माधवी घारपुरे
दिवस कसे असतात नाही? श्रावणातल्या हिंदोळ्यासारखे! मंद वाऱ्याच्या झुळुकीत, मधूनच येणाऱ्या सरीसारखे मोहविणारे! मंद लयीत खालून वर नि वरून खाली येणारे. हिंदोळ्याच्या लयीबरोबर मानवी मनाची लय साधते. मन भूतकाळात हरवते आणि पिकलेले केस काळेभार होतात.
प्रौढत्वाकडे काय किंवा वृद्धत्वाकडे झुकलेलं मन कधी यौवनात डोकावतं, तर कधी कौमार्यात, कधी किशोरावस्थेत. किशोरी वय म्हटलं की फक्त शाळा आणि शाळा.
अनेक गमती-जमती आठवतात. कधी उत्तर बरोबर म्हणून कौतुक, तर कधी बडबड केली म्हणून बाकावर नाही तर वर्गाबाहेर. मग डोळ्यांतली आसवं… पण एकाच वर्गातून बाहेर घालवलेला आणि कौतुक केलेला एकमेव प्रसंग म्हणजे “पोपटी वायूचा पोपट”
राहून राहून आठवतो तो पोपटी वायूचा प्रयोग. पूर्व परीक्षा जवळ आली होती. पुन्हा एकदा सगळ्या प्रयोगांची उजळणी पटवर्धन सर घेत होते. रोज एक-एक प्रयोग दाखवण्याचा त्यांचा इरादा.
सायन्सचे पटवर्धन सर म्हटले की, डोळ्यांसमोर येते ती पाच ते सव्वापाच फुटांची, गोरी-गोरीपान व्यक्ती. चेंडूसारखा गोल गरगरीत चेहरा, टप्पोरे काळे डोळे, डोळ्यांवर जाड भिंगाचा काळा चष्मा. दोन्ही हात कमरेवर ठेवून दोन्ही पायावर डुलता डुलता रोखून जर कुणाकडे पाहू लागले, तर भीतीच वाटायची. पण मन मात्र मेणासारखं मऊ होतं. सफरचंदासारखे लाल गाल फुगवत, पोटाचा घेर सावरत, अर्ध झालेल्या टकलावरून डावा हात फिरवत फिरवत वर्गात प्रवेश केला की, आपोआप वर्ग आनंदी होई.
त्या दिवशी काळा पट्टा घातलेली पांढरी पँट पोटावर घेत सर म्हणाले, “आज पोपटी रंगाचा पोपट म्हणजे क्लोरीन वायू आपण तयार करायचा. साहित्य, कृती, गुणधर्म, उपयोग माहीत आहेतच. नीट लक्ष देऊन पाहा फक्त.”
मी आणि रेखा पहिल्याच बाकावर होतो. गप्पा मारत होतो. पोपटी रंग पाहण्यात खरा इंटरेस्ट होता. तशी वर्गात माझी स्वाती काही खूप हुशार, पहिल्या नंबरातली वगैरे अशी नव्हती. शांत, एकाग्र अशी विद्यार्थिनी पण नव्हती. साधारण दहाच्या आत
नंबर असे.
प्रथमपासूनच सुरुवात, “सर किती वेळात पोपटी रंग येणार?”
“जरा गप्प बसायला काय घेशील?”
“पण सांगा ना सर!”
“आता नीट बघ आधी.”
प्रयोगाला सुरुवात झाली. सगळा वर्गच मुळी उत्सुक होता. सरांनी स्टँडवर चंबू ठेवला. Mn2 घातले. चंचूपात्रात उष्णता दिली आणि वरून हळूहळू Hcl नळीचे तोंड बुडेल एवढे ओतले. आता माझ्या उत्सुकतेला गप्पच बसता येईना.
“सर कुठे गेला पोपटी रंगाचा वायू? सर पाच मिनिटं होऊन गेली ना?”
“तुझं थोबाड पहिले बंद कर.”
मी दोन्ही हात तोंडावर ठेवून रेखाकडे बघून हसू लागले. सगळी मुलं खुसुखुसू करू लागली. एक मुलगा म्हणाला, “पटवर्धन सरांचाच मोठा पोपट झाला.”
आता मात्र सर अपसेट झाले. मी आता तरी गप्प बसावे ना? मला अधिकच चेव चढला.
“सर पोपटी रंग कुठं गेला?” मुलांच्या मनातला प्रश्न मी उघड केला. सगळा राग माझ्यावर आला आणि सर जोरात ओरडले. “You get out first.”
सराज्ञा. मी बाहेर गेले. सगळा वर्ग चिडीचूप्प! मला वाटले हा माझ्यावर अन्याय आहे. मी काही चूक बोलले का? डोळ्यांच्या कडा ओल्या होऊ न देता बाहेर उभी राहिले. अख्ख्या वर्गाच्या दृष्टीने मी अपराधी होते. पटवर्धन सर हाच माझा आता शत्रू होता.
१० मिनिटे गेली पण पोपटी रंग काही येईना. माझी कळी खुलू लागली. सरांनी लॅब असिस्टंट पोंक्ष्यांना बोलावले. रिटायरमेंटला आलेले अत्यंत गरीब स्वभावाचे धोतर, शर्ट, काळी टोपी घातलेले पोंक्षे आले. घाबरलेच होते.
“पोंक्षे, अहो या बाटलीत काय होते?”
पोंक्षे बिचारे साधे गृहस्थ. विज्ञान क्षेत्रात कशाचे काय होते त्यांना काय कल्पना? त्या दिवशी मुख्य लॅब असिस्टंट रजेवर होते. म्हणून पोंक्षेंनी सामान आणून ठेवले होते.
“बोला पोंक्षे यातून काय आणलंत?”
“सर” थरथरत ते म्हणाले, “Hcl लिहिलेल्या बाटलीत थेंबभर Hcl होते, म्हणून त्या बाटलीत थोडेसे पाणी घालून ती खळखळून धुतली आणि तेच पाणी आणले.”
सरांनी कपाळावर हात मारून घेतला. हसता हसता सफरचंदाचे गाल टोमॅटोसारखे झाले. गरागरा डोळे फिरवत सरांनी कोपरापासून हात जोडले आणि म्हणाले, “आता जा”
“पोंक्षेबुवा इथं भेटलात तेवढे पुरे बरं का!”
खाली मान घालून शरमलेले पोंक्षे वर्गाबाहेर गेले. वर्गाला उद्देशून सर म्हणाले,
“मुलांनो, अज्ञानसुद्धा निखळ असेल, तर ते निरागस असते, याचा अनुभव आपण आज घेतला. कोणतीही लपवाछपवी नाही. खोटं बोलणं नाही.”
याचप्रसंगी मला माझ्या आनंदाशिवाय काही दिसत नव्हते. तो आनंद आसुरी असेल. पण मी जिंकले होते, गर्वाने फुलले हाते. सरांचे शब्द कानावर आले.
“कुलकर्णी त्या लिमयेला आत बोलाव गं, तिची जागा आत आहे.” मी दिमाखात आत जाऊन सरांसमोर उभी राहिले.
सर म्हणाले, “लिमये तू जिंकलीस मी हरलो.”
मला माझा फार मोठा विजय वाटला. पोपटी वायू दिसलाच नाही. पण मी खरंच जिंकले होते का? १९६७ सालातली ही घटना! किती मूर्ख होते मी! खरं तर सरांनी त्यांच्या वर्तनाने मला हरवलं होतं. विद्यार्थ्यांसमोर, वर्गासमोर “मी नीट तपासणी केली नाही. ही शिक्षक म्हणून माझी चूक होती,” असं म्हणाले आणि मला त्यात जय, आसुरी आनंद वाटला.
गुरूचा पराभव कधीच होत नसतो. शिक्षक रेल्वेच्या रुळासारखा त्याच ठिकाणी असतो. विद्यार्थी पुढे लांब लांब प्रवासाला जातात. रूळ बघतच राहतो. सरांच्या चुकलेल्या प्रयोगाने मला शिकवले. चूक ती चूक. ती कोणासमोरही कबूल करता आली पाहिजे. नवा धडा मिळाला. असेच शिक्षकांनी दिलेल्या शिदोरीवर यशस्वी जीवन जगता आले.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…