Friday, May 9, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरहजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली

हजारो हेक्टर भातशेती पाण्याखाली

शेतकरी संकटात, दुबार पेरणीचे संकट

विरार (वार्ताहर) : मुसळधार पावसाने सलग आठवडाभर वसई-विरार शहराला झोडपून काढले आहे. परिणामी शहरातील अनेक सखल भागांत दर वर्षीप्रमाणे पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातही पावसाचा तडाखा सुरूच असल्याने येथील पांढरतारा पूल आणि आडणे पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही पुलापलीकडील २० गावांचा संपर्क तुटला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे वसईची भातशेती संकटात आली आहे.

सुमारे ७१२६ हेक्टर इतकी भातशेती वसईत केली जाते. पैकी ७०१ हेक्टरवरील सुमारे ९७ टक्के भात पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र ग्रामीण भागात तानसा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने भातशेतीला फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. आधीच लहरी पर्जन्यमानाचा शेतकऱ्यांना फटका बात आहे. त्यात शेतीतील वाढलेली महागाई, मजूर मिळत नसल्याने घरातील मंडळी शेतीच्या कामाला जुंपले आहेत. अशात पावसाने दगा दिल्याने भातशेती संकटात आली आहे. दुबार पेरणीमुळे वसईचा शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचण्याची चिन्हे आहेत.

वसईत पावसाने सर्वांची तारांबळ उडाली आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी भातशेतीतील पेरणी हंगाम शेतकऱ्यांनी आटोपता घेतला आहे. मात्र लहरी पावसाने आपला रूद्र अवतार धारण केल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. तसेच तानसा नदीचे पाणी शेतात आल्याने भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. ग्रामीण भागाचा प्रमुख व्यवसाय हा शेती आल्याने शेतकऱ्यांना दर वर्षी शेतीत नुकसान सोसावे लागते. या वर्षीदेखील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दुबार पेरणी व त्यात आर्थिक नुकसान यामुळे वसई-विरारमधील शेतकरी शेतीपासून दूर चालला आहे. मुसळधार पावसाने वसईचे जनजीवन पूर्णपणे वेठीस धरले आहेच. पण त्यात पावसाच्या तडाख्याने रस्त्यांचीदेखील दाणादाण उडाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -