प्रा. देवबा पाटील
चिंचपूर नावाच्या एका गावात एका सधन शेतकऱ्याला पराग नावाचा एक हुशार व खेळकर मुलगा होता. शेतकरी श्रीमंत असल्याने व शेतकऱ्याला माल ठेवायला बरीच जागा लागत असल्याने परागचा घर-वाडा खूप मोठा होता.
खेड्यांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात शिंके लटकविण्यासाठी, बाळांना झोका बांधण्यासाठी किंवा बंगई टांगण्याकरिता छतामध्ये आतील बाजूस ठरावीक अंतरावर लोखंडाचे जाडजूड व मजबूत असे लटकते आकडे हलके बसविलेले असायचे. पराग घरातील एखाद्या रिकाम्या खोलीत रिकामी काठी हळूहळू सरकवीत एखाद्या आकड्याखाली आणायचा. जाड व मजबूत दोर घ्यायचा. काठीवर चढून त्याचे एक टोक पक्के त्या हलक्याला बांधायचा. काठीवरून खाली उतरून ती काठी हलक्याखालून बाजूला सरकवून ठेवायचा. नंतर हातांनी दोर पकडीत व दोन्ही पायांच्या बेचक्यांमध्ये दोर पक्का धरीत हळूहळू तो दोरावरून चढत वर छताच्या आकड्यापर्यंत जायचा नि पुन्हा तसाच खाली उतरायचा. कधी कधी रिकाम्या काठीच्या साहाय्याने घरातील दोन खांबांना हात पुरणार नाही, अशा उंचीवर आडवा दोर बांधायचा. काठी बाजूला सरकवून द्यायचा. एका खांबाजवळ उभा राहून उंच उडी मारून तो दोर पकडायचा. त्या दोराला लटकत लटकत एका खांबाकडून दुसऱ्या खांबाकडे, दुसऱ्याकडून पहिल्या खांबाकडे यायचा.
पराग आपल्या घरात नेहमी मित्रांचे मनोरे रचायचा. त्यावर चढायचा. कधी कधी तो छताच्या एखाद्या आकड्याखाली मित्रांचा मनोरा रचायचा. त्यावर चढायचा. आकडा पकडायचा. मित्रांना मनोरा मोडून बाजूला होण्यास सांगायचा. ते सगळे बाजूला झाल्यानंतर तेथून धपकन् खाली उडी मारायचा. पराग दररोज सायंकाळी शाळा सुटल्यावर पराग नि त्याचे मित्र शाळेच्या पटांगणावर वेगवेगळ्या प्रकारचे कबड्डी, खो खो, हुतुतू, आट्यापाट्या वगैरे खेळ भरपूर खेळायचेत. अशा रीतीने हा खेळकर पराग आपले शरीर चपळ, चलाख व मन निकोप बनवत होता.
अशाच एका दिवशी संध्याकाळी गावाशेजारच्या मैदानावर पराग व त्याचे मित्र कबड्डी खेळ खेळत होते. त्या दिवशी त्यांचा खेळ चांगलाच रंगात आलेला असल्याने त्यांना संध्याकाळ केव्हा झाली हे कळलेच नाही. रमतगमत, गोष्टी करत शांततेने ही बालमंडळी घराकडे येत होती. गावाचा मैदानाकडून येणारा मुख्य रस्ता संपून जो तो आपापल्या घराच्या वाटेस लागला होता. परागसुद्धा आपल्या घराच्या गल्लीकडे वळला.
एवढ्यात त्याला एका बाईचा चोर! चोर! असा आवाज ऐकू आला. पकडा, पकडा, माझे मंगळसूत्र त्या चोराने तोडले. ती बाई ओरडत होती. परागने तिकडे बघितले, तर खरोखरच एक लफंगा माणूस त्याला मैदानाकडे धावताना दिसला.
धावता-धावता त्याने मंगळसूत्र खिशात टाकल्याचे सुद्धा परागने बघितले. मग काय विचारता? पराग तर धावण्यात खूप पटाईत होता. तो वाऱ्याच्या वेगाने त्या चोराच्या मागे धावू लागला. बाईचे ओरडणे ऐकून परागचे मित्रही धावत आले व तेही परागसोबत चोराचा पाठलाग करू लागले. पण पराग आधी गेल्याने तो सर्वांच्या पुढे होता. चोर धावण्यात आपल्यापेक्षाही पटाईत आहे, हे परागच्या लक्षात आले. शेवटी परागने धावत असतानाच एक युक्ती योजली.
पराग धावता धावता जोराने ओरडला, सोमू, नामू तुम्ही उजवीकडून व्हा. गणू, भानू तुम्ही डावीकडून या. बाकीचे माझ्या मागे या. त्याचा हा आवाज ऐकून चोर थोडा दचकला व त्याने धावत धावत मागे वळून पाहिले. त्यामुळे त्याचा धावण्याचा वेग किंचितसा कमी झाल्याने पराग त्याच्यापर्यंत पोहोचला. त्याने पुन्हा धावण्यासाठी समोर वळताच परागने आपले उजवे पाऊल त्याच्या एका पायाच्या पावलात अडकवले. त्याबरोबर तो चोर धाडकन खाली पडला नि पराग त्याच्या मानगुटीवर बसला.
तोपर्यंत सगळी बालसेना तेथे पोहोचली. परागने त्याच्या खिशातील मंगळसूत्र काढले. त्याला साऱ्यांनी बदडत बदडत ती बाई जेथे उभी होती तेथे आणला. मंगळसूत्र त्या बाईच्या स्वाधीन केले. त्या बाईने परागचे आभार मानले. बाईच्या ओरडण्याच्या आवाजाने गावातील तेथील आसपास राहणारे लोकसुद्धा पटापट घराबाहेर धावत आले होते. साऱ्यांनी परागची प्रशंसा केली व चोराला गावाच्या पोलीस पाटलाच्या ताब्यात दिले.