मुंबई : अनंत चतुर्दशीनिमित्त देशभरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. मुंबईतील बहुचर्चित लालबागच्या राजाच्या गणेशमूर्तीचे आज सकाळी गिरगाव चौपाटीवर तब्बल २३ तासांनी विसर्जन करण्यात आले. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भाविक हजारोंच्या संख्येने जमा झाले होते.
दरवर्षी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटींपासून, नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी चौपाटीवर लोटली होती. यांत्रिक तराफ्याच्या सहाय्याने लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेऊन निरोप दिला.