Categories: कोलाज

समाधानच फक्त मागावं

Share

माधवी घारपुरे

असं म्हणतात की, माणसाचं संपूर्ण जीवन हे एक नाटक आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत भूतलाच्या या रंगमंचावर खेळलं जाणारं ते नाटक असेलही, किंबहुना आहे देखील. पण मला मात्र वाटतं की, आपलं संपूर्ण जीवन ही एक शाळा आहे. शिकण्याची, समजून घेण्याची, परीक्षा देण्याची अगदी अखेरच्या श्वासापर्यंत, शिकण्याची आणि शिकवण्याची शाळा. चालायला, बोलायला, लिहायला, वाचायला आपल्याला शिकवलं जातं. आपण कुवतीप्रमाणे लवकर-उशिरा ते शिकतो. मोठे झाल्यावर व्यवहारानं वागायला, बोलायला आणि कपट कारस्थानसुद्धा करायला शिकतो.

काही वेळेला मात्र शिकताना आणि शिकविताना आपली वाट चुकते. कुणी देवाच्या आळंदीला जाते, तर कुणी चोराच्या आळंदीला जाते, तर कुणी चोराच्या आळंदीला जाते. पूर्णत: नास्तिक असलेले लोक सोडून बाकी सर्वजण आपण ‘त्या’ परमेश्वराच्या, देवाच्या चरणाशी येतो. नमस्कार करून काही ना काही मागतो. प्रार्थना करतो, कधी कधी नवसही बोलतो.

माझ्या विचाराची गाडी नेमकी याच मुद्द्यापासून सुरू होते. आपले मूल जरा एक ते दीड वर्षांचे झाले की, आपण त्याला बाप्पाला ‘जय’ करायला शिकवतो. बोलायला यायला लागलं की, शिकवतो, बाप्पाला सांग, चांगली बुद्धी दे, विद्या दे. सर्वांना सुखी ठेव.

याचना करायची सुरुवात इथपासून होते. जरा मोठा झाला की, परीक्षेपूर्वी नमस्कार करताना “मला पेपर सोपा जाऊ दे. मला चांगले मार्क पडू देत”, असे सांगतो.

आपण मुलांना असं सांगायची सवय का नाही लावत की, ‘देवा, मी अभ्यास करतो. अभ्यासाला प्रेरणा दे. परीक्षेत तू माझ्याबरोबर राहा. मला स्मरण दे. मी प्रयत्न भरपूर करणार आहे. आपले आई-बाबा, आजी-आजोबा ही संस्काराची विद्यापीठं मानली जातात. हे काम त्या विद्यापीठाचंच आहे. नाही तरी चिखलात चाक रुतून बसल्यावर आपण स्वत: प्रयत्न न करता देवाचा धावा करणाऱ्या शेतकऱ्याला देव सांगतोच ना की, ‘First give your shoulder to the wheel, then ask for help’

ही गोष्ट झाली मोठ्या मुलांची. पण काही द्यायचं असेल, तर आधी काही द्यायचं याची सवयही मोठीच लहानांना लावतात. ‘मला एक गोड पापा दे. तुला चॉकलेट देतो.’ ते छोटं गोंडस पोर चॉकलेटच्या बदल्यात पापा देतं. काही न देता काही द्यायचं ही शिकवण रुजत नाही. नुकतंच चालायला लागलेलं मूल चालता चालता पडतं. रडायला लागतं. आपण त्याला उचलून घेतो आणि जमिनीला हात मारून सांगतो, ‘हात गं, आमच्या बाळाला पाडलंस’ ते मूल हसतं पण मी चुकत नाही. दुसऱ्यानं कुणीतरी मला पाडलं, या भावनेला खतपाणी घालायला सुरुवात होते. आपण असं नाही म्हणत की, ‘बाळा, चालताना नीट चालायचं हं’ त्या मुलाशी संवाद साधणं महत्त्वाचं, पण निदान सकारात्मक संवाद कानावर पडू दे ना!

गोष्टी अगदी साध्या असतात, त्या आपल्याला शिकवून जातात. रस्त्यात चालताना ठेच लागली, दगड लागला तर आपण चिडतो, पण नकळत तो आपला गुरू ठरतो. चालताना बघून चालावं, असं तो आपल्याला शिकवतो.

आपण महत्त्वाच्या कामाला बाहेर पडतो आणि एखाद्या मिटिंगसाठी आपली लोकल चुकते. आपण म्हणतो, ‘ट्रेन चुकली’ वास्तविक ट्रेन चुकलेली नसते. आपण उशिरा पोहोचलेलो असतो. माझं नेहमी बॅडलक असतं, असं म्हणतो. तू उशिरा उठलास, तू पेपर वाचत बसलास यात त्या लकचा काय दोष?

या जीवनातल्या अगदी साध्या गोष्टी झाल्या, पण पुढे प्रपंचात अनेक विवंचना येतात. मानसिक आधार मिळावा म्हणून देवाकडे जातो आणि नाना तऱ्हेची रडगाणी गातो. कधी नोकरी नाही, तर प्रमोशन नाही. कधी बायको नाही, तर कधी आहे, पण नीट वागत नाही. कधी मूल नाही, आहे पण हुशार नाही. मागणं संपत नाही. देवासमोर कधी ‘समाधानाची मागणी’ आपण करतो का? किती गोष्टी दिल्या नाहीस हे सांगताना, किती गोष्टींपासून वाचवलं आहेस, त्याचा लेखा जोखा घेतो का? मला कार नाही म्हणून रडतो, पण तुला स्कूटर आहे ना? ती नसेल, तर सायकल आहे. सायकल नसेल, तर चालायला पाय आहेत. लंगडं असण्यापासून देवानं वाचवलंय. ही समाधानी वृत्ती. म्हणजे सायकलसाठी प्रयत्न जरूर करा, पण रडू नका. देवाला म्हणायचं,

‘God give me everything to enjoy the life.’ तो गॉड सांगतो, ‘I have given you life to enjoy everything’

मला वाटतं, जीवनाच्या शाळेत इतकं तरी शिकत देवापुढे याचनेपेक्षा समाधान फक्त मानावं.

Recent Posts

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

9 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

57 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

1 hour ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

6 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

6 hours ago