प्रा. देवबा पाटील
सागपूर नावाच्या गावात संपत व रमा नावाचे एक जोडपे आपल्या लहानशा झोपडीवजा घरात राहत होते. ते परिस्थितीने खूप गरीब होते. संपत एका जमीनदाराच्या शेतात कामाला जायचा. रमा मोलमजुरी करायची. त्यांना साकेत नावाचा एक मुलगा होता. त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्याने साकेतला बालपणापासूनच छोटी-मोठी कामे करावी लागली.
साकेतला पशू-पक्ष्यांबद्दल बालपणापासूनच खूप प्रेम होते. आपल्या लहानशा झोपडीवजा घरातील पांढऱ्या-पांढऱ्या मनीमाऊशी तो खूप बोलायचा. तिला गोंजारायचा, दूध पाजायचा. तिच्यासोबत खेळायचा. करड्या करड्या रंगाच्या चिमण्यांना घरासमोरील छोट्या अंगणात दाणे टाकायचा. त्यांच्यासाठी प्लास्टिकच्या वाटीत पाणी भरून ठेवायचा. त्यांना दाणे टिपताना पाहून त्याला खूप मजा वाटायची. हिरव्या-हिरव्या पोपटांना तर तो भान हरपून बघायचा. त्यांच्यासाठी अंगणात डाळी टाकायचा.
एकदा तो असाच शाळेतून घरी परत येत असताना काही टारगट मुले त्याला एका डबक्यात दगडं मारीत असताना दिसली. त्याने जवळ जाऊन बघितले, तर त्या डबक्यात एक छोटेसे छानसे कासवाचे पिल्लू होते. साकेतला ते दृश्य पाहवले गेले नाही. त्याने त्या टारगटांना प्रेमाने समजाविले व त्या छोट्या कासवाला उचलून आपल्या घरी घेऊन आला. घरी येताबरोबर त्याने नेहमीप्रमाणे आपल्या आईला हाक मारली व म्हणाला, “आई पहाय, मीनं कसं मस्त पिटुकलं कासव आणलं.”
आई म्हणाली, “आता एखांद्या मोठ्या बादलीत चांगलं पानी घेऊन त्यात त्याले ठीव. त्याले खायाले त्यात थोडासाक भाकरीचा चुरा टाक. कालदी बाबासंगत त्याले आपून वावरात पाठवून दिऊ.” हे ऐकून साकेतला खूप आनंद झाला.
सायंकाळी संपतने त्या कासवाला बघितल्यानंतर तेसुद्धा खूश झाले; परंतु शेतीच्या कामाच्या गडबडीमुळे संपतचे त्या कासवाला जमीनदाराच्या शेतात नेणे काही जमत नव्हते. शेतातील कामाचा व्यापच इतका होता की, कामाच्या धांदलीत त्याला आठवणही नाही राहायची. त्यामुळे कासवाच्या पिल्लाचा मुक्काम साकेतच्याच घरी राहिला.
ते बघून तर साकेतला खूप खूप आनंद झाला. तो शाळेत जाण्याआधी, शाळेतून आल्यानंतर दररोज कासवासोबत खेळायचा. कधी त्याला बादलीत ठेवायचा, कधी टोपल्यात ठेवायचा, कधी जमिनीवर मोकळा सोडायचा. दोघांची आता चांगलीच गट्टी जमली होती. हळूहळू दिसामासाने दोघेही मोठे झालेत.
दुर्दैवाने साकेतच्या वडिलांचा मृत्यू झाला व घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे साकेतला आपले शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागले. तो आईसोबत जमीनदाराच्या शेतावर जाऊ लागला. पण त्याने कासवाला कधीच दूर केले नाही वा विहिरीतही सोडले नाही वा कासवही त्याला सोडून गेले नाही. तो सदैव कासवाला आपल्यासोबतच ठेवायचा. आपली कामे करताना त्याला मोकळा सोडायचा. कासवही आता मोठे झाल्यामुळे किडा-किटकाला खाऊन आपले पोट भरायचे, ते मस्त जमिनीवर फिरायचे, शेतातील पाटांच्या पाण्यात खेळायचे व पुन्हा परत सतत साकेतच्या जवळ यायचे व आसपास राहायचे.
एके दिवशी त्याची जमीनदारीण शेतात आलेली होती. त्याची आई व तिने त्या दिवशी शेतात काही रोपे लावण्याचे काम केले. नंतर दुपारचे जेवण करण्यासाठी ते नेहमीसारखे जेवणापूर्वी हात धुण्यासाठी सारे नाल्याच्या काठावर हात धुण्यास गेले असता हात धुताना जमीनदारीणीच्या बोटातील सोन्याची अंगठी नाल्यात पडली. सारे चिंताग्रस्त झाले. साकेतचे कासव त्याचे काम संपल्यावर नेहमी त्याच्याजवळ असायचे त्यामुळे कासवसुद्धा हा सारा प्रकार बघतच होते.
आता काय करायचे हा विचार करीत असताना साकेतने आपले कासव उचलले. तो त्याच्याजवळ काहीतरी पुटपुटला. कासवाला जणूकाही सारे समजले, अशी त्याने आपली मान हलवली व साकेतने त्याला पाण्यात सोडले. ते पोहोत पाण्यात खाली गेले व थोड्याच वेळात कासव अंगठी आपल्या तोंडात घेऊन पाण्यावर आले. सगळ्यांना आनंद झाला. कासव पाण्याबाहेर येताच साकेतने त्याला ओल्या अंगानिशीच उचलून घेतले, प्रेमाने कुरवाळले व विनम्रतेने अंगठी मालकिणीच्या हाती दिली. साऱ्यांनी कासवाची पाठ थोपटली.