नवी दिल्ली (वृत्तसंस्था): राजधानीमध्ये खेळल्या जात असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूने आगेकूच करताना उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र, माजी विजेती सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आले. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना ही नागपूरच्या २० वर्षीय मालविका बनसोडकडून पराभूत झाली. पुरुषांमध्ये एच. एस. प्रणॉयनेही अंतिम आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.
महिला एकेरीत माजी नंबर वन आणि अव्वल मानांकित सिंधूने भारताच्याच ईरा शर्मावर २१-१०, २१-१० असा सहज विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत तिची गाठ अश्मिता चलिया हिच्याशी पडेल. अन्य लढतीत तिने फ्रान्सच्या याल्ली होयॉक्सवर २१-१७, २१-१४ अशी मात केली. पुरुष एकेरीत प्रतिस्पर्धी मिथुन मंजुनाथने कोरोनामुळे माघार घेतल्याने प्रणॉयने आगेकूच केली. तिसऱ्या फेरीत त्याचा सामना तिसऱ्या मानांकित लक्ष्य सेन आणि स्वीडनच्या फेलिक्स बुर्स्टेट यांच्यातील विजेत्याशी पडेल. भारताचा आणखी एक बॅडमिंटनपटू समीर वर्मा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुसऱ्या फेरीत कॅनडाच्या ब्रेन यांगविरुद्ध स्नायू दुखापत बळावल्याने त्याने सामना अर्धवट सोडून दिला.
सायना नेहवालचा पराभव ही गुरुवारमधील सर्वात धक्कादायक घटना ठरली.
डब्लूटीए क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या मालविका बनसोडने २५व्या स्थानी असलेल्या सायनावर आव्हान १७-२१, ९-२१ अशी सरळ सेटमध्ये मात दिली. प्रदीर्घ कालावधीनंतर बॅडमिंटन कोर्टवर परतलेल्या सायनाला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पहिल्या गेममध्ये सायनाने थोडा प्रतिकार केला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये तिने पुरती निराशा केली. त्यामुळे अवघ्या ३४ मिनिटांमध्ये विशीतल्या मालविकाने अविस्मरणीय विजयाची नोंद केली. पहिल्या गेमच्या सुरुवातीला सायना आणि मालविका यांच्यात बरोबरी होती. एकदा ४-४ अशी बरोबरी होती. त्यानंतर मालविकाने आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम राखली. दुसऱ्या गेममध्येही दोघेही २-२ अशा बरोबरीत होत्या. त्यानंतर मालविकाने आपला वेग वाढवला आणि सामना जिंकेपर्यंत तिने मागे वळून पाहिले नाही.
स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव; श्रीकांत, अश्विनीसह सात खेळाडू बाधित
इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केला आहे. माजी नंबर वन किदंबी श्रीकांत आणि दुहेरीतील अव्वल खेळाडू अश्विनी पोनप्पा यांच्यासह सात बॅडमिंटनपटू चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. विषाणूची लागण झाल्यानंतर सर्वांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने (बीडब्लूएफ) ही माहिती दिली.
इंडिया ओपनमधील बाधित खेळाडूंमध्ये श्रीकांत आणि अश्विनीसह रितिका राहुल, त्रिशा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन अमान आणि खुशी गुप्ता यांचा समावेश आहे. दरम्यान, माघार घेतलेले बॅडमिंटनपटू स्पर्धेत खेळल्याने त्यांच्या जागी बदली खेळाडू दिले जाणार नाहीत, असे बीडब्लूएफकडून आले. त्यांच्याविरुद्ध खेळणाऱ्या खेळाडूंना पुढे चाल (वॉकओव्हर) दिली जाणार आहे. त्यामुळे संबंधित प्लेयर थेट पुढच्या फेरीत जातील.
कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या प्रोटोकॉल अंतर्गत इंडिया ओपन २०२२ दरम्यान आरटी-पीसीआर चाचण्या घेतल्या जात आहेत.
गुडघा आणि मांडीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर सायना नेहवाल तिची पहिली स्पर्धा खेळत होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मला दुखापत झाली. २७ डिसेंबरपासून मी पुन्हा खेळायला सुरुवात केली आहे. मी आता कुठे उभी आहे आणि अजून किती सुधारणा आवश्यक आहेत, हे पाहण्यासाठी मी या स्पर्धेत आले होते. मी दोन सामने खेळू शकले, याचा मला आनंद आहे, पण योग्य फिटनेसशिवाय मालविका, अकाशी आणि सिंधूसारख्या खेळाडूंविरुद्ध खेळणे फार कठीण आहे, हे मला मानन्य करावेच लागेल. मालविका ही चांगल्या पद्धतीने खेळत आहे आणि तिच्या खेळात सातत्याने सुधारणा होत आहेत. ती रॅली खेळण्यात उत्कृष्ट आहे. मालविका या स्पर्धेतही भविष्यात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास सायनाने व्यक्त केला केला.
सिंधूनंतर सायनाला पराभूत करणारी मालविका ही भारताची दुसरी खेळाडू आहे. चेक प्रजासत्ताकची तेरेझा स्वाबिकोवा हिने दुखापतीमुळे माघार घेतल्याने सायनाला सलामीला पुढे चाल मिळाली. मात्र, पहिला सामना खेळूनही अनुभवी सायनाने निराशा केली. दुसरीकडे मालविकाने सर्वांची मने जिंकली.
मालविका ही महाराष्ट्रातील एक प्रतिभावान बॅडमिंटनपटू आहे. तिने १३ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील गटात राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या आहेत. २०१८ मध्ये तिची जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली होती. २०१८ मध्ये काठमांडू येथे झालेल्या दक्षिण आशियाई बॅडमिंटन स्पर्धेचे मालविकाने जेतेपद पटकावले होते. २०१९ मध्ये तिने अखिल भारतीय सीनियर रँकिंग टूर्नामेंट जिंकली. तसेच मालविकाने २०१९ मध्येच मालदीव इंटरनॅशनल फ्युचर सीरीज स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले होते.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…