गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
सुप्रसिद्ध लेखक शिव खेरा यांनी लिहिले आहे, विजेते काही वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. याच वेगळ्या पद्धतीने केलेल्या विचाराला ‘हटके विचार’ असे म्हणतात. नेहमीच्या रुळलेल्या वाटेवरून न जाता वेगळ्या वाटेवरचे काम, कृती, कला, नर्म विनोद, समाजकार्य, करिअर हे सारे ‘जरा हटके’मध्येच मोडते. रोजच्या आयुष्यात लहान-सहान प्रसंगांतून व्यक्त होणारे हटके विचार, कृतीही लक्ष वेधून घेतात. आपणा सर्वांच्या आयुष्यात जे जे बदल आपण स्वीकारले आहेत, ते सुरुवातीला हटकेच होते. जसे शास्त्रज्ञांनी लावलेले शोध, समाजसुधारकांच्या चळवळी हेच दाखवून देतात. जरा हटके असलेली कोणतीही गोष्ट समाज लगेच स्वीकारत नाही. त्या व्यक्तींनाही लोकांचा असहकार स्वीकारावा लागतो. अन्य अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. बऱ्याच वर्षांनंतर तो विचार हळूहळू स्वीकारला जातो.
दुर्बीण आकाशाकडे वळवून खगोलशास्त्रात क्रांती घडवून आणणारा गॅलिलिओ हा पहिला शास्त्रज्ञ होय. गॅलिलिओने कोपर्निकसच्या सूर्यकेंद्रित सिद्धांताला मान्यता द्यावी, असा आग्रह धरला आणि त्यांना शिक्षा भोगावी लागली. आज अवकाश संशोधनाची प्रगती सर्वच जाणतात.
बापाला डोकेदुखी झालेला डार्विन, वैज्ञानिक आणि वैचारिक क्षेत्रात आमूलाग्र क्रांती करतो. सूक्ष्म निरीक्षण करून अचूक नोंदी घेण्यात डार्विन इतरांच्या बराच पुढे होता. ‘बदलत्या पर्यावरणात जे सजीव टिकून राहतात तेच सक्षम ठरतात, बाकीच्यांना निसर्ग निर्दयपणे मारून टाकतो. याचा अर्थ निसर्ग सजीवांची निवड करीत असतो.’ हा जीवशास्त्रीय उत्क्रांतीवादाचा शोध शंभर वर्षांपूर्वी पचविणे सोपे नव्हते. तो उत्क्रांतीवाद आज स्पष्ट झाला आहे.
याउलट शंभराहून अधिक वर्षापासून समाजातील रूढी-परंपरा, कर्मकांड, स्त्रीविषयक दृष्टिकोन, संतती नियमन, अंधश्रद्धा, जाती-वंशभेद इत्यादी विषयांवर राष्ट्रसंतांबरोबरच समाजधुरिणीही भाष्य करीत होते. अनेकांना वाळीत टाकले गेले होते, तरी आजही त्यांचे हटके सत्य विचार आपण पचवू शकलो नाही.
‘जरा हटके’ची व्याप्ती तशी मोठी आहे. घरातील आपल्या छोट्या दोस्तांना पूर्वापार चालत आलेल्या चिऊताई, कावळेदादा, टोपीवाला आणि माकड यांच्या गोष्टी सांगताना लहान मुले पटकन मार्ग काढतात. तहानलेल्या कावळ्याने एक-एक दगड शोधण्यापेक्षा स्ट्रॉ का नाही वापरला? चिऊताई दार उघडेपर्यंत कावळेदादानी थांबायचे कशाला? माकड टोपीवाल्याला सांगतो, आम्हालाही आजोबा होते. मुलांच्या प्रतिक्रियेत उमटलेले बालसुलभ हटके विचार ऐकून आपण स्तंभित होतो.
हटके उत्तरांनी निरुत्तर करणाऱ्या बिरबलाच्या गोष्टी सर्वश्रुत आहेत. ‘या जगात सुंदर फुल कोणते?’ या राजा अकबराच्या प्रश्नाला ‘कापसाचे फूल’ हे बिरबलाने उत्तर दिले. कापसाच्या फुलाच्या सुतापासून कापड विणले जाते. त्या कापडाचा माणसाला आयुष्यभर उपयोग होत असतो. बाकीची फुले नाशवंत असतात. त्याप्रमाणे युवा विद्यार्थ्यांनो, करिअरला उपयुक्त शिक्षण घ्या. दुसरा प्रश्न, ‘चंद्र आणि सूर्य कधीच पाहू शकत नाही, अशी गोष्ट कोणती? बिरबलचे उत्तर ‘अंधार’. कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले बिरबल अचूक हजरजबाबी उत्तरासाठी प्रसिद्ध होते.
विद्यार्थी युवकांनो! तुम्ही घेतलेल्या, निवडलेल्या क्षेत्रात किंवा रोजच्या कामात जरा वेगळेपणा दाखवा. त्या हटक्या कृतीने तुमच्याकडे लक्ष वेधले जाते. गायक शंकर महादेवन ह्यांनी सुरुवातीच्या धडपडत्या काळात एक ब्रेथलेस गाणं गाऊन, स्वतःची हटके क्षमता दाखवून दिली. वयाच्या एकविसाव्या वर्षी रामदास फुटाणे यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. लहानपणी रामदास फुटाणे यांनी आचार्य अत्रे आणि बांदेकर यांचे व्यंग वाचलं होतं. त्यामुळे त्याने ठरविले पानाफुलांच्या, प्रेमाच्या कविता लििहण्यापेक्षा जरा हटके अवतीभोवती घडणारं राजकारण आणि समाजकारण यातील विसंगती शोधत भाष्य कविता लिहाव्यात; याच ‘वात्रटिका’ होय. नंतर तीच रामदास फुटाणे यांची ओळख ठरली. युवा विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, अंगात असलेला हटके गुण किंवा कृती ही त्या व्यक्तीची स्वतंत्र ओळख ठरते.
काळाची गरज ओळखून वाट बदलणे, हाही हटके विचारच! डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आदर्श मानणाऱ्या हैदराबादच्या एकवीस वर्षीय जव्वाद पटेल या अभियंत्याने दुष्काळ भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मोठे संशोधन केले आहे. आपल्या सभोवताली असलेल्या हवेचे रूपांतर पाण्यात करू शकलो तर? या कल्पनेला जव्वाद पटेल यांनी मूर्त रूप दिले. जव्वादने थ्री-डी प्रिंटिंगच्या सहाय्याने ‘ड्यू ड्रॉप’ हे यंत्र तयार केले, ते तासाला सव्वा लिटर पिण्यास योग्य पाणी तयार करू शकते. त्यांच्या नावे अनेक संशोधन लेख व पारितोषके आहेत.
समाजात काही जणांचे व्यक्तिमत्त्व खूपच हटके असते. त्यांची प्रत्येक कृती खूप शिकवत असते. आज मिळतील तेवढ्या सवलती उपभोगण्याच्या, जनतेची संपत्ती खिशात घालण्याच्या काळात जहांगीर रतनजी दादाभाई टाटा म्हणजेच जे. आर. डी. टाटा स्वतःच्या ऑफिसात काम करताना, स्वतःच्या खासगी संबंधातील पत्रांसाठी लागणारा कागद, पाकीट, पोस्टाची तिकिटे स्वतःच्या पैशातून खर्च करीत होते.कंपनीचे सर्वेसर्वा असूनही पाच पैशाचे पोस्टाचे तिकीटही कंपनीच्या खर्चातून घेत नसत. ते असे मानत होते, टाटा समूहाची संपत्ती आपली नसून ती कामगार, अधिकारी व संचालक वर्ग यांच्या श्रमातून व बुद्धीतून निर्माण झाली आहे. आजच्या जगात हा विचार हटकेच मानावा लागेल. जो आपल्या मनावर बिंबतो.
जरा हटके विचार करण्याच्या पद्धतीला ‘लॅटरल थिकिंग’ असे म्हणतात. प्रत्येक गोष्टीचा आपण ढोबळ चौकटीतच, चालत आलेल्या विचारांतूनच विचार करतो. त्या प्रसंगाकडे बघताना वेगळी विचार पद्धत असू शकते. मागच्यांनी केले, म्हणून तसेच करणे हे चूक. जरा हटके विचार करायला वाचन हवे, विचारस्वातंत्र्य हवे. ही एक बुद्धीची शक्ती आहे. आजची युवा पिढी स्वतंत्र विचारांची आहे. विद्यार्थी युवकांनो असे काहीतरी जरा हटके करा, ज्याची परिणामकारकता वाखाण्याजोगी ठरावी.
mbk1801@gmail.com
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…