन्य धर्मियांना प्रवेश नसतो. या संदर्भावरून लक्षात येते की, हा अलीकडचा विषय नसून या आधीही असे प्रयत्न वा चर्चा झाल्या आहेत.

१९५८ मध्ये पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात विनोबांसह काही मुसलमान आणि ख्रिस्तींना तेथील काही बडव्यांकडून प्रवेश दिला गेला होता. तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये यावर एक छोटी बातमी आली होती. पण त्यावर कोणाचाही निषेधाचा सूर उमटला नाही, केवळ ल. ग. थत्ते या तत्कालीन हिंदुराज्य पक्षाच्या नेत्यानेच त्यावर निषेध नोंदवला. पण पुढचा परिणाम असा झाला की, त्यानंतर एक-दोन आठवड्यांतच कोल्हापूरमधील कित्येक मशिदींवर ‘फक्त नमाजींनाच प्रवेश’ असे फलक फडकले होते. त्यानंतर वाटेतल्या एका दर्ग्यात जाताना विनोबांच्या समवेत असणाऱ्या घोळक्यातील स्त्रियांना मात्र दर्ग्यात प्रवेश नाकारला गेल्याची घटना घडली. त्यानुसार विनोबाजी केवळ पुरुष सहकाऱ्यांसह आत गेले आणि पावन होऊन परत आले. त्यांनी स्त्रियांना प्रवेश नाकारण्याचे कारण काही विचारले नाही. यावर सावरकरांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यामध्ये विनोबांना सूचना करताना ते म्हणाले होते की, ‘पाकिस्तानात एक पदयात्रा काढून अयुब खान आणि सिकंदर मिर्झा यांचे हृदयपरिवर्तन करून विभागणीच्या काळात उद्ध्वस्त केलेल्या महत्त्वाच्या हिंदू देवालयांचा पुनरुद्धार करवला गेला आणि हिंदूंना निर्विघ्नपणे पुन्हा मूर्तीपूजा आदी कार्ये करता येऊ लागली, तर त्याची अनुकूल प्रतिक्रिया हिंदुस्थानातही दिसेल. येथील अनेक मशिदींमध्ये, हिंदू बांधवांसाठी राखून ठेवलेल्या एका तरी विभागात त्यांना देवमूर्तीची पूजा करता येऊ लागली आणि हिंदुस्थानातील हिंदू देवळांमध्ये प्रवेश करून मुसलमान नमाज पढू लागले किंवा ख्रिस्ती त्यांच्या पद्धतीने अर्चना करू लागले, तर मानवधर्माचा किती मोठा विजय होईल…! मग आम्हीदेखील ‘जय जगत’ अशी घोषणा करत विनोबाजींचे अभिनंदन करू शकू.’

या लेखाच्या अखेरीस सावरकर म्हणतात, ‘खरोखरच कोणी तरी अशा मानवधर्माची, सर्वांसाठीची निराळी आणि स्वतंत्र पूजास्थाने स्थापन करणे ही एक तोड होऊ शकते; ज्याला आमचा अजिबातच विरोध राहणार नाही…’ याच लेखात त्यांनी एक उदाहरण दिले. रत्नागिरीला काँग्रेसचे बडे नेते युसूफ मेहरअली आले होते. ते सावरकरांना म्हणाले होते की, हे पतितपावन मंदिर तुम्ही सगळ्या जातींसाठी खुले ठेवले आहे, तसे सगळ्या धर्मांकरताही खुले असायला हवे होते. म्हणजे ते अखिल भारतीय देवालय होऊ शकले असते. त्यावेळी सावरकर म्हणाले होते, ‘जगामध्ये सगळीकडे हाच प्रघात आहे. श्रद्धा असते त्याच धर्मातील लोकांना त्या त्या प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश असतो. त्यामुळेच इथे पाटी अशी लिहिली आहे की, ‘व्यवस्थापकांच्या विशेष अनुज्ञेवाचून अहिंदूंना या मंदिरात प्रवेशाचा अधिकार नाही.’ आजही मंदिरांमध्ये अशी पाटी असेल, तर त्यात चुकीचे काही आहे, असे वाटत नाही.

पूर्वीचा इतिहास बघता मूर्तींबाबत काय घडले आहे, हे आपण जाणतो. अलीकडेच केशवदेवाच्या मूर्तीसंदर्भात न्यायालयाचा आदेश आला. ‘मआसिर ई आलमगिरी’मध्ये केशवदेवाची मूर्ती ही बेगम मशिदीच्या पायऱ्यांखाली गाडली गेली असल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. हा इतिहासातील उल्लेख असल्यामुळे सर्वात मोठा पुरावाही आहे. असे असताना मूर्तींची अशी अवस्था होत असेल, तर मूर्तीपूजा होणाऱ्या ठिकाणी अन्य धर्मीयांच्या जाण्याचा अट्टहास हा आपोआप शंकास्पद ठरतो. दुसरीकडे त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये इतरांनी न जाणे हेच समाजस्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरते, यात कोणतीही शंका नाही. अर्थात त्यांनाच एकमेकांच्या प्रार्थनास्थळी जायला मज्जाव आहे, ही बाब वेगळी! सुन्नी, शिया, अहमदी आदी अनेकजण एकाच पंथाची लेकरे असली तरी परस्परांच्या प्रार्थनास्थळी जाऊ शकत नाहीत! थोडक्यात, परस्परांच्या धार्मिक स्थानांचा, भावनांचा, श्रद्धांचा आदर ठेवणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे.

इथे लक्षात घ्यायला हवे की, त्र्यंबकेश्वरमधील हा विवाद एकमेव नाही. पूर्वी केदारनाथमध्येही असे प्रकार झाले होते, बद्रिनारायणाच्या देवालयाबाबतही हे घडले होते. या ठिकाणी कोणी काही घेऊन गेले नसले तरी ही दोन्ही स्थाने आपली असल्याचा दावा काही मुस्लिमांनी केला होता. वो बदरीबाबा हैं, असे ते म्हणू लागले होते. याच उत्तराखंडमध्ये मी अगदी महाविद्यालयीन दिवसांपासून जात आहे. तेव्हा तिथे आम्हाला औषधालादेखील मुस्लीम दिसत नव्हते. पण आज तिथे दर शुक्रवारी नमाज पढला जातो. अलीकडेच उत्तराखंड सरकारने अनधिकृत असलेल्या पंधरा कबरी वा मजारी उखडून काढल्या, तेव्हा त्याखाली एकही प्रेत आढळले नव्हते. म्हणूनच अशी काही घटना बघायला मिळतात, तेव्हा शंका येऊ लागते. त्यामुळे आधीपासून सावधपणा राखणे योग्य ठरते. आपल्याला मूर्तीपूजा मान्य नसेल, एखाद्या धर्मातील श्रद्धा मान्य नसतील, तर अशा धर्माच्या प्रार्थनास्थळांमध्ये जाण्याचा अट्टहास का? याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे.

त्र्यंबकेश्वराच्या पहिल्या पायरीवर धूप दाखवणे ही आपली परंपरा असल्याचे अन्य धर्मियांकडून सांगितले जात असले तरी ती परंपरा अचानक कशी आली? असाही प्रश्न पडतो. कारण आजपर्यंत अशी एखादी परंपरा पाळली जात असल्याने स्थानिकांनाही ठाऊक नाही. दुसरी बाब म्हणजे तुम्हाला नुसता धूप दाखवायचा असेल, तर संदल (चादर आणि त्यावर हार) घेऊन जाण्याचे कारण काय? याचेही स्पष्टीकरण मिळायला हवे. धूपच दाखवायचा, तर तो केवळ धूपदाणीनेही दाखवता येतो. खेरीज हे सगळे घडत असताना व्हायरल झालेला व्हीडिओ बघता हा सगळा खूप चांगल्या पद्धतीने चालणारा प्रकार वा चांगले वातावरण असल्याचेही अजिबात दिसत नाही. त्यामुळेच या सगळ्यावरून या पवित्र स्थळी येणाऱ्यांचे हेतू चांगले नव्हते, असे समजण्यास वाव राहतो.

या पार्श्वभूमीवर अकोला, शेवगावसारख्या ठिकाणी जाणवलेला तणाव आणि तिथे पेटलेली दंगल हाही विचारात घेण्याजोगा मुद्दा आहे. तिथली दंगल कोणामुळे पेटली, पेटवणारे कोण होते, त्यांचा उद्देश काय होता? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यामागे केवळ महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करण्याचा उद्देश आहे की, येऊ घातलेल्या निवडणुकांना अपशकून करण्याचा प्रयास आहे, या सगळ्याचा शोध लागणे गरजेचे आहे. कारण यात हिंदू असो वा मुसलमान; भरडला जाणारा नागरिक सर्वसामान्य असतो. दंगलींमध्ये सर्वसामान्य माणूसच मरतो. यात दंगेखोरांचे काहीच बिघडत नसते. म्हणूनच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींप्रमाणे कठोर पावले उचलून आपल्याकडे याचा छडा का लावला जात नाही? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहात नाही. देशात सर्वत्र भयाचे वातावरण निर्माण करण्याचे असे प्रयत्न हाणून पाडणे गरजेचे आहे. कारण, असे मुद्दे निवडणुकांसाठी वापरणे योग्य नव्हे. अलीकडेच पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीच्या आधी पुण्येश्वरानजिकच्या दर्ग्याबद्दलही, प्रचारधुरळा काळात चार-पाच दिवस प्रचंड आरडाओरडा ऐकू आला. पण निवडणूक संपताच तो आवाज कुठे लुप्त झाला हे समजलेही नाही. थोडक्यात, कोणताही पक्ष या विषयाचा राजकारणासाठी उपयोग करण्याची मानसिकता ठेवतो. ही स्थिती आता तरी थांबायला हवी!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -