अनुराधा परब
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या भारतवर्षामध्ये आजही विविध प्रांतांमध्ये राजवंश अस्तित्वात आहेत. खरंतर ते रूढार्थाने कोणत्याही विशिष्ट प्रदेशाचे सत्ताधीश नाहीत. समाज आणि लोकमानसामध्ये त्या राजवंशातील आजच्या पिढ्यांविषयी पूर्वीइतकाच सन्मान, आदरभावना आहे. स्थानिक पातळीवर होणाऱ्या वेगवेगळ्या उत्सव, समारंभांमध्ये यांना मानाचे स्थानही आहे. ‘तरीही उरे काही उणे’ अशी भावना कायम असल्याचे असे हे सोहळे पाहताना वाटू शकते. त्याचे कारण राजेशाही सोहळ्यांची सर त्याला येत नाही म्हणून. सिंधुदुर्ग जिल्हा मात्र या सगळ्याला अपवाद ठरतो. सिंधुदुर्गात सावंतवाडी येथे लखम सावंतांचा राजवंश आणि इनामदार देवस्थानांचा रुबाब आजही श्रीमंती थाटाचा आहे. दक्षिण कोकणात देवालाच गावं इनाम मिळालेली असल्यामुळे इथे सत्ता देवाची चालते. पर्यायाने या देवस्थानांमधील दैनंदिन कार्यक्रमातील षोडशोपचार पूजाअर्चा, विधी ते वर्षातील विविध उत्सवांचे स्वरूप हे राजवर्खीच असते.
सिंधुदुर्गामध्ये साळशी, किंजवडे, कोटकामते, आचरा अशी काही इनामदार देवस्थाने आहेत आणि त्यांचा कारभार हा देवाच्या संमतीनेच चालतो. इथल्या प्रथा – परंपरा, उत्सव यावर संस्थानिक दर्जाचा ठसा आहे. साधारणपणे समूहाच्या, देवस्थानाच्या वहिवाटीसाठी तर कधी देखभाल खर्चासाठी इथपासून ते शौर्य गाजवलेल्या किंवा बुद्धिचातुर्य दाखवलेल्या व्यक्तींच्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी राज्यकर्त्यांनी दिलेले उत्पन्नाचे नेमस्त साधन म्हणजे इनाम किंवा वतन. या इनामामध्ये चाकरी, अधिकार, हक्क, नेमणूक यांच्या जोडीने आखून दिलेली कर्तव्ये करणे अपेक्षित असते. उत्पन्नाच्या शाश्वतीची ही हमी वंशपरंपरागत कायम राहण्यासंबंधीचा दस्तऐवज कधी ताम्रपत्र, शिलालेख, सनद इत्यादी माध्यमांतून सोपविलेला असतो. काही ठिकाणी ग्रामसंस्थांचा कारभार सुरळीत चालण्यासाठी राज्यकर्त्यांनी वतने लिहून दिल्याच्या नोंदी सापडतात. इनाम म्हणून अलंकार, जडजवाहिरे, मुद्रा दिल्याच्या गोष्टी इतिहासाच्या पानोपानी सापडतील. मात्र अशा प्रकारे गावं इनाम देण्याची पद्धत काही अभ्यासकांच्या मते इसवी सनाच्या सुरुवातीपासून असावी. चालुक्य – राष्ट्रकुटांच्या काळापासून गावातील शासनव्यवस्थेसाठी काही कुळांकडे अधिकार देण्याची प्रथा रूढ झाली असावी. कायदेशीररीत्या जमीन इनाम देऊन ग्रामव्यवस्थेचा गाडा दक्षतेने चालविण्यासाठीची ही सोय होती. यादव काळामध्ये तर याला प्रस्थापित रूप आले. मध्ययुगात राजसत्ता बदलल्या तरी ग्रामसंस्कृतीमध्ये इनाम मिळालेल्या गावांच्या स्थानिक नैमित्तिक कामात, लोकव्यवहारामध्ये फारसा बदल घडला नाही. मराठेशाहीमध्ये वेतनव्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली. महसूल वसुलीकरिता त्यांनी विविध पदांची निर्मिती केली. स्वराज्यनिष्ठांना अभय आणि शत्रूंशी हितसंबंध ठेवणाऱ्या वतनदारांकडील वतनांवर कठोर निर्बंध घातले गेले.
सतराव्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी कुडाळच्या लखम सावंताच्या विनंतीवरून तहाच्या द्वारे (सन १६६३) कोकणप्रांत ताब्यात घेतल्याची नोंद सापडते. शिवराज्य स्थापल्यानंतर कान्होजी आंग्रे यांनी केलेल्या आरमाराच्या कारवायांच्या माध्यमातून या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता आली. उपलब्ध कागदपत्रांनुसार, सिद्धेश्वर व पावणाई ही साळशीची कुलदैवते आहेत. सोळाव्या शतकापर्यंत साळशी हे लहानसे गाव होते. स्थानिक धुरी हे तेथील वतनदार होते. सतराव्या शतकात कोल्हापूरच्या शंभू महाराजांनी हे गाव कुलदेवता असलेल्या पावणाईला सनद देऊन इनाम दिले. त्यानंतर अमात्यांना कोल्हापूरच्या राजांनी बावड जहागिरी बहाल केल्यानंतर हा भाग अमात्यांच्या आधिपत्याखाली आला. भगवंतराव अमात्यांनीही साळशीच्या सिद्धेश्वर आणि पावणाईला सनद दिली. देवस्थानांना, देवाला दिलेल्या संस्थानांची इनामदारी ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतरही कायम राहिली.
आचरा हे गाव रामेश्वर आणि महत्त्वाचे व्यापारी बंदर अशा दोन कारणांमुळे पंचक्रोशीमध्ये विशेषत्वाने सुपरिचित आहे. कोल्हापूर संस्थानाधिपतींनी अर्थात दुसऱ्या शंभुराजांनी रामेश्वराची महती जाणून देवालाच आचरे गाव सन १७२० साली विशेष सनदेमार्फत, तर कालांतराने जवळचेच मजरे गाऊडवाडी गावही कायमस्वरूपी इनाम दिल्याची नोंद सापडते. ही दोन्ही गावे कायदेशीररीत्या रामेश्वराला दिलेली इनामे आहेत. दानपत्रामध्ये मंदिराचा उल्लेख श्री देवस्थान महास्थान असा करण्यात आलेला आहे. हे इनाम उत्तरोत्तर चालत राहील, अशी नोंदही त्यात करण्यात आलेली आहे. या दानपत्रामध्ये (जे सध्या उपलब्ध नाही, मात्र ब्रिटिशांनी हेच दानपत्र सनदीच्या स्वरूपात नोंदवून ठेवल्याचे कागदपत्र संशोधनादरम्यान पाहण्यासाठी उपलब्ध झाले.) देवाला इनामदार हा किताब देण्यात आला आहे. रामेश्वर अर्थात शिव हा देवच इथला सत्ताधीश असून त्यायोगे आचरा देवस्थानाला संस्थानाचा दर्जा देण्यात आलेला आहे.
सरखेल कान्होजी आंग्रे यांनी आपल्या शौर्याने कोकण प्रांती वचक ठेवलेला होता.कामते गावात आंग्रेंची सत्ता होती. या गावात असलेल्या किल्ल्यावरून गावाला कोटकामते नाव पडले. येथे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी भगवती दिलेल्या केलेल्या नवसपूर्तीनिमित्ताने शके सोळाशे सत्तेचाळीसमध्ये देवी भगवतीचे मंदिर बांधल्याचा शिलालेख मंदिरामध्ये आजही पाहायला मिळतो. या शिलालेखानुसार कामते गाव हा आंग्रे यांनी देवीला इनाम दिल्याचे लक्षात येते. गावात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या किल्ल्याच्या तटबंदी आणि बुरुजाचे काही अवशेष आज शिल्लक आहेत. प्रमुख कब्जेदार म्हणून इनाम संस्थानातील गावांतील देवस्थानांचा शिक्का गावातल्या तेथील जमिनीच्या सात बारावर असतो. किंजवडे गावातील स्थानेश्वराला कोल्हापूरच्या छत्रपती शंभू महाराजांनी संपूर्ण गाव वहिवाटीसाठी इनाम दिले आहे. तिथेही अशाच प्रकारे इनामदार संस्थान देवाच्या, स्थानिक जमीन आणि सत्ता ही स्थानेश्वराच्याच नावे आजही अस्तित्वात आहे. इनाम देण्यात आलेले देवच इथले सत्ताधिकारी असल्याने त्यांच्या मालमत्ता विक्रीचा अधिकार अन्य कुणालाही नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने इनाम गावांतील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारावर कायदेशीररीत्या आता निर्बंध आलेले आहेत.
संशोधक म्हणून लक्षात आलेला महत्त्वाचा भाग म्हणजे इनामदारी मिळून अस्तित्वात आलेली संस्थाने – गावे ही सागरी व्यापाराशी संबंधित आहेत. सागरी मार्गाने होणारा हा व्यापार पुढे घाटमार्गे जात असल्याने वरील सर्व इनाम गावे, त्यांचे महसूल तसेच स्थानिक देवतांचे महात्म्य यांचा परस्पर संबंध धर्म आणि अर्थ असा स्पष्टपणे दाखवता येतो. त्यामुळेच असे विधान करता येते की, ज्याप्रमाणे व्यापारी मार्गांवर लेणी निर्माण झाल्या, त्याचप्रमाणे इनामदार संस्थानेही व्यापारी मार्गांवरच वसविण्यात आली; किंबहुना म्हणूनच व्यापारी मार्गावरीलही स्थळे महात्म्याच्या दृष्टीने तसेच आर्थिक, राजकीय आणि व्यापारदृष्ट्या कायम महत्त्वाची राहिलेली आहेत.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…