अनुराधा दीक्षित
लक्ष्मी गेली २५-३० वर्षं तरी आमच्याकडे काम करीत होती. अंगण झाडणं, भांडी घासणं कधी तरी लाद्या धुणं वगैरे. पार पाच कि.मी.चालून धनगरवाड्यातून यायची. तिला पर्यायच नव्हता. कारण तिचं एकच घर. एक कि.मी.च्या परिघात दुसरं घर नाही. शेजार नाही, पण बाई जिगरबाज! एवढा कातळसडा तुडवून ती खालच्या सुखवस्तू वस्तीत यायची. ५-६ घरी धुणीभांडी करायची. आपल्या चिल्यापिल्यांचं पोट भरायची. तिचं आयुष्य म्हणजे चित्तरकथाच!
तीन मुलं झाल्यावर नवऱ्यानं टाकली. दुसरा घरोबा केला. लक्ष्मीला एका पैशाची मदत नाही. ती आपल्या आजीच्या आसऱ्याला आली आणि तिथेच रूळली.
एक अक्षरही न शिकलेल्या लक्ष्मीची अक्कलहुशारी मात्र वाखाणण्याजोगी. पैशांचा हिशेब शिकलेल्यालाही जमणार नाही इतका छान कळायचा तिला. तोंडाने फटकळ अंगापिंडाने उंचनींच आणि मजबूत. पण म्हणूनच कोणी तिच्या वाटेला जायची हिंमत करीत नसे.
आपल्या दोन पोरींना नाही शिकवलं, आपल्या मदतीला घेऊन जायची. मुलाला मात्र एसेस्सी केलं. कोकणी परंपरेनुसार ‘झील शिकलो की, मुंबैक जावन् कायतरी कमावतलो’ या चालीवर बाबू मुंबईला जाऊन कुठच्या तरी वकीलाच्या बंगल्यावर माळीकाम करू लागला. चार पैसे आईला धाडू लागला. तेवढाच लक्ष्मीला हातभार. पण कसलं काय? दोन वर्षांत बाबूने लग्न केलं. पाठोपाठ चार मुली झाल्या. कुठच्यातरी झोपडपट्टीत भाड्याच्या खोलीत राहत होता. बायको पण चार घरी धुणीभांडी, झाडूपोछा करू लागली. वाढत्या संसाराला काय नको? पोरी जवळच्याच पालिकेच्या शाळेत कशाबशा शिकत होत्या. हाता-तोंडाची गाठ पडणं मुश्कील होत होतं.
लक्ष्मीला त्याची ही परिस्थिती बघवत नव्हती. तिला रेशनवर शंभर रुपयांत तीस किलो धान्य मिळत होतं. तेच धान्य ती गावातून जाणाऱ्या एसटीवरून पोत्यांत भरून पाठवायची. म्हणून बाबूच्या घरची चूल पेटायची. आईच लेकाचा संसार चालवत होती. इकडे जवळच्याच गावातले शेतीवाडी, घरवाले मुलगे बघून लक्ष्मीने पोरींची पण लवकरच लग्न लावून दिली. तिचे काबाडकष्ट काही संपत नव्हते.
तिच्या दोन मामांपैकी एकाचं लग्न झालेलं. तो पण बेवडा. त्याला एक मुलगी. पण ती दीड वर्षाची असतानाच पावसाळ्यात एका चिरेखाणीत पडून तो मेला. भरीत भर म्हणून त्याची बायको अकलेने थोडी कमीच. तिची आणि तिच्या मुलीची जबाबदारी लक्ष्मीवरच येऊन पडली. लक्ष्मीने बयोला अगदी फुलासारखी सांभाळली. तिला जीव लावला. ती पण लक्ष्मीलाच ‘आई’ म्हणू लागली.
आतापर्यंत लक्ष्मी एका केंबळ्याच्या झोपडीत आजीबरोबर राहत होती. त्यात ना लाइट ना पाणी. पहाटेच उठून पोखरबावीवर ती हंडे घेऊन पाणी भरायला जायची. तिकडेच कपडे धुवायला न्यायचे. वर्षांनुवर्षे ह्या दिनक्रमात काही बदल नव्हता. शिवाय परिसरात वावरणाऱ्या बिबटे, कोल्हे, डुकरं, सरपटणारी जनावरं या सगळ्यांचा सामना करत तिचं खडतर जीवन पुढे चाललं होतं.
आता आजूबाजूला परिस्थिती बदलत होती. बरीच वर्षे नुसतं पडीक माळरान असलेल्या जमिनी धनदांडगे खरेदी करू लागले. स्लॅबची घरं बांधू लागले. विहिरी पाडून कलमांच्या बागा उठवू लागले. लक्ष्मीची झोपडी मात्र त्यात दयनीय दिसू लागली. पण डोकेबाज लक्ष्मीने आपल्या आजीचं वय लक्षात घेऊन तिची जमीन, झोपडी मामाच्या मुलीच्या नावाने करण्यासाठी तलाठी, तहसीलदार, ग्रामपंचायत अशा कुठल्या कुठल्या ऑफीसमध्ये खेटे घालून, आमदारांकडे गाऱ्हाणं घालून ते नावावर करून घेण्यात यशस्वी झाली.
एका बागवल्या दयाळू डॉक्टरांच्या बागेत मजुरी करून त्यांच्याकडून कर्ज काढून पैसे घेतले. दोन-तीन खणांचं चिरेबंदी कौलारू घर बांधलं. मग विजेच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे घरात वीजजोडणीसाठी अर्ज केला. दारिद्र्यरेषेखाली उत्पन्न असलेल्यांना मिळणाऱ्या सवलतीतून तिला नाममात्र पैसे भरून मीटर मिळाला. एका इलेक्ट्रिक फिटिंगवाल्याकडून तिने वीज जोडणी करून घेतली. मग दोन वर्षांनी मुलांच्या मदतीने बोअर मारून घेतली. गेल्या तीस-चाळीस वर्षांपूर्वीपासूनचा लाइट, पाण्याचा वनवास संपला! स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनी लक्ष्मीच्या घरी वीज आली! केवढी ही देशाची प्रगती!!
आज बयो पण शिकली. गावात राहूनच छोटी-मोठी कामं करते. लक्ष्मीची आजीही पाच वर्षांपूर्वी देवाघरी गेली. तेव्हा लक्ष्मी खूप रडली! ती नसती, तर तीन कच्च्याबच्च्यांना घेऊन ती कुठे जाणार होती? केंबळारू झोपडीत राहणारी लक्ष्मी स्वाभिमानाने स्वकष्टाच्या पक्क्या घरात राहत होती. पोटच्या पोरीप्रमाणे सांभाळलेल्या बयोच्या नावावर घर, जमीन करून स्वतःसाठी एक खोली बांधली होती. कधी काळी माघारपणाला आलेल्या पोरींना, नातवंडांना हक्काने राहण्यासाठी.
आता तिला तिथून कुणीही बाहेर काढू शकत नव्हतं. निराधार झालेल्या तिनेच सगळ्यांना आधार दिला होता. वटवृक्षासारखा! सर्वांवर मायेची सावली धरली. अलीकडे तिचं वय झालं.आता ती कामाला येत नाही माझ्याकडे. पण सणासुदीच्या निमित्ताने मी तिला आवर्जून काहीतरी घेण्यासाठी थोडेफार पैसे बयोच्या हाती धाडून देते.
आठ दिवसांपूर्वी मी जिन्नस खरेदीसाठी बाजारात गेले. ‘वयनीनू… मला मागून हाक ऐकू आली. मागे वळून पाहिलं, तर लक्ष्मी बयोचा हात धरून एका हातात काठी घेऊन माझ्या दिशेने येत होती. तिला पाहून खूप आनंद झाला. बिचारीचे गुडघे आता बोलू लागले होते. डॉक्टरकडे उपचारासाठी आली होती. आम्ही एकमेकींची चौकशी करत होतो. दोघींच्याही डोळ्यांत पाणी होतं. मी तिच्या हातात पैसे कोंबत म्हटलं,
‘आता चालत जाऊ नकोस, रिक्षा करून जा! नक्की.’ ‘व्हय वैनीनू!’ ती हसत हसत डोळे पुसत रिक्षाच्या दिशेने निघून गेली. मीही आनंदाने डोळे पुसले! मनात आलं अशा किती लक्ष्मी आपल्या आसपास वावरत असतील!