- संतोष जाधव
सटाणा : मागिल आठवड्यात बागलाण तालुक्याला सर्वत्र गारपिटीने व अवकाळी पावसाने झोडपल्याने बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकटात सापडलेला बळीराजा या गारपिटीने अस्मानी संकटात सापडला आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी व बळीराजाला दिलासा देण्यासाठी बळीराजाच्या थेट बांधावर राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार यांनी पायधूळ झाडली. आश्वासनांची खैरात केली. बळीराजाला थेट नुकसान भरपाई मात्र अद्याप मिळाली नाही. आर्थिक मदत कधी देणार अशी याची वाट दुःखाच्या खाईत सापडलेला बळीराजा आजही बघतो आहे.
मागिल काही दिवसांपासून बागलाण तालुक्यातील सर्वच भागात जोरदार गारपिट व अवकाळी पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात कांदा, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, पपई, आंबे, यांचे नुकसान झाले होते. मागील आठवड्यात तालुक्यात सर्वदूर कांदा काढण्याचे काम सुरू होते. नेमका तोच हाती आलेला कांदा डोळ्यादेखत वाहून गेल्याने शेतकरी राजा हतबल झाला आहे.
कोसळणारे कांद्याचे भाव, कवडीमोल दराने विकले जाणारे द्राक्ष, हाती येत असलेले डाळींब व आंबे हे या गारपिटीचे व अवकाळी पावसाचे बळी ठरले. यामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले होते. केवळ नुकसान झालेल्या पिकाकडे हताश होऊन बघण्याशिवाय बळीराजाकडे पर्याय नवताच.
या अवकाळी गारपिटीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत घेतली आणि ते थेट तालुक्यातील निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील शेतकऱ्यांच्या बांधावर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व अधिकारी वर्गाचा लवाजमा सोबत घेऊन तीन दिवसात पंचनामे करून तसा तातडीने अहवाल पाठवावा असे आदेश देवून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, भाजपाचे राज्य अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार संजय चव्हाण यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात थेट बांधावर जावून या नुकसानीचा फक्त आढावा घेतला व लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देवू असे आश्वासन शेतकऱ्यांना देत फोटो सेशन करून गेले.
अगदी मुख्यमंत्री ते माजी आमदार यांनी दिलेले आश्वासन कधी पुर्ण होणार? नुकसानभरपाई थेट आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला कधी मिळणार? याकडे तालुक्यातील बळीराजाचे लक्ष लागले आहे. बस झाले पहाणी दौरे, आता आर्थिक मदत करा, असा टाहो बळीराजा फोडतो आहे.