प्रवीण दवणे, ज्येष्ठ कवी
लतादीदींनी स्वरांप्रती, गायनाप्रती संपूर्ण समपर्ण केले आहे. जणू काही त्यांनी गाण्याचा संसार केला. एरव्ही अनेक जण संसाराचं गाणं करतात, ते बरेचदा रडगाणंही होतं; परंतु लतादीदींनी गाण्याशी संसार मांडलेला दिसतो. महान व्यक्तिमत्त्वांचे अनेक पैलू असतात. ते ओळखून वर्णन करणं कठीण असतं. मी लतादीदींना भेटलो, त्या त्या वेळी त्या वेगळ्या वाटल्या. गाण्याबरोबरच इतर अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. वाढदिवसांनिमित्त त्यांना शुभेच्छा देणारा लेख….
गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर आपल्या स्वरांची मोहिनी कायम ठेवणारी श्रेष्ठ गायिका म्हणून लता मंगेशकरांचेच नाव समोर येते. आजही त्यांचे स्थान अढळ आहे. हे केवळ दैवी कृपेमुळे आहे का किंवा परमेश्वराने दिलेल्या अप्रतिम स्वराच्या देणगीमुळे आहे का, असे प्रश्न मनात येतात; परंतु ईश्वराने दिलेली देणगी जपण्याची मानसिकताही महत्त्वाची ठरते. कारण नियती म्हणा वा परमेश्वर, प्रत्येकाला कोणती ना कोणती देणगी देत असतो; परंतु अनेकजण ही देणगी उधळून टाकतात. फार थोडेजण ही देणगी जपतात. या पार्श्वभूमीवर लतादीदींबद्दल विचार करायचा, तर त्यांनी स्वरांप्रती, गायनाप्रती संपूर्ण समर्पण केले आहे. जणू काही त्यांनी गाण्याचा संसारच केला. एरव्ही अनेकजण संसाराचे गाणे करतात, ते बऱ्याचदा रडगाणेही होते; परंतु लतादीदींनी गाण्याशी संसार मांडलेला दिसतो. मी लतादीदींना जवळपास ३० वर्षांपासून जवळून पाहत आलो आहे. त्यांना जवळून ओळखतो आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण महान व्यक्तिमत्त्वांचे अनेक पैलू असतात. ते ओळखून त्यांचे वर्णन करणे खरेच कठीण असते. मी ज्या ज्या वेळी लतादीदींना भेटलो, त्या त्या प्रत्येक भेटीत त्या वेगळ्या वाटल्या. गाण्याबरोबरच इतर अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या.
आज त्यांच्याविषयी अनेक आठवणींची मनात गर्दी होत आहे. त्यातील नेमक्या कोणत्या आठवणी सांगाव्यात हाच मोठा प्रश्न आहे. त्यातून काही निवडक प्रसंग आणि त्याद्वारे दिसलेली लतादीदींची स्वभाववैशिष्ट्ये यावर प्रकाश टाकण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत आहे. लतादीदींच्या प्रथम भेटीचा प्रसंग आजही जसाच्या तसा नजरेसमोर कायम आहे. ही भेट होण्याच्या आदल्या दिवशी पंडित हृदयनाथजींनी मैफल ऐकण्याचा योग आला होता. ही मैफल संपल्यानंतर मी पं. हृदयनाथजींकडे गेलो आणि भाबडेपणाने त्यांना विचारले, ‘मला लतादीदींना भेटायचे आहे. ही भेट होऊ शकेल का?’ त्यावेळी मी कवी प्रवीण दवणे वगैरे कोणी नव्हतो; परंतु एका भाबड्या रसिकाची विनंती त्यांनी मान्य केली आणि मला म्हणाले, ‘उद्या सकाळी दहा वाजता बॉम्बे लॅबला दीदींच्या गाण्याचे रेकॉर्डिंग आहे. तिथे ये, तुझी त्यांच्याशी भेट होईल’. त्यावेळी बॉम्बे लॅब कोठे आहे, हेही माहीत नव्हते. अखेर हृदयनाथजींनाच बॉम्बे लॅबचा पत्ता विचारला. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊलाच मी दादरला पोहोचलो आणि बॉम्बे लॅबचा पत्ता शोधू लागलो. अखेर तो पत्ता मिळाला आणि मी ९.४५ वाजला बॉम्बे लॅबच्या दाराशी पोहोचलो. भक्त जसे पायरीवर उभे राहून मंदिर उघडण्याची प्रतीक्षा करतात तशीच माझी अवस्था झाली होती. कारण मी आज माझ्या दैवताला प्रत्यक्ष पाहणार होतो, त्याची भेट घेणार होतो.
मला जसे कळायला लागले तेव्हापासून मी लतादीदींचा भक्त आहे. ते माझे दैवत आहे. त्यांच्या अनेक गाण्यांनी माझा एकांत सजवला, माझ्या डोळ्यांत पाणी आणले. गाण्यातून मला मार्गही दाखवला. माझ्याप्रमाणे इतर अनेकांचीही अवस्था अशीच असणार आहे, यात शंका नाही. त्या दिवशी सकाळी ९.५५ मिनिटांनी पांढरी फियाट गाडी बॉम्बे लॅबसमोर उभी राहिली. गाडीचा दरवाजा उघडला गेला आणि पांढऱ्या शुभ्र साडीतील लतादीदींचे प्रत्यक्ष दर्शन झाले. मी त्यांना मनोमन नमस्कार केला; परंतु काही बोलू शकलो नाही. कारण काही बोलण्यासारखी परिस्थिती नव्हती; परंतु या प्रसंगातून लतादीदींच्या वक्तशीरपणाचा प्रत्यय आला. या क्षेत्रात आपले स्थान अढळ ठेवण्यात त्यांच्या या गुणाचाही वाटा महत्त्वाचा असणार आहे. पहिल्या भेटीत दीदी म्हणाल्या, ‘तुम्ही रेकॉर्डिंगला आला आहात ना? बाळ (म्हणजे पं. हृदयनाथ मंगेशकर) म्हणाला मला तसे’. मी ‘हो’ म्हणालो आणि जिन्याने वर जाऊ लागलो. तसे त्या म्हणाल्या, ‘या, आपण लिफ्टने जाऊ’. साक्षात सरस्वतीसोबतचे ते क्षण आयुष्यभर स्मरणात राहणारे ठरले. त्यावेळी ‘सुबह’ या चित्रपटातील पंडित नरेंद्र शर्मांच्या गीतांचे रेकॉर्डिंग होणार होते. गाण्याची रिहर्सल झाल्यावर लतादीदींनी पं. नरेंद्र शर्मा यांना बोलावण्यास सांगितले. ते आल्यानंतर लतादीदींनी त्यांच्याकडून संपूर्ण गाणे समजून घेतले. हेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगळेपण म्हणावे लागेल. गाण्यापूर्वी ते गीत किंवा ती कविता कवीकडून समजून घेणे, त्या कवितेचा उचित आदर करणे या गोष्टी म्हणजे लतादीदींची आंतरिक श्रीमंतीच म्हणायला हवी. आपण बाह्य श्रीमंतीची नेहमी चर्चा करतो; परंतु ही आंतरिक श्रीमंतीही लक्षात घेणे, ती स्वत:मध्ये बाणवण्याचा प्रयत्न करणे या बाबीही महत्त्वाच्या ठरतात.
लतादीदींच्या पहिल्या भेटीनंतर त्यांच्या कार्यक्रमांना, रेकॉर्डिंगच्या वेळी उपस्थित राहण्याची संधी अनेकदा लाभली. त्या त्या वेळी त्यांच्यातील विनम्र भावाचे दर्शन अनेकदा घडले. एकदा ‘एक रात्र मंतरलेली’ चित्रपटातील शीर्षक गीताचे रेकॉर्डिंग होते. त्या गीताचे शब्द होते –
घडायचे जे घडते मनुजा
काही न तव हाती
अरूप अनामिक, अनंत अनामिक
अनंत व्यापुन उरली ही नियती
संगीतकार अनिल मोहिले यांनी या गीताची रिहर्सल झाल्यावर रेकॉर्डिंग सुरू करण्यास सांगितले. तेव्हा लतादीदींनी माईकवरून ‘प्रवीण, गाण्याचे शब्द व्यवस्थित ऐकू येत आहेत ना’ असे विचारले. लोकप्रियतेच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या गायिकेने माझ्यासारख्या पायथ्यावर असणाऱ्या कविला असा प्रश्न विचारणे यावरून त्यांच्या स्वभावातील विनम्रता आणि साधेपणाचा प्रत्यय आला. त्यावेळी रेकॉर्डिंग करणाऱ्यांमधील एकजण माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘रेकॉर्डिंग के समय जिसको देखकर माईक भी डरता है, वो तुमको पूछ रही है की, शब्द ठिकसे सुनाई देते है या नही’…! या खरे तर दिसायला छोट्या गोष्टी आहेत; परंतु त्यात दुर्मीळ स्वभाववैशिष्ट्ये दडलेली पाहायला मिळतात. गीतातील शब्द आणि संगीत याविषयी लतादीदींच्या प्रचंड अभ्यासाची अनुभूती याचीही प्रचिती आली.
‘माझा छकुला’ चित्रपटातील मी लिहिलेल्या एका गीताबाबतचा हा किस्सा लक्षात घेण्यासारखा आहे. यात ‘माझा छकुला’ हे गीत मावशी आणि भाची म्हणजे लता आणि राधा मंगेशकर यांनी गायले आहे. त्या गीतात एक ओळ अशी होती –
कसा हसतो चिमणा,
कसा दिसतो चिमणा
या गीताचे रेकॉर्डिंग सुरू असताना लतादीदींनी मला केबिनमध्ये बोलावले. त्यांच्याविषयी मनात आदरयुक्त भीती असल्याने ताण आला होता. त्यांच्यासमोर उभा राहिल्यावर दीदी म्हणाल्या, ‘या गीतातील कसा हसतो चिमणा याऐवजी, कसा हसतो गं चिमणा’ असा बदल केला तर? कारण ती आई आहे आणि मुलाचे लाड करत आहे. त्यामुळे ‘गं’ हा शब्द समाविष्ट करणे उचित ठरेल. त्याने गाण्याची मजा आणखी वाढेल असे मला वाटते’. त्यांचे हे बोलणे ऐकून मी उडालोच. एक गायिका त्या भूमिकेत शिरून केवढा विचार करते याचाच तो अनुभव होता. हे गाणे गाताना त्या लतादीदी नव्हत्या, तर त्या मुलाच्या आई झाल्या होत्या. लतादीदींची गाणी सर्जनशील होण्यामागे हेही एक कारण आहे. लतादीदींना विनोदाची खूप आवड आहे; परंतु गाणे फक्त सुरांनी मोठे होत नाही तर जाणिवेने मोठे होते, हे रसिकांनी लक्षात घ्यायला हवे. आज युगुलगीत गायचे असेल, तर त्यातील माझा स्वत:चा भाग सांगा, असे म्हणत तेवढाच भाग घेऊन रेकॉर्डिंग उरकून निघून जाणारे गायक पाहायला मिळतात. वास्तविक, युगुलगीतात दुसरी व्यक्ती काय म्हणते, यालाही महत्त्व असते. ते लक्षात न घेता केवळ आपल्या वाट्याला आलेले शब्द स्वरबद्ध करण्याने ते प्रभावी ठरते का, हा विचार करण्याजोगा भाग आहे. नवोदित गायकांनी लतादीदींचा आदर्श समोर ठेवून त्यांचे एक एक गुण आत्मसात करत आपली कारकीर्द फुलवायला हवी.
लतादीदींची कारकीर्द म्हणजे ६०-७० वर्षांची तपश्चर्या आहे. त्यांनी आयुष्यात दारिद्र्य सहन केले. सुरुवातीच्या काळात उपेक्षा झाली, अपमान सहन केले; परंतु त्या सगळ्याचा अर्क तयार झाला, त्वेष तयार झाला. ‘मी देईन ते उत्तमच हे त्यांनी मनोमन ठरवले आणि ते आजतागायत टिकून आहे. वयाची ८० ओलांडल्यावर नुकताच एका म्युझिक कंपनीचा शुभारंभ केला. त्यावेळी लतादीदी म्हणाल्या, ‘मैं करके दिखाऊंगी’. या वयात त्यांच्यातील ऊर्जा, उत्साह वाखाणण्याजोगा आहे. ती साऱ्यांना कायम मिळत राहो, त्याचबरोबर ‘मंगेशकर’ नावाचा पाच अक्षरी मंत्र सतत घुमत राहो, हीच मनोकामना.
(अद्वैत फीचर्स)
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…
जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…