Friday, May 9, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणरेल्वेगाड्या फुल्ल; उन्हाळी सुट्टीचा प्रवास गर्दीतून!

रेल्वेगाड्या फुल्ल; उन्हाळी सुट्टीचा प्रवास गर्दीतून!

चाकरमान्यांनी घेतला खासगी वाहनांचा आधार

खेड (प्रतिनिधी) :  उन्हाळी सुट्टीसाठी सेंट्रल रेल्वे प्रशासनाने एका मागोमाग एक उन्हाळी स्पेशल गाड्या जाहीर करीत चाकरमान्यांना दिलासाच दिला आहे. या स्पेशल गाड्या विक्रमी गर्दीनेच धावत असल्याने एक्सप्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा सपाटाही सुरूच आहे. मात्र, नियमित गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने उन्हाळी सुट्टीसाठी गावी जायचे तरी कसे? अशी चिंता चाकरमान्यांना सतावत आहे. वेटिंगवर असलेले चाकरमानी खासगी वाहनांचा आधार घेत गाव गाठत आहेत.

उन्हाळी सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, विरार या भागांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो चाकरमानी वास्तव्यास आहेत. शाळांना सुट्ट्या पडल्यानंतर उन्हाळी सुट्टीसाठी कुटुंबीयांसह चाकरमानी गावची वाट धरतात.

चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी रेल्वेचाच प्रवास किफायतशीर व सुरक्षित वाटत असल्याने चाकरमान्यांची पसंती रेल्वेगाड्यांनाच असते. याचमुळे कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांसह स्पेशल गाड्यांचे तिकीट मिळविण्यासाठी चाकरमानी सकाळपासूनच तिकीट खिडक्यांवर रांगा लावतात, मात्र तिकीट खिडकी उघडताच अवघ्या ५ ते १० मिनिटांतच आरक्षण हाऊसफुल्ल होऊन तासनतास रांगेत उभ्या राहणाऱ्या चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडते.

सद्यस्थितीत उन्हाळी सुट्टीत गावी येणारे चाकरमानी प्रतीक्षा यादीवरच आहेत. कोकणकन्या सुपरफास्टचे प्रवाशी ८ मेपर्यंत, तर मांडवी एक्सप्रेसचे १३ मेपर्यंतचे वेटिंग तिकीटही संपले आहे,
तर १४ मे पासूनचे प्रवाशी वेटिंगवरच आहेत.

जनशताब्दी एक्स्प्रेसचेही १२ मे पर्यंतचे वेटिंग तिकीट संपले आहे, तर १६ मे पासूनचे प्रवाशी वेटिंगवरच आहे. तुतारी एक्स्प्रेसचेही प्रवासी प्रतीक्षा यादीवरच आहेत.

उन्हाळी सुट्टीसाठी सेंट्रल रेल्वे प्रशासनाने तब्बल ९४२ उन्हाळी स्पेशलच्या फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. या उन्हाळी स्पेशलही विक्रमी गर्दीनेच धावत आहेत.

याशिवाय कोकणात सोडलेल्या काही गाड्यांच्या तिकीट स्पेशल रेल्वेगाड्यांप्रमाणेच आकारण्यात येत आहेत. हे तिकीट नियमित गाड्यांपेक्षा जास्त असून, चाकरमान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत. मात्र, तरीही आर्थिक भुर्दंड सहन करीत चाकरमानी गाव गाठत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -