Categories: कोलाज

अवघा रंग एकचि झाला…

Share

मृणालिनी कुलकर्णी

नमस्कार माऊली! आज आषाढी एकादशी! हजारो वर्षांपासूनची परंपरा, विठूनामाचा गजर करीत, शेकडो कोस पायी चालत वारकरी, पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेतात ती ही आषाढ वारी!

ही वारी संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे जगाचे लक्ष वेधून घेते. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत पंढरपूरचा विठोबा! विठूमाऊलीचे दर्शन हेच वारीचे साध्य! १३व्या शतकात ज्ञानेश्वर महाराज भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन, सर्वांना एकत्र घेऊन, समतेच्या/एकतेच्या तत्त्वाला धरून वारीत चालू लागले. ओढ विठोबा भेटीची, ‘भेटी लागे जीवा…’ स्वतःचे पद, जात, धर्म, कूळ, भाषा सारे विसरून माऊलीच्या धाग्याने वारकरी बांधले जातात. ‘अवघा रंग एकचि झाला…’

आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व देवतांचे तेज पांडुरंगात एकटवते, असे म्हणतात. या वारीचे वैशिष्ट्य, विठोबा हा सर्वसामान्यांचा देव! प्रत्येक भाविक विनम्रतेने येथे आपला माथा टेकवू शकतो. वारकरी आपल्या शेतातील पेरणीची कामे आटपून निवांत झाल्यावर वारीत सहभागी होतो. आपल्या काळ्या जमिनीसाठी या सावळ्या विठ्ठलाकडे न चुकता जातो. ‘पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी’. नित्यनेमाने वारी करणारा (येरझाऱ्या घालणारा) तो वारकरी! पांढरे धोतर, सदरा, टोपी परिधान करून हाती टाळ/भागवत धर्माची पताका, गळ्यात ॥तुळशी हार गळा, गोपीचंदन टिळा; हृदयी कळवळा, वैष्णवाचा॥. माता-भगिनी डोक्यावर पाण्याचा हंडा, तुळशी वृदांवन, विठ्ठल-रखुमाई घेऊन ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात, भजन/कीर्तन/अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत पंढरपूरकडे

मार्गस्थ होतात. ‘पाऊले चालती पंढरीची वाट…’ वारीच्या प्रवासात कुठेही गोंधळ नाही, बाचाबाची नाही. एकमेकांना सांभाळत, कुटुंब म्हणून एक होतात. अवघा रंग एकचि झाला…

पंढरपुरात वारकऱ्यांच्या चराचरांत विठ्ठलच गवसतो. ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल…’ म्हणूनच त्यांना जन्म मृत्यूचे भय उरत नाही.

॥जन्म मृत्यूची चुकवी फेरी; तोच खरा वारकरी॥ वारी माणसांना जोडते. अवघा रंग एकचि झाला…

पूर्वी प्रवासाची साधने नसल्याने वारकरी समूहा-समूहाने चालत पंढरपूरला जात. आजही विभिन्न साधू-संतांच्या जन्मस्थानापासून तसेच काही गावातील भजनी मंडळ असे समूह एकत्र येऊन, पायीच जातात. चालणे ही शारीरिक तपश्चर्या आहे, असे मानतात. ३५०/४०० लोकांचा समूह, तीच दिंडी होय. त्या दिंडीची जागा, क्रम, क्रमांक, कार्यक्रम, दिंडीचा प्रमुख सारे ठरलेले असते. अवघा रंग एकचि झाला…

वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य. अलोट गर्दीत, मोकळ्या मैदानात, मोकळ्या जागेतून, अश्व गोलाकार प्रदक्षिणा घालून माऊलीला अभिवादन करतो. अवघा रंग एकचि झाला…

भेदभाव वारकरी संप्रदायाला मान्य नाही. म्हणूनच आजच्या संगणक युगातही वारकरी संप्रदाय अधिकाधिक वृद्धिंगत होत आहे. विठ्ठल हा अहिंसेचे प्रतीक आहे. त्याच्या हाती कोणतेही शस्त्र नाही. त्याला कोणत्याही प्राण्याचा किंवा विशिष्ट नैवेद्य दाखविला जात नाही. जे तुमच्याकडे आहे ते सावतामाळी म्हणतो, ॥कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी॥ सोने-चांदी काही नको. फक्त तुळशीपत्र त्याला प्रिय. जे सहज उपलब्ध. विठूमाऊली सांगते, प्रपंच, काम सोडून येथे येऊ नका. फक्त मुखी श्रीहरीचे नाव घ्या. मनी विठ्ठलाचे रूप आठवा. ‘रूप सावळे, दिव्य आगळे, अंतर्यामी भरितें’

पंढरपूरच्या आधी काही अंतरावर वाखरी येथे आषाढ शुद्ध नवमीला सर्व पालख्या, दिंड्या एकमेकांना भेटतात. दुसऱ्या दिवशी एकादशीला सकाळी पालखीसहित सारा भवसागर पंढरपूरकडे जाण्यास प्रस्थान करतो. इंद्रायणीपासूनचा हा वारी प्रवास, चंद्रभागेत स्नान करून प्रदक्षिणा घालून जयघोष होतो; “पुंडलिक वर दे हरी विठ्ठल… ”
२८ युगांपासून भक्तांसाठी विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाचे ठिकाण
श्रीक्षेत्र पंढरपूर! एकनाथ म्हणतात; ‘माझे माहेर पंढरी; आहे भीवरेच्या तिरी…’
संत नामदेव म्हणतात, ॥जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर॥
आषाढी पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. ही वारी समर्पण वृत्तीचा कळस साध्य
आहे. भागवत धर्माच्या संतांनी पंढरपूर हे तीर्थक्षेत्र नावारूपाला आणले. अवघा रंग एकचि झाला……

आषाढी एकादशीच्या संपूर्ण पालखी दिंडी सोहळ्याचे व्यवस्थापन, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झालेले हे पारंपरिक ज्ञान आहे. आजच्या संगणक युगात २५ लाखांहून अधिक वारकरी ८०० तासांचा ५२० किलोमीटरचा प्रवास सुसूत्रतेने, आनंदाने, देहभान विसरून करीत असतात. सारेच अलौकिक!

आमचा पांडुरंग आम्हाला थकू देत नाही. तो आम्हाला बांधून ठेवतो. ही वारकऱ्यांची भावना. अखंड प्रेमाचा कल्लोळ! अशा भक्तांचा उत्साह वारीत बघायला/अनुभवायला मिळतो. काही सेकंदाच्या विठोबाच्या दर्शनासाठी, तीन-चार तास रांगेत उभे राहतात. भक्तीखेरीज कशाचीच अपेक्षा नाही. परमेश्वर प्रेमाची अनुभूती घेऊन ते मागे फिरताना वर्षभराची ऊर्जा घेऊन जातात. मुखी नामस्मरण असतेच. हाच वारीचा आचारधर्म! अवघा रंग एकचि झाला…

जर विठुरायाचे दर्शन झाले नाही, तर नुसता राऊळीचा कळस किंवा पताका पाहिली तरी वारी घडली, असे मानतात. जाणेच जमले नाही, तर घरी आई-वडिलांची सेवा करा. कारण, पुंडलिक हा निस्सीम मातृ-पितृभक्त होता आणि पंढरपूर हे मातृ-पितृचे सेवा धाम आहे. अवघा रंग एकचि झाला…

वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा. माऊली आली… या भावनेने
जो तो प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो. दर वर्षी नियमितपणे, पूर्ण वारीच्या दरम्यान समाजातील विविध स्तरातून, संस्थाकडून, गावाकडून सामूहिक, वैयक्तिक, वारकऱ्यांना गरजेच्या गोष्टी पुरवितात. निरा नदीची स्वच्छता, राहुट्या
बांधणे, फिरते पोस्ट/आपत्ती व्यवस्थापन/वैद्यकीय/स्वच्छता गृह (कमी पडतात.) प्रत्येक गरिबाच्या घरीसुद्धा १० लोक राहायला असतात. थोडक्यात समाजामधला माणूस जागा होतो. वारी माणसाची, माणसातल्या माणुसकीची. अवघा रंग एकचि झाला…

mbk1801@gmail.com

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

46 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

1 hour ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

2 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

3 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

3 hours ago