Share

अनुराधा दीक्षित

‘देवी आईचा गोंधळ, बोलं तालावर संबळ’ असं म्हणत गर्भागारात निद्रिस्त असलेल्या आईला, मूळ आदिशक्तीला जागं करण्यासाठी ‘दार उघडं बये, आता दार उघड’ असं संकटात सापडलेला भक्त आर्ततेने साद घालतो. ‘दारावर मोठं संकटांचं वादळ धडका देतंय. त्याचं निवारण करण्यासाठी मला बळ दे’ असं विनवू लागतो. मग सुरू होतो आदिमाता आदिमाया स्त्रीशक्तीचा जागर!

भक्तांना ही आदिमाया कधी जगदंबा, दुर्गा, कालिमाता, महालक्ष्मी, चंडिका, सरस्वती अशी नऊ दिवस नऊ रूपं नवरात्रीत पाहायला मिळतात. कधी हे रूप वत्सल मायेचं, कधी असुरमर्दिनी रणरागिणीचं, कधी तेजस्वी लक्ष्मी, तर कधी सात्त्विक, शांत असं सरस्वतीमातेचं सोज्वळ रूप! ही सगळीच रूपं सर्व भक्तांना काही ना काही संदेश देणारी, मार्ग दाखवणारी, प्रेरणा, बळ देणारी. महत्त्वाचं म्हणजे ही सगळी रूपं सर्वव्यापी अशा स्त्रीशक्तीची आहेत.

पण गेली काही शतकं स्त्रीला अबला मानून तिचं खच्चीकरण केलं गेलं, तिला कमी लेखलं गेलं. पण एक स्त्री मनात आणलं, तर काय काय करू शकते, हे अनेक स्त्रियांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय.

ही सर्व रूपं जगन्मातेची आहेत. जिच्या मायेने सारं विश्व निर्माण झालं. म्हणजे मुळातच ती माता आहे. साऱ्या सृष्टीला पाळण्यात घालून जोजावते आहे. पाळण्यातल्या इवल्याशा जिवासाठी तिच्या दृष्टीत दिसतं ते केवळ प्रेम, वात्सल्य, माया, जिव्हाळा, काळजी…

पृथ्वीवरील सर्व स्त्रियांना, मातांना तिने जणू आपल्यातला हा अंश बहाल केला आहे. ‘कुपुत्रो जायते कश्चित् क्वचिदपि कुमाता न भवति।’ असं एक सुभाषित आहे. म्हणजे तिच्या मुलांपैकी एखादा मुलगा वाईट निपजेल, पण आई कधीही वाईट नसते!’ कारण मुळातच जे बाळ तिच्या पोटी जन्माला येतं, त्यासाठी नऊ महिने आपल्या उदरात स्वतःच्या रक्तामांसावर पोसते, वाढवते. त्यानंतर प्रसूती वेदना सहन करून ती अपत्याला जन्म देते. एक कोवळा जीव तिच्याच कुशीत पहिलं ‘ट्यांहा’ करतं. तिच्या उबेत सुरक्षितपणे आणि निश्चिंतपणे झोपतं. दिसामासाने वाढणाऱ्या आपल्या प्रिय बाळाची क्षणोक्षणी होणारी प्रगती पाहून तिचा ऊर भरून येतो. तिचा आनंद गगनात मावेनासा होतो.

आपलं बाळ जसं आहे, तसं मातेला प्रिय असतं. ते धडधाकट असो, काळं-गोरं असो की, एखादं व्यंग त्याच्यात असो… ती त्याला जिवापाड जपते. त्याला कोणत्याही अनिष्टाची दृष्ट लागू नये, म्हणून डोळ्यांत तेल घालून त्याच्याकडे लक्ष ठेवते. इतकं सगळं आपल्या स्वार्थापलीकडे जाऊन करणारी आई ‘कुमाता’ कशी असेल?

पण मूल मोठं असताना आईबरोबरच त्याच्यावर अन्य व्यक्ती, समाज, मित्र-मैत्रिणी यांच्या प्रभावामुळे ते घडतं किंवा बिघडतंही! म्हणूनच आदिमायेकडून माणूस घडवणाऱ्या स्त्रीला मिळालेली ही मातृत्वाची देणगी, शक्ती केवळ अद्वितीय आहे. कारण स्त्रीलाच ही शक्ती मिळाली आहे. पुरुष मूल जन्माला घालू शकत नाही. कदाचित नवीन विज्ञानयुगात कृत्रिमरीत्या तेही घडू शकेल. पण शेवटी ते कृत्रिमच! म्हणूनच आई ती आई! स्त्रीच्या किंवा आईच्या पोटी जन्माला येणं हे मोठं भाग्य आहे. तीच आपल्याला या लौकिक जगात आणते. आपलं बोट धरून त्याची ओळख करून देते. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!’ हे उगीच नाही म्हटलेलं!

आईचा वरदहस्त मुलावर नसेल, तिचं पाठबळ नसेल, तर मुलांना किती खडतरपणे आयुष्याचा प्रवास करावा लागतो, याचा कित्येकांना अनुभव येतो… फ. मु. शिंदेंची एक
कविता आठवते,
‘आई एक नाव असतं,
घरातल्या घरात गजबजलेलं
गाव असतं…
सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही,
आता नसलीच कुठे तरी नाही म्हणवत नाही’
तशीही आईची थोरवी अनेक कवी-लेखकांनी आपल्या कविता-कथांमध्ये शब्दबद्ध केली आहे. कोणी म्हणतात, ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी’ हे खरंच आहे. म्हणूनच तर जिजाऊंनी शिवरायांना घडवलं, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. श्यामच्या आईने साने गुरुजींना घडवलं, अगदी प्राचीन काळात कौसल्यामातेनं श्रीरामाला घडवलं, श्रीकृष्णाला यशोदामातेनं घडवलं, सिंधुताई सपकाळांनी आपल्या अनाथ मुलांना घडवलं..‌. किती
उदाहरणं द्यावीत?

हेही खरं की, काही वेळा आईच्या मुलांवरील अतिरेकी आणि आंधळ्या प्रेमामुळेही मुलं चुकीची वागतात. त्याचा परिणाम मुलांच्या आयुष्यावर तर होतोच, पण आई-वडिलांना खूप काही भोगावं लागतं. ‘हेचि फळ काय मम तपाला?’ असं म्हणण्याची पाळी त्यांच्यावर येते.

आई मुलाला जन्माला घालून या जगाचं दार त्याच्यासाठी किलकिलं करून दिलं. पण जगात वावरताना मुलाला योग्य रस्त्यावर नेऊन सोडणं हे तिचं कर्तव्य आहे. त्यासाठी तिने आपल्या डोळ्यांवरची आंधळ्या प्रेमाची पट्टी काढली पाहिजे. आपल्या सारासार विचारांचं, विवेकाचं, सकारात्मकतेचं दार तिने मुलांच्या हितासाठी उघडलं पाहिजे, तरच पुढची पिढी आपलं उज्ज्वल भवितव्य घडवू शकेल. म्हणूनच मन आणि बुद्धीचं ‘दार उघड बये दार उघड!’

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

54 minutes ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

1 hour ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

1 hour ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

1 hour ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

2 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

4 hours ago