ज्योत्स्ना कोट-बाबडे
मुंबई : आयपीएल २०२२ च्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाची पुरती वाताहत झाली. पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सने कधी नव्हे ते सलग ८ सामने गमावून नको असलेला रेकॉर्ड स्वतःच्या नावावर करून घेतला आहे. गटातील सामने संपले असून मुंबईने १४ सामन्यांत अवघे ४ सामने जिंकून १० लढतींत पराभव पत्कारला आहे. त्यामुळे ८ गुणांसह हा संघ गुणतालिकेत तळाशी घुटमळत राहीला. दुखापती, बुमराला साथ देणाऱ्या गोलंदाजांची वानवा, फलंदाजांचे अपयश आणि फँचायझींचे काही चुकीचे निर्णय ही मुंबईच्या दारुण पराभवाची काही कारणे आहेत.
कोपराच्या दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर हंगामासाठी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असतानाही मुंबईने त्याला तब्बल ८ कोटी रुपयांना विकत घेतले. मुंबईला आर्चरऐवजी दुसरा स्टार गोलंदाज खरेदी करता आला असता, त्यामुळे बुमराला साथ देणारा उत्तम गोलंदाज मिळाला असता आणि संघाच्या गोलंदाजीची पोकळी भरली असती. आर्चर संपूर्ण हंगामात बाहेर होता, त्यामुळे मुंबईला त्याचा काहीच फायदा झाला नाही.
मुंबईने ईशानला १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. पण पहिले २ सामने व दिल्लीविरुद्धचा शेवटचा सामना सोडल्यास त्याला त्याच्यावरचा विश्वास सार्थ करता आला नाही.
स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. हार्दिक पंड्याला रिटेन न करणे ही मुंबईची सर्वात मोठी चूक असल्याचे मानले जात आहे. तो केवळ वेगवान फलंदाजीच करू शकत नाही, तर तो एक चांगला गोलंदाजही आहे. पंड्याच्या नसण्याने मुंबईची मध्यम व तळाची फळी कमकुवत झाली आणि त्याच वेळी गोलंदाजीत या अष्टपैलू खेळाडूची कमतरता स्पष्टपणे दिसून आली.
मुंबईने सूर्यकुमार यादवला कायम ठेवले होते. पण दुखापतीमुळे तो आत-बाहेर होत राहिला. भरवशाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचे दुखापतग्रस्त असणे हेही एक मुंबईच्या सुमार कामगिरीचे कारण आहे. परतल्यानंतर त्याने चांगली फलंदाजी केली; परंतु पुन्हा एकदा तो दुखापतीमुळे अर्ध्यातच संघाबाहेर गेला. मुंबईला पाचवेळा चॅम्पियन बनवण्यात गोलंदाजी युनिटचे योगदान सर्वात महत्त्वाचे ठरले आहे, पण या आयपीएल मोसमात मुंबईने आपली ही ताकद आणखी मजबूत करण्यावर भर दिला नाही. त्यांच्या संघात जसप्रित बुमरा, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्नेसारखे गोलंदाज होते. मात्र या मोसमापूर्वी त्यांनी बोल्ट, मिल्ने आणि राहुल चहर या गोलंदाजांना रिलीज केले. त्यामुळे गोलंदाजी विभाग कमजोर झाला. गोलंदाजीत बुमरा हाच त्यांचा एकमेव योद्धा असल्याचे दिसला. हेच कारण आहे की, पहिल्या ८ सामन्यांमध्ये बुमराला सपोर्ट करण्यासाठी टीमकडे तज्ज्ञ गोलंदाजांची कमतरता दिसली.
सिंगापूरचा क्रिकेटपटू टीम डेव्हिडला मुंबईने ८.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. डेव्हिड जगभरातील टी-ट्वेंटी लीगमध्ये खेळतो आणि त्याच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे तो सर्वोत्तम फिनिशर मानला जातो. पण मुंबईने डेव्हिडला केवळ २ सामन्यांनंतर संघातून वगळले.
सलामीवीर रोहित आणि इशान दोघेही संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले आहे. शिवाय आपल्या चांगल्या सुरुवातीचे रूपांतर ते मोठ्या खेळीत करू शकले नाहीत. त्यामुळे मधल्या फळीवर ओझे वाढले. मधल्या फळीत सूर्यकुमार आत-बाहेर आणि हार्दिक नसल्याने या सर्वांचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होऊन मुंबईचा संघ तळाला फेकला गेला.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…