मुंबईत वांद्रे येथे रघुनाथ तेंडुलकर म्हणून श्रीबाबांचे एक भक्त राहत होते. त्यांनी बाबांवर काही कवने केली होती. सावित्री ही त्यांची पत्नी. त्यांचा ज्येष्ठ पुत्र बाबू वैद्यकीय परीक्षेस बसला होता. तो खूप अभ्यास करीत असे. एकदा त्याने ज्योतिषाला मी परीक्षेत उत्तीर्ण होईन का? असे विचारले असता, तो म्हणाला, यावर्षी ग्रहमान चांगले नसल्याने तुम्ही कितीही अभ्यास केलात तरी यश येणार नाही. पुढील वर्षी परीक्षेला बसा. हमखास यश मिळेल. ते ऐकून बाबूला वाईट वाटले. यावर्षी यश मिळणार नसेल तर अभ्यास तरी कशाला करायचा? म्हणून तो स्वस्थ बसला. हे त्याचे वागणे तेंडुलकरांना पटले नाही. मुलाच्या बाबतीत आपण बाबांनाच विचारावे, असा विचार करून त्या शिर्डीला आल्या. त्यांनी बाबांना गाऱ्हाणे सांगितले, बाबा, माझ्या मुलाने वैद्यकीय परीक्षेचा खूप अभ्यास केला आहे. पण एका ज्योतिषावर विश्वास ठेवून ग्रहमान चांगले नाही म्हणून त्याने या वेळी परीक्षेला बसायचे नाही, असे ठरविले. आम्ही काय करावे? बाबा म्हणाले, त्याला सांग कोणत्याही कुडमुड्या ज्योतिषावर विश्वास ठेवू नकोस. पूर्वीप्रमाणेच अभ्यास कर. निश्चिंत मनाने परीक्षा दे. तू उत्तीर्ण होशील. बाबांच्या आशीर्वादाने तेंडुलकरांच्या मनावरचे दडपण कमी झाले. बाबांची आज्ञा घेऊन त्यांनी मुंबई गाठली.
आपल्या मुलांनी त्यांचा निरोप सांगितला. ते ऐकून त्यालाही उत्साह आला. तो पुन्हा अभ्यासाला लागला. पुढे लेखी परीक्षेत बरोबर उत्तरे लिहूनही आत्मविश्वास ढासळल्याने बाबूचा धीर सुटला. तो तोंडी परीक्षा देण्यास तयार होईना. पहिल्या दिवशी परीक्षा सुरू झाली तरी हा गेलाच नाही. दुसऱ्या दिवशी तेंडुलकरांचे एक स्नेही मुद्दाम त्यांच्या घरी आले. ते बाबांना म्हणाले, कालच्या परीक्षेला तू गैरहजर राहिलास म्हणून परीक्षकांनी मला खास येथे पाठविले आहे. त्यांनी मला कारण विचारले असता मी त्यांना तो लेखी परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने तोंडी परीक्षेला आला नसावा. असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, अहो, तो तर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. ते ऐकताच बाबूची निराशा कुठल्या कुठे पळाली. बाबांना वंदन करून तो तोंडी परीक्षेसाठी निघाला. त्याने मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. तेव्हा बाबूला उत्तम गुण मिळाले होत. ही सर्व श्रीबाबांची कृपा! त्यानंतर सर्व परीक्षेत उत्तीर्ण होऊन साईकृपेने तो डॉक्टर झाला.
-विलास खानोलकर