- सुकृत खांडेकर
येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपला विजय मिळाला पाहिजे आणि आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मुंबई-कोकणात भारतीय जनता पक्ष हा नंबर १ राहिला पाहिजे, असा निर्धार माजी खासदार व प्रदेश भाजपचे सचिव निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे. पक्ष कार्यकर्त्यांचे मेळावे, जाहीर कार्यक्रम, सभा-समारंभ आणि मुलाखतीत ते सातत्याने हाच निर्धार बोलून दाखवत असतात. कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला असून दौरे आणि कार्यक्रमांनी हा भाग ते पिंजून काढत आहेत. सतरा मार्च हा निलेश राणे यांचा वाढदिवस. केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचे ते चिरंजीव. विधानसभेतील भाजपचे डॅशिंग आमदार नितेश राणे यांचे बंधू. वडिलांविषयी निलेश यांच्या मनात नितांत आदर आहे आणि आपल्या बंधूंविषयी त्यांच्या मनात खूप अभिमान आहे. मुंबईत राणे परिवार जुहू येथील निवासस्थानी एकत्र राहतात. नारायण राणे, निलेश आणि नितेश हे सतत राजकीय जीवनात प्रकाशझोतात असतात. शांत बसणे हे कोणाच्या स्वभावात नाही आणि जो आपल्या पक्ष नेतृत्वाचा अवमान करतील, त्यांना ते कायम धडा शिकविण्याची भाषा करतात. महाआघाडीचे सरकार निलेश राणे यांच्या रडारवर सातत्याने असते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसवर त्यांचे जोरदार प्रहार चालू असतात. त्यांच्या हल्लाबोलने महाआघाडीचे नेते घायाळ होतात म्हणूनच निलेश यांच्यावर पोलिसांकरवी कारवाई करण्यासाठी ते संधी शोधत असतात. आपल्या टीकेने आपले काय नुकसान होईल याची पर्वा निलेश कधीच करीत नाहीत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांना ईडीने अटक केली तेव्हाच त्यांच्या राजीनाम्याची भाजपने मागणी सुरू केली. पण मलिक राजीनामा देणार नाहीत, ते काही दोषी आहेत असे सिद्ध झालेले नाही, अशी भूमिका शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. निलेश राणे म्हणाले – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणारे पवार, नबाब मलिकांचा राजीनामा का घेऊ शकत नाहीत? काही राजकारण वेगळे आहे का? तसेच शरद पवार महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा मला संशय वाटतो…. निलेश यांची टीका राष्ट्रवादी काँग्रेसला जबर झोंबली. पवारांनी जे ५५ वर्षांत काम केले, ते राणे बंधू भविष्यात कधी करू शकणार नाहीत. पवारांचे नाव घेऊन फुकाची प्रसिद्धी मिळविण्यासाठी राणे बंधूंची ही धडपड आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले. शरद पवारांच्याविषयी केलेल्या टीकेनंतर राणे बंधूंवर मरिन लाइन्स पोलीस स्टेशनवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. निलेश राणे काही गप्प बसणारे राजकारणी नव्हेत, अरे ला का रे म्हणणे हे तर त्यांच्या रोमारामात भिनले आहे. ते म्हणतात – ज्याने मुंबई बाम्बस्फोटातील आरोपींना पैसे दिले, दाऊदशी आर्थिक व्यवहार केले, या मलिकांना सरकार पाठीशी घालते आणि अनिल देशमुखांचा राजीनामा लगेचच घेतला जातो. कोण लागतो मलिक शरद पवारांचा? पवार कुटुंबीयांचे ते खास आहेत का? मलिक काही खरे बोलले तर पवारांविषयी माहिती उघड होईल, अशी भीती वाटते का? मुंबई उच्च न्यायालयाने मलिकांचा सुटकेसाठीचा अर्ज फेटाळून लावल्यावर निलेश म्हणतात – आता काय स्वत: दाऊदने फोन करून सांगावं, राष्ट्रवादीवाल्यांना, की याचा राजीनामा घ्या म्हणून… निलेश राणे म्हणतात – दाऊद हा देशाचा शत्रू नंबर १. बाॅम्बस्फोट घडविणाऱ्याकडून तुम्ही जमीन खरेदी करता व त्यामुळेच दाऊदचा फ्रंट मॅन नबाब मलिक असू शकतो.…
विधिमंडळाच्या अर्थंसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बदल्या व फोन टॅपिंगच्या संदर्भात पेन ड्राइव्ह सादर करून व्हीडिओ बाॅम्ब टाकला, नंतर दुसऱ्या दिवशी दाऊद संदर्भातील संभाषणांचा आॅडियो बाॅम्ब फोडला, ते पाहून सरकारमधील मंत्रीच आता नवा बाॅम्ब कोणता अशी खाणा-खुणा करून भाजपकडे विचारणा करू लागले. त्यावर निलेश राणे म्हणतात – ठाकरे सरकारमधील मंत्रीच वाट बघत आहेत की बाॅम्ब कधी फुटणार? ज्या नेत्यांनी या लोकांना मंत्री केले, त्यांचीच वाट कधी लागतेय यासाठी उत्सुकता बघा…. नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्यासाठी शेकडो पोलिसांची चिपळूणला कुमक आली तेव्हा निलेश शिवसेनेला उद्देशून म्हणाले – समोर या, दोन हात करा. औकात दाखवतो…. (नारायण राणेंना पकडण्यासाठी पोलिसांवर राज्याचा मंत्री थेट कसा दबाव आणत होते हे सर्व जनतेने टीव्हीच्या पडद्यावरून तेव्हा बघितले होते). राज्याचा अर्थसंकल्प नुकताच अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. निलेश तत्काळ म्हणाले – मराठी भवनसाठी प्रत्येक वेळी निधी जाहीर होतो. पण एक वीटही रचली जात नाही. कोकणातील गडकिल्ल्यांसाठी निधी देतात, प्रत्यक्षात किल्ले ढेपाळत आहेत. अलोकेशन ऑफ फंड म्हणजे बजेट नव्हे, अशा शब्दांत त्यांनी अर्थमंत्र्यांची हजेरी घेतली. निलेश राणे हे मुंबई आणि कोकणातील असंख्य तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या बेधडक आणि बिनधास्त वागण्याविषयी युवकांना त्यांच्याविषयी आकर्षण आहे. ते जसे मुद्देसूद बोलतात तसेच भेटायला आलेल्या माणसाची कामे झटपट मार्गी लावतात. वेळकाढूपणा त्यांच्या स्वभावात नाही. नंतर ये किंवा मी बघतो असे सांगून कोणाला नुसते आशेवर ठेवत नाहीत. ते नियमितपणे रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करतात. पंधराव्या लोकसभेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे त्यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले होते. आपली नाळ कोकणातील मतदारांशी आहे याची त्यांना सदैव जाणीव असते म्हणूनच कोकण आणि कोकणातला माणूस हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू असतो. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, देवरूख, लांजा, राजापूर हे या तालुक्यात निलेश घराघरात संपर्कात आहेत. आपण देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचे प्रदेश पदाधिकारी आहोत, म्हणून त्यांच्यात अहंकार कधीच दिसून येत नाही. आपण केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहोत अशा अाविर्भावात ते कधी वागत नाहीत. हा आपला आहे किंवा तो आपल्या कामाचा नाही, असे मोजमाप ते कधी करीत नाहीत. कामासाठी आलेला माणूस कोणत्या पक्षाचा आहे याचा ते कधी विचार करीत नाहीत, आलेल्या माणसाचे समाधान झाले पाहिजे व त्याचे काम मार्गी लागले पाहिजे, यावर त्यांचा भर असतो. कामात शिस्त व अचूकपणा हा राणे परिवाराचा गुण आहे. निलेश यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. कोकणातील विकास प्रकल्पावर ते आकडेवारीसह तळमळीने बोलतात. वर्षानुवर्षे कोकणातील तरुण मुले रोजगार व नोकरीच्या निमित्ताने मुंबईला येत असतात. कोकणातच त्यांना अर्थार्जनाची संधी उपलब्ध झाली, तर ते मुंबईकडे धावणार नाहीत व आपल्या घरी राहून गावाची व आई-वडिलांची काळजी घेतील ही त्यांची भूमिका आहे. कोकणात गावागावात घर घर मोदी हा मंत्र निलेश घरोघरी पोहोचवतात. केंद्र सरकारच्या जनकल्याणाच्या योजना कोणत्या आहेत ते सांगतात. कोकणात सर्वत्र भाजपच हा त्यांचा पक्का निर्धार आहे. राजकारणाच्या रणधुमाळीतही त्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आवर्जून शुभेच्छा दिल्या हे त्यांचे वेगळेपण आहे.